YouVersion Logo
Search Icon

शास्ते 9

9
अबीमलेखाची कारकीर्द
1यरूब्बालाचा मुलगा अबीमलेख, याने शखेमास आपल्या आईच्या नातेवाईकांजवळ जाऊन त्यास आणि त्याच्या आईच्या घरातील सर्व परिवाराला म्हटले, 2“तुम्ही कृपाकरून शखेमांतल्या सर्व मनुष्यास सांगा म्हणजे ते ऐकतील, यरूब्बालाच्या सर्व सत्तर मुलांनी तुम्हावर राज्य करावे किंवा एका मुलाने तुम्हावर राज्य करावे? यांतून तुम्हास कोणते चांगले वाटते? मी तुमच्या हाडाचा व मांसाचा आहे याची आठवण करा.” 3तेव्हा त्याच्या आईचे नातेवाईक त्याच्याविषयी शखेमांतल्या सर्व मनुष्यांशी बोलले, आणि त्यांनी अबीमलेखास अनुसरण्याचे मान्य केले, कारण त्यांनी म्हटले, “तो आमचा भाऊ आहे.” 4त्यांनी त्यास बआल-बरीथाच्या घरातून सत्तर शेकेल#साधारण 800 ग्राम रुपे दिले, आणि अबीमलेखाने बेकायदेशीर व बेदरकार स्वभावाची माणसे भाडयाने ठेवली. यास्तव ती त्याच्यामागे चालली. 5तो आपल्या वडिलाच्या घरी अफ्रासास गेला, आणि त्याने आपले भाऊ म्हणजे यरूब्बालाचे सत्तर मुले एका दगडावर मारले; तरी यरूब्बालाचा धाकटा पुत्र योथाम राहिला, कारण तो लपलेला होता. 6मग शखेमांतली सर्व पुढारी व बेथ मिल्लोतल्या सर्वांनी मिळून जाऊन शखेमामधल्या एलोन खांबाजवळ अबीमलेखाला राजा करून घेतले. 7नंतर लोकांनी योथामाला हे कळविले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर जाऊन उभा राहिला. “त्याने आपला स्वर उंच केला आणि त्यांना बोलला, शखेमाच्या पुढाऱ्यांनो, देवाने तुमचे ऐकावे म्हणून तुम्ही माझे ऐका. 8झाडे आपल्यावर अभिषेकाने राजा करायास निघाली; तेव्हा त्यांनी जैतूनाला म्हटले, ‘तू आमचा राजा हो.’ 9तेव्हा जैतूनाने त्यांना म्हटले, झाडांवर अधिकार करायास जावे म्हणून, ज्याने देवाचा व मनुष्याचा सन्मान करीतात, ते माझे तेल मी सोडून देऊ काय? 10नंतर त्या झाडांनी अंजिराला म्हटले, ‘तू चल, आमचा राजा हो.’ 11तेव्हा अंजिराने त्यांना म्हटले, ‘मी आपली गोडी व आपले चांगले फळ सोडून, झाडांवर अधिकार कारायास जावे की काय?’ 12नंतर त्या झाडांनी द्राक्षवेलाला म्हटले, ‘चल तू आमचा राजा हो.’ 13तेव्हा द्राक्षवेलाने त्यांना म्हटले, मी आपला ताजा रस जो देवाला व मनुष्यांना संतुष्ट करतो, तो सोडून झाडावर अधिकार करायला जावे की काय? 14नंतर त्या सर्व झाडांनी काटेरी झुडुपाला म्हटले, ‘चल तू आमचा राजा हो.’ 15तेव्हा काटेरी झुडपाने त्या झाडांना म्हटले, ‘जर तुम्ही खरेपणाने मला अभिषेक करून राजा करीत असाल, तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या; नाही तर काटेरी झुडुपातून विस्तव निघून लबानोनावरल्याचे गंधसरूस जाळून टाकील.’ 16यास्तव आता तुम्ही विचार करा की, खरेपणाने व प्रामाणिकपणाने वर्तणूक करून तुम्ही अबीमलेखाला राजा केले आहे का? आणि यरूब्बालासंबंधी आणि त्याच्या घराण्यासंबंधी जर तुम्ही बरे केले का आणि त्याच्या हातांच्या कृत्यांनुसार त्यास शिक्षा केली आहे काय? 17आणि विचार करा की, माझ्या वडिलाने तुमच्यासाठी लढाई केली, आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला मिद्यानाच्या हातातून सोडवले आहे. 18परंतु तुम्ही आज माझ्या वडिलाच्या घरावर उठला, आणि त्याचे पुत्र सत्तर माणसे, यांना तुम्ही एका शिळेवर जिवे मारले, आणि त्याच्या दासीचा पुत्र अबीमलेख याला शखेमातल्या मनुष्यांवर राजा करून ठेवले, कारण तो तुमचा भाऊ आहे. 