शास्ते 16
16
गज्जा येथे शमशोन
1शमशोन पलिष्टी प्रदेशाच्या गज्जा शहरास गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली आणि तो तिच्याजवळ गेला. 2गज्जेकरास सांगण्यात आले की, “शमशोन तिथे आला आहे.” गज्जकरांना ती जागा घेरून टाकली आणि नगराच्या वेशीच्या दाराजवळ त्याच्यासाठी गुप्तपणे दबा धरून ते सारी रात्र वाट पाहत राहिले. त्यांनी रात्रभर काही हालचाल केली नाही. ते म्हणाले, सकाळ उजडेपर्यंत आपण वाट पाहू या आणि मग आपण त्यास जिवे मारू. 3शमशोन मध्यरात्रीपर्यंत बिछान्यात पडून राहिला. मग मध्यरात्री त्याने उठून आणि नगराच्या वेशीचे दरवाजे, त्याचे अडसर आणि सर्व, दोन्ही दारबाह्यांसह धरले आणि जमिनीतून उखडून ओढून काढले, आणि ते आपल्या खांद्यावर घेऊन हेब्रोनाच्यासमोर डोंगराच्या शिखरापर्यंत वर नेले.
शमशोन आणि दलीला
4त्यानंतर असे झाले की, तो सोरेक खोऱ्यात राहणाऱ्या एका स्त्रीवर प्रेम करू लागला; तिचे नाव तर दलीला होते. 5पलिष्ट्यांचे राज्याधिकारी तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले, शमशोनाचे महान सामर्थ्य कशात आहे आणि आम्ही “त्याच्या शक्तीवर कशी मात करून त्यास बांधू, कशा प्रकारे आम्ही त्यास नमवू आणि त्याच्यावर वरचढ होऊ शकू ते युक्तीने विचार. तू हे करशील तर आम्ही प्रत्येकजण तुला अकराशे#साधारण 60 किलोग्राम चांदीची नाणी देऊ.” 6आणि त्यामुळे दलीला शमशोनाला म्हणाली, “मी विनंती करते तुझे महान बळ कशात आहे, आणि तुला कोणीही कशाने बांधले म्हणजे तू शक्तीहीन होशील, ते मला सांग.” 7तेव्हा शमशोनाने तिला सांगितले, “धनुष्याच्या न सुकलेल्या अशा सात हिरव्या वाद्यांनी, जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन.” 8नंतर पलिष्ट्यांचे अधिकारी सात सालपटे जी सुकली नव्हती, अशी ते घेऊन दलीलाकडे आले, आणि तिने त्यास त्यांनी बांधले. 9तेव्हा तिच्या आतल्या खोलीत गुप्तपणे माणसे दबा धरून बसली होती, आणि तिने त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुजवर चालून आले आहेत!” परंतु त्याने जसा तागाचा दोरा अग्नी लागताच तुटून जातो तशा धनुष्याच्या त्या सात हिरव्या वाद्या तोडून टाकल्या. आणि त्याच्या बळाचे रहस्य त्यांना समजू शकले नाही. 10दलीला, शमशोनाला म्हणाली, “पाहा, तुम्ही मला फसवले आणि माझ्याशी लबाडी केली. तुमच्यावर कशाने मात करता येईल ते, मी विनंती करते, मला सांग.” 11तेव्हा त्याने तिला सांगितले, “जे कधी कामात वापरले नाहीत अशा नव्या दोरांनी जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन.” 12तेव्हा दलीलाने नवे दोर घेऊन त्याने त्यास बांधले, आणि त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आले आहेत.” तेव्हा ते आतल्या खोलीत वाट पाहत बसले होते. परंतु शमशोनाने त्याच्या दंडाला बांधलेले दोर धाग्याच्या तुकड्यासारखे तोडून टाकले. 13दलीला शमशोनाला म्हणाली, “आतापर्यंत तुम्ही मला फसवत आणि माझ्याशी लबाड्याच करत आला आहात. तुमच्यावर कशाने मात करता येईल, हे मला सांगा.” तेव्हा त्याने तिला सांगितले, जर तू “माझ्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागाबरोबर विणशील आणि नंतर विणकाराच्या फणीच्या नखात वळवशील तर मी इतर मनुष्यासारखा होईन.” 14तो झोपला तेव्हा तिने त्याचे केस विणकाराच्या फणीमध्ये धाग्यांबरोबर ताणून बांधले आणि नंतर मागावर विणले; आणि ती त्यास म्हणाली, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आलेत!” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला. 15ती त्यास म्हणाली, “तुमचे रहस्य जर तुम्ही मला सांगत नाहीतर, मी तुझ्यावर प्रेम करतो, असे तुम्ही कसे म्हणू शकता? तीन वेळा तुम्ही माझी थट्टा केली, आणि आपले महान बळ कशात आहे हे मला सांगितले नाही.” 16तिने आपल्या बोलण्याने त्याच्यावर दडपण आणले आणि कटकट करून त्यावर असा दबाव आणला की, त्यास मरून जावेसे वाटू लागले. 