YouVersion Logo
Search Icon

शास्ते 14

14
शमशोन आणि तिम्ना तेथील स्त्री
1नंतर शमशोन खाली तिम्ना नगरात गेला, आणि त्याने तिम्नामध्ये पलिष्ट्यांच्या मुलींमध्ये एक स्त्री पाहिली. 2तो जेव्हा माघारी आला तेव्हा त्याने आपल्या बापाला व आईला ह्याविषयी सांगितले, “मी तिम्नात पलिष्ट्यांची एक मुलगी पाहिली आहे; तर आता तुम्ही ती मला पत्नी करून द्या.” 3परंतु त्याचे आई व बाप त्यास म्हणाले, “तुझ्या नातेवाईकांत किंवा तुझ्या लोकांमध्ये कोणी मुली नाहीत काय, म्हणून तू बेसुंती पलिष्ट्यांतली पत्नी करून घ्यायला जात आहेस?” तथापि शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मजसाठी मिळवून द्या; कारण जेव्हा मी तिच्याकडे बघितले तेव्हाच मला ती पसंत पडली आहे.” 4परंतु ही तर परमेश्वराची इच्छा होती की पलिष्ट्यांबरोबर परस्पर विरोध व्हावा, त्याच्या आई आणि बापाला हे समजले नव्हते; कारण त्या वेळेस पलिष्टी इस्राएलावर राज्य करत होते. 5यानंतर शमशोन आणि त्याचे आईबाप खाली तिम्ना येथे जात होते, आणि तिम्नातल्या द्राक्षमळ्यांपर्यंत ते पोहचले, तेव्हा तेथे तरुण सिंह गर्जना करून आला आणि त्याच्या अंगावर येऊ लागला. 6तेव्हा परमेश्वराचा आत्मा अचानक त्याच्यावर आला, आणि त्याच्या हाती काही नसताही त्याने जसे करडू फाडावे, तसे सिंहाला सहजरीत्या फाडून टाकले; परंतु त्याने जे केले होते ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही. 7तो गेला आणि जाऊन त्या स्त्रीसोबत बोलला; आणि जेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले, तेव्हा शमशोनाला ती पसंत पडली. 8काही दिवसानंतर तो तिच्याशी लग्न करण्यास परत गेला, तेव्हा तो त्या सिंहाचे मृत शरीर पाहायला बाजूला वळला; आणि त्या सिंहाच्या मृत शरीरात मधमाश्यांचा थवा व मध तेथे त्याने पाहिला. 9त्याने तो मध आपल्या हाताने वर काढून घेतला आणि तो चालता चालता खात गेला, जेव्हा आपल्या आईबापाकडे आला तेव्हा त्याने त्यांनाही त्यातला काही दिला, आणि त्यांनी तो खाल्ला; परंतु त्यांना तो मध त्या सिंहाच्या मृत शरीरातून घेतला आहे हे त्याने सांगितले नाही. 10नंतर शमशोनाचा बाप ती स्त्री जिथे होती तिथे उतरून खाली गेला, आणि शमशोनाने तेथे मेजवानी दिली, कारण तरुण पुरुषांमध्ये तशी रुढी होती. 11तिच्या नातेवाईकांनी त्यास पाहताच त्याच्याबरोबर राहण्यासाठी त्यास तीस मित्र आणून दिले. 12मग शमशोन त्यांना म्हणाला, “आता मी तुम्हाला कोडे सांगतो; मेजवानीच्या सात दिवसात जर तुमच्यातील कोणी जर त्याचे उत्तर शोधून मला सांगितले, तर मी तुम्हाला तागाचे तीस झगे व कपड्यांचे तीस संच जोड देईन. 13परंतु जर तुम्हाला त्याचे उत्तर मिळाले नाही, तर, तुम्ही मला तागाचे तीस झगे व कपड्याचे तीस संच जोड द्यावे.” तेव्हा ते त्यास म्हणाले, “तुझे कोडे आम्हांला सांग, म्हणजे आम्ही ते ऐकू.” 14तो त्यास म्हणाला, खाणाऱ्यामधून खाण्याजोगे काही बाहेर निघते, बळकटातून काहीतरी गोड बाहेर निघते. परंतु तीन दिवसात तर त्याच्या पाहुण्यांना त्याचे उत्तर मिळाले नाही. 15नंतर चौथ्या #सातव्यादिवशी ते शमशोनाच्या पत्नीला म्हणाले, “तू आपल्या नवऱ्याकडून युक्तीने कोड्याचे उत्तर मिळवून आम्हांला सांग, नाही तर आम्ही तुला व तुझ्या वडिलाच्या कुटुंबाला जाळून टाकू; तुम्ही आम्हांला दरिद्री करण्यासाठी म्हणून बोलावले आहे काय?” 16तेव्हा शमशोनाची पत्नी त्याच्यासमोर रडून म्हणू लागली, “तुम्ही केवळ माझा द्वेष करता! माझ्यावर प्रीती करतच नाही. तुम्ही माझ्या लोकांस तर कोडे सांगितले आहे, परंतु त्याचे उत्तर मला सांगितले नाही.” परंतु शमशोन तिला म्हणाला, “पहा, मी आपल्या आईबापाला ते सांगितले नाही, तर तुला कसे सांगू?” 17मेजवानीच्या सातही दिवसांपर्यंत ती त्याच्याकडे रडतच होती; आणि सातव्या दिवशी त्याने तिला त्याचे उत्तर सांगितले, कारण तिने त्याच्यावर खूप दबाव आणला होता. मग तिने त्या कोड्याचे उत्तर तिच्या लोकांच्या नातेवाईकांना सांगितले. 18आणि सातव्या दिवशी सूर्य मावळण्यापूर्वी त्या नगरातल्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “मधापेक्षा गोड ते काय? सिंहापेक्षा बळकट काय आहे?” तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, “जर तुम्ही माझ्या कालवडीला नांगराला जुंपले नसते, तर तुम्हाला माझे कोडे उलगडता आलेच नसते.” 19नंतर परमेश्वराचा आत्मा एकाएकी सामर्थ्याने त्याच्यावर आला. शमशोन खाली अष्कलोन नगरास गेला आणि त्याने त्यांच्यातले तीस पुरुष मारले, त्यांना लुबाडून घेतले आणि त्याच्या कोड्याचे उत्तर सांगणाऱ्यांना त्याने ते कपड्यांचे जोड दिले; त्यास खूप राग आला होता, आणि तो त्याच्या वडिलाच्या घरी निघून गेला. 20इकडे शमशोनाची पत्नी त्याच्या जवळच्या मित्राला देऊन टाकण्यात आली.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in