19तर तुम्ही आजच्या दिवशी यरूब्बालाविषयी व त्याच्या घराण्याविषयी खरेपणाने व प्रामाणिकपणाने जर वर्तणूक केली असेल, तर अबीमलेखामध्ये संतोष करा; त्यानेही तुमच्यामध्ये संतोष करावा. 20परंतु जर तसे नाही, तर अबीमलेखातून विस्तव निघून शखेमातील व मिल्लोतील मनुष्यांना जाळून टाको, आणि शखेमातल्या व मिल्लोतील मनुष्यांतून विस्तव निघून अबीमलेखाला जाळून टाको.” 21नंतर योथाम पळून गेला व आपला भाऊ अबीमलेख ह्याच्या भीती पोटी तो बैर येथे जाऊन राहिला. 22तेव्हा अबीमलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केले. 23नंतर देवाने अबीमलेख व शखेमातली माणसे यांच्यामध्ये दुष्ट आत्मा पाठवला, म्हणून शखेमातले लोक अबीमलेखाशी कपटाने वागू लागले; 24देवाने हे केले, यासाठी की, यरूब्बालाच्या सत्तर पुत्रांच्या विरोधात केलेल्या हिंसाचाराचा बदला घ्यावा, व त्यांच्या रक्तपाताबद्दल त्यांचा भाऊ अबीमलेख दोषी ठरवला जावा; आणि त्याच्या भावांचा खून करण्यात त्यास मदत केली म्हणून, शखेम नगरातील लोकही जबाबदार धरले जावेत. 25नंतर शखेमातल्या मनुष्यांनी त्याच्यासाठी डोंगराच्या शिखरावर दबा धरणारे ठेवले, आणि त्यांनी आपल्याजवळून जो कोणी वाटेवर चालला, त्यास लुटले. हे कोणीतरी अबीमलेखाला सांगितले. 26मग एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसह आला, आणि ते शखेमात आल्यानंतर शखेमातल्या मनुष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. 27तेव्हा त्यांनी शेतात जाऊन आपल्या द्राक्षमळ्यांची खुडणी करून द्राक्षांचा रस काढला आणि ते उत्साह करीत आपल्या देवाच्या घरात गेले, आणि तेथे खाऊन पिऊन त्यांनी अबीमलेखाला शाप दिला. 28तेव्हा एबेदाचा पुत्र गाल बोलला, “अबीमलेख कोण आहे की आम्ही त्याचे दास असावे? यरूब्बालाचा मुलगा व त्याचा कारभारी जबुल हे शखेमाचा बाप हमोर यांच्या कुळांतील लोकांचे दास असतील पण आम्ही अबीमलेखाची सेवा का करावी? 29आणि हे लोक माझ्या हाती असते तर किती बरे होते! म्हणजे मी अबीमलेखाला काढून टाकले असते. मी अबीमलेखाला म्हणेन, तू आपले सैन्य बाहेर बोलाव.” 30त्या वेळेस त्या नगराचा अधिकारी जबुल याने, एबेदाचा पुत्र गाल याच्या गोष्टी ऐकल्या, आणि त्याचा राग पेटला. 31मग त्याने कपट करून अबीमलेखाजवळ दूत पाठवून असे सांगितले की, “पाहा, एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसोबत शखेमास आला आहे; आणि पाहा, ते तुझ्याविरूद्ध नगराला चिथावत आहेत. 32तर आता, तू आपल्याजवळच्या लोकांसह रात्री उठून शेतात दबा धर. 33मग असे व्हावे की, सकाळी सूर्य उगवताच तू उठून नगरावर हल्ला कर; मग पाहा, ते आपल्याजवळच्या लोकांसह तुझ्याकडे बाहेर येतील, तेव्हा जसे तुझ्या हाती येईल तसे तू त्याचे कर.” 34यास्तव अबीमलेखाने आपल्याजवळच्या सर्व लोकांसह रात्री उठून चार टोळ्या करून शखेमावर दबा धरला. 35मग एबेदाचा पुत्र गाल, बाहेर येऊन नगराच्या वेशीजवळ उभा राहिला, आणि अबीमलेख आपल्याजवळच्या लोकांसोबत दबा सोडून उठला. 36तेव्हा गालाने त्या लोकांस पाहून जबुलाला म्हटले, “पाहा, लोक डोंगरांच्या शिखरांवरून उतरतात.” मग जबुल त्यास बोलला, “तुला डोंगराची छाया मनुष्यांसारखी दिसते.” 37तेव्हा गालाने फिरून असे म्हटले की, “पाहा, देशाच्या उंचवटयावरून लोक उतरतात; आणि एक टोळी एलोन मौननीमाच्या वाटेवरून येत आहे.” 