YouVersion Logo
Search Icon

यहो. 14

14
चिठ्ठ्या टाकून कनान देशात वाटणी
1आणि कनान देशात इस्राएलाच्या लोकांनी जी वतने घेतली, म्हणजे एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएल लोकांच्या वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे पुढारी यांनी त्यास जी वतने दिली ती ही आहेत. 2परमेश्वराने मोशेद्वारे नऊ वंशांविषयी व अर्ध्या वंशाविषयी जशी आज्ञा दिली होती, तसे चिठ्ठ्या टाकून त्यांचे वतनाचे वाटे झाले. 3कारण दोन वंशांना व अर्ध्या वंशाला मोशेने यार्देनेच्या पलीकडे वतन दिले होते, परंतु त्यांच्याबरोबर लेव्यांना वतन दिले नाही. 4वास्तविक पाहता योसेफ वंशाचे दोन वंश मनश्शे व एफ्राइम असे होते, आणि लेव्यांना देशात त्यांनी वाटा दिला नाही, केवळ वस्तीसाठी नगरे, आणि त्यांच्या पशूंसाठी व त्यांच्या मालमत्तेसाठी त्यांना फक्त काही नगरात त्यांची जागा दिली. 5जशी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती, तसे करून इस्राएल लोकांनी देश वाटून घेतला.
कालेबाला हेब्रोन देण्यात येते
6आणि यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाजवळ आले तेव्हा कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब तो त्यास म्हणाला, “कादेश-बर्ण्यामध्ये परमेश्वराने देवाचा मनुष्य मोशे याला मजविषयी व तुजविषयी काय सांगितले होते ते तुला माहीतच आहे. 7परमेश्वराचा सेवक मोशे याने जेव्हा मला कादेश-बर्ण्यापासून देश हेरावयाला पाठवले, तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो, आणि मला त्या देशाविषयी काय वाटते ती बातमी मी त्यास कळवली. 8पण माझे बंधू जे माझ्याबरोबर वर चढून गेले होते त्यांनी लोकांचे मन घाबरून जाईल असे केले, परंतु मी माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलो. 9तेव्हा त्याच दिवशी मोशेने शपथ वाहून सांगितले की, ज्या भूमीवर तुझे पाऊल चालले ती खात्रीने तुझा व तुझ्या वंशजाचे वतन अशी सर्वकाळ होईल; कारण की तू माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलास. 10तर आता पाहा इस्राएल रानात चालत असता, परमेश्वराने ही गोष्ट मोशेला सांगितली, तसे त्याने मला या पंचेचाळीस वर्षात जिवंत ठेवले आहे; आणि आता पाहा, मी आज पंचाऐंशी वर्षांचा आहे. 11जेव्हा मोशेने मला पाठवले होते, तेव्हाच्या दिवसाप्रमाणे मी आजही सामर्थ्यवान आहे. लढाई करण्याचे व ये जा करण्याचे सामर्थ्य माझ्यात जसे तेव्हा होते तितकेच आजही आहे. 12तर परमेश्वराने त्यादिवशी ज्या डोंगराळ प्रदेशाविषयी सांगितले, तो हा आता मला दे; कारण त्यादिवशी तू ऐकले होते की, तेथे अनाकी लोक आणि मोठी तटबंदीची नगरे आहेत; तरी परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना वतनातून बाहेर घालवीन.” 13तेव्हा यहोशवाने त्यास आशीर्वाद दिला; आणि यफुन्नेचा पुत्र कालेब याला हेब्रोनाचे वतन दिले 14यास्तव कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब याचे हेब्रोन वतन आजपर्यंत चालत आहे; कारण की तो इस्राएलाचा देव परमेश्वर याला पूर्ण अनुसरला. 15पूर्वीच्या काळी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते; तो आर्बा अनाकी लोकांमध्ये मोठा मनुष्य होता; नंतर लढाईपासून देशाला विसावा मिळाला.

Currently Selected:

यहो. 14: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in