17म्हणून शमशोनाने तिला सर्वकाही सांगितले, आणि म्हणाला, “माझ्या डोक्यावरचे केस कापण्यासाठी कधीच वस्तरा फिरविला गेला नाही; कारण मी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासून देवाचा नाजीर आहे; जर माझे मुंडन झाले, तर माझे बळ मजपासून जाईल, आणि मी अशक्त होऊन इतर मनुष्यांसारखा होईन.” 18जेव्हा दलीलाने पाहिले त्याने आपले सर्वकाही सत्य सांगितले तेव्हा; तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांस बोलावणे पाठवले म्हणाली, “पुन्हा या, कारण त्याने मला सर्वकाही सांगितले आहे.” तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी आपल्या हाती रुपे घेऊन तिच्याकडे गेले. 19मग तिने त्यास आपल्या मांडीवर गाढ झोपवले. नंतर तिने मनुष्यास बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटा कापल्या. तिने त्यास ताब्यात आणण्यास सुरवात केली, आणि त्याचे बळ त्याच्यातून निघून गेले. 20ती म्हणाली, “हे शमशोना, पलिष्टी तुजवर आले आहेत.” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा होऊन उठला म्हणाला, मी पहिल्या वेळेप्रमाणे बाहेर जाईन आणि अंग हालवून सुटेल. परंतु परमेश्वराने त्यास सोडले होते, हे त्यास कळले नाही. 21पलिष्ट्यांनी तर त्यास धरून त्याचे डोळे फोडून टाकले; नंतर त्यास खाली गज्जात नेऊन पितळेच्या बेड्यांनी जखडले. मग तो बंदिशाळेत धान्य दळीत असे. 22तथापि त्याचे मुंडन झाल्यांनतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले.
शमशोनाचा मृत्यू
23मग पलिष्ट्यांचे अधिकारी आपला देव दागोन याच्यासाठी मोठा यज्ञ अर्पण करावयास एकत्र जमले; कारण ते म्हणाले, “आमच्या देवाने आमचा शत्रू शमशोन आमच्या हाती दिला आहे.” 24तेव्हा लोकांनी त्यास पाहून त्यांच्या देवाची स्तुती केली; त्यांनी असे म्हटले की, “आमच्या देवाने, जो आमचा शत्रू त्याच्यावर, विजय मिळवला आहे आणि देशात आमचा नाश करणारा, ज्याने आमच्यातल्या पुष्कळांना मारले, त्यास आमच्या देवाने आमच्या हाती दिले आहे.” 25आणि ते जेव्हा आनंद साजरा करत होते तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही शमशोनाला बोलवा, म्हणजे तो आमची करमणूक करील.” तेव्हा त्यांनी शमशोनाला बंदिवानांच्या घरातून बोलावले, आणि तो त्यांच्यापुढे थट्टेचे पात्र झाला, आणि त्यांनी त्यास खांबांच्या मध्ये उभे केले होते. 26शमशोन त्याचा हात धरणाऱ्या मुलाला म्हणाला, “ज्या खांबांचा ह्या इमारतीला आधार आहे, ते मी चाचपावे म्हणून तू मला त्यांजवळ ने, म्हणजे मी त्याच्यावर टेकेन.” 27ते सभागृह तर पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते, आणि पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे होते; सुमारे तीन हजार स्त्री-पुरूष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते. 28तेव्हा शमशोनाने परमेश्वर देवाला हाक मारीत म्हटले, “हे प्रभू देवा, कृपाकरून माझी आठवण कर, आणि हे देवा, या वेळेस एकदाच मात्र कृपा करून मला बळकट कर; म्हणजे मी आपल्या दोन डोळ्यांविषयी पलिष्ट्यांचा एकदम सूड उगवून घेईन.” 29नंतर ज्या दोन मधल्या खांबांवर ते सभागृह उभे राहिलेले होते, आणि ज्यांचा त्यास आधार होता, त्यांच्यातला एक शमशोनाने आपल्या उजव्या हाताने आणि दुसरा आपल्या डाव्या हाताने धरला. 30तेव्हा शमशोन म्हणाला, “पलिष्ट्यांच्या बरोबर माझाही जीव जावो!” मग त्याने सर्व बळ एकवटून ते खांब ढकलले, आणि ते सभागृह त्या अधिकाऱ्यांवर व त्यातल्या सर्व लोकांवर पडले. अशा रीतीने तो जिवंत असताना त्याने जितके मारले होते, त्यांपेक्षाही त्याच्या मरणाच्या वेळी त्याने जे मारले ते अधिक होते. 31नंतर त्याचे भाऊ व त्याच्या पित्याचे घरचे सर्व लोक यांनी खाली जाऊन त्यास उचलून आणले, आणि त्यास नेऊन सरा व अष्टावोल यामध्ये त्याचा पिता मानोहा याच्या कबरेत पुरले; त्याने तर वीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
Currently Selected:
शास्ते 16: IRVMar
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.