38मग जबुल त्यास बोलला, “तू आपल्या ज्या तोंडाने बोललास, अबीमलेख कोण की, आम्ही त्याची चाकरी करावी ते आता कोठे आहे? ज्या लोकांस तू तुच्छ केले, ते हेच की नाहीत? आता मी म्हणतो, तू बाहेर जाऊन त्यांच्याशी लढाई कर.” 39मग गालाने शखेमातल्या मनुष्यांपुढे होऊन, बाहेर जाऊन अबीमलेखाशी लढाई केली. 40तेव्हा अबीमलेख त्याच्या पाठीस लागला असता तो त्याच्यापुढून पळाला, आणि वेशीच्या दारापर्यंत बहुत लोक जखमी होऊन पडले. 41मग अबीमलेख आरूमा शहरात राहिला, जबुलाने गाल व त्याचे नातेवाईक ह्यांना शखेममधून हाकलून दिले. 42दुसऱ्या दिवशी शखेमचे लोक बाहेर शेतात गेले. ही बातमी अबीमलेखाला समजली. 43तेव्हा त्याने आपल्या लोकांच्या तीन तुकड्या केल्या; ते शेतात दबा धरून बसले, लोक नगरातून बाहेर येत आहेत हे त्याने पाहिले आणि त्यांच्यावर हल्ला करून त्याने त्यांना ठार मारले. 44अबीमलेख व त्याच्यासोबतच्या तुकड्यांनी हल्ला करून शहराचे दरवाजे रोखून धरले. इतर दोन तुकड्यांनी शेतात असलेल्या लोकांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. 45अबीमलेखाने दिवसभर त्या नगराशी लढाई केली. त्याने शहराचा ताबा घेतला व त्यातील लोकांस जिवे मारले, आणि नगर उद्‌ध्वस्त करून त्यावर मीठ पेरून टाकले. 46शखेमच्या सर्व पुढाऱ्यांनी हे ऐकले तेव्हा ते सर्वजण अल बरीथच्या किल्ल्यात गेले. 47सर्व पुढारी शखेमच्या बुरुजात जमा झाले आहेत असे अबीमलेखाला कोणी सांगितले. 48तेव्हा अबीमलेख आपल्याजवळच्या सर्व लोकांसहीत सल्मोन डोंगरावर गेला, आणि अबीमलेखाने आपल्या हाती कुऱ्हाड घेऊन झाडाची फांदी तोडली, मग तिला आपल्या खांद्यावर उचलून घेऊन त्याने आपल्याजवळच्या लोकांस सांगितले, “जे मी केले ते तुम्ही पाहिले, तसे माझ्यासारखे लवकर करा.” 49तेव्हा सर्व लोकांतल्या एकएकाने फांदी तोडून घेतली, आणि ते अबीमलेखाच्या मागे चालले; मग त्यांनी, त्या फांद्या बुरुजाला लावल्या व ते लोक आत असता बुरूजाला आग लावली; अशा प्रकारे शखेमाच्या बुरुजातले सर्व पुरुष व स्त्रिया मिळून सुमारे एक हजार इतके लोक मरण पावले. 50नंतर अबीमलेख तेबेस शहरास गेला, आणि त्याने तेबेसला वेढा देऊन ते घेतले. 51परंतु त्या नगरात एक मजबूत बुरूज होता, आणि सर्व पुरुष स्त्रियांसह म्हणजे त्या नगरातली सर्व माणसे त्यामध्ये पळून गेली आणि आपल्यामागे दरवाजा बंद करून बुरूजाच्या धाब्यावर चढली. 52नंतर अबीमलेख त्या बुरूजाजवळ आला आणि त्याच्याविरुध्द लढला, आणि बुरूजाला आग लावून जाळायला त्याच्या दाराजवळ गेला. 53तेव्हा एका स्त्रीने अबीमलेखाची टाळू फोडण्यास त्याच्या डोक्यावर जात्याची वरची तळी टाकली. 54तेव्हा त्याने त्याची हत्यारे वाहणाऱ्या तरुणाला घाईघाईने हाक मारून सांगितले, “तू आपली तलवार काढून मला जिवे मार, नाही तर स्त्रीने त्यास मारले. असे माझ्याविषयी म्हणतील.” म्हणून त्यास तरुणाने त्यास भोसकल्यावर तो मेला. 55मग अबीमलेख मेला हे पाहून इस्राएली माणसे आपापल्या ठिकाणी गेली. 56तर अबीमलेखाने जी दुष्टाई आपल्या सत्तर भावांना जिवे मारण्याने आपल्या पित्याविषयी केली होती, तिचा देवाने त्याच्यावर सूड घेतला. 57आणि शखेमातल्या मनुष्यांचीही सर्व दुष्टाई देवाने त्यांच्या मस्तकावर उलटून लावली; याप्रमाणे यरूब्बालाचा पुत्र योथाम याचा शाप त्यास भोवला.

Currently Selected:

शास्ते 9: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in