YouVersion Logo
Search Icon

प्रेषि. 4

4
न्यायसभेपुढे पेत्र व योहान
1पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक परमेश्वराच्या भवनाची रखवाली करणाऱ्यांच्या सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले. 2कारण ते लोकांस शिक्षण देऊन येशूच्या द्वारे पुनरुत्थान असे उघडपणे सांगत होते म्हणून त्यांना फार संताप आला. 3तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना बंदिशाळेत ठेवले. 4तरी वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला; आणि विश्वास ठेवलेल्या पुरूषांची संख्या सुमारे पाच हजार होती.
5मग दुसऱ्या दिवशी असे झाले, की त्यांचे अधिकारी, वडील व नियमशास्त्र शिक्षक हे यरूशलेम शहरात एकत्र जमले. 6त्यामध्ये महायाजक हन्ना व कयफा, योहान, आलेक्सांद्र मुख्य याजकाचे जे सर्व नातेवाईक ते होते. 7त्यांनी पेत्र व योहानाला मध्ये उभे करून विचारले, “हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने, किंवा कोणत्या नावाने केले?” 8तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला असता, त्यांना म्हणाला, “अहो लोकांच्या अधिकाऱ्यांनो, आणि वडिलांनो, 9एका आजारी मनुष्यावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला याविषयी जर आमची चौकशी आज होत आहे? 10तर तुम्हा सर्वास व सर्व इस्राएल लोकांस हे माहित असावे, की ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मरण पावलेल्यामधून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य बरा होऊन येथे तुमच्यापुढे उभा राहिला आहे. 11जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला तो हाच आहे. 12आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल; असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.” 13तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत, हे जाणून त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले. 14तेव्हा तो बरा झालेला मनुष्य त्यांच्याजवळ उभा असलेला पाहून, यहूदी पुढाऱ्यांना त्यांच्याविरुद्ध काही बोलता येईना. 15मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले. 16ते म्हणाले, “या मनुष्यांस आपण काय करावे? कारण खरोखर यांच्याकडून प्रसिद्ध चमत्कार घडला आहे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वास माहित आहे; व ते आपण नाकारू शकत नाही. 17परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये, म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की, यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये.” 18मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका. 19परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, हे तुम्हीच ठरवा. 20कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आम्हास शक्य नाही.” 21तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी. हे त्यांना काहीच सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते. 22कारण ज्या मनुष्यावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता.
पेत्र व योहान आपल्या मित्रांकडे परत येतात
23तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर, ते आपल्या लोकांकडे आले आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हणले होते ते सर्व त्यांनी सांगितले. 24ते ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, “हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही ज्याने निर्माण केले तो तूच आहे. 25तुझा सेवक, आमचा पूर्वज दावीद, याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले, ‘राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या?
26प्रभूविरूद्ध व त्याच्या ख्रिस्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी एकत्र जमले.’
27कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक, येशू, ह्याच्याविरुद्ध या नगरात परराष्ट्रीय व इस्राएली लोक यांच्याबरोबर हेरोद व पंतय पिलात एकत्र झाले. 28यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे. 29तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे. 30तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भूते घडावी असे ही कर.” 31आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
समाईक निधी
32तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एकजिवाचा होता: आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामाईक होते. 33आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते, आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती. 34त्यांतील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घरांचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले. 35आणि ते प्रेषितांच्या पायाशी ठेवले, मग जसजशी कोणाला गरज लागत असे, तसतसे ते प्रत्येकाला वाटून देत असत.
36आणि कुप्र बेटाचा रहिवासी लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्णबा, म्हणजे उत्तेजन पुत्र असे नाव दिले होती. 37त्याची जमीन होती, ती त्याने विकून तिचा पैसा आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in