YouVersion Logo
Search Icon

प्रेषि. 1

1
विषय प्रवेश
1हे थियफिला, येशूने जे शिकवले आणि केले, व ज्या विषयी मी पहिल्या ग्रंथात नमुद केले, 2त्या दिवसापर्यंत जेव्हा तो वर घेतला गेला. या आज्ञा त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या प्रेषितांना दिल्या. 3मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत. हे दाखवून चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे, व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. 4नंतर तो त्यांच्याशी एकत्र असता त्याने त्यांना आज्ञा केली की, “यरूशलेम शहर सोडून जाऊ नका तर पित्याने देऊ केलेल्या, ज्या देणगी विषयी, तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पाहा. 5कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला खरा; थोडया दिवसानी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.”
येशूचे स्वर्गारोहण
मार्क 16:19, 20; लूक 24:50-53
6मग सर्वजण एकत्र जमले असताना शिष्यांनी येशूला विचारले, “प्रभूजी, याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” 7तो त्यांना म्हणाला, “पित्याने स्वतःच्या अधिकारात काळ व समय ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही. 8परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल, तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल, आणि यरूशलेम शहरात सर्व यहूदीया आणि शोमरोन प्रांतात, व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” 9असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले. 10नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले. 11आणि ते असे बोलले, “अहो गालीलकारांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे? तुम्ही त्यास जसे आकाशात जातांना पाहता तसाच तो परत येईल.”
बाराव्या प्रेषिताची नेमणूक
12मग यरूशलेम शहराजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर#साधारण 1 किलोमीटर असलेल्या जैतुनांच्या डोंगरावरून ते यरूशलेम शहरास परत आले. 13आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत जिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते, तिथे गेले. 14हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया, व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.
15त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये, सुमारे एकशेवीस मनुष्यांच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला, 16“बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तवले होते, ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. 17तो आपल्या मधलाच एक होता आणि त्यास या सेवेतल्या लाभाचा त्याचा वाटा मिळाला होता.” 18(त्याने आपल्या दुष्टाईची कृतीकरून मजुरीने शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले, व त्याची आतडी बाहेर पडली. 19हे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वांना कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत, असे नाव पडले आहे.) 20स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे की, त्याचे घर उजाड पडो, व त्यामध्ये कोणीही न राहो. आणि, त्याचा हुद्दा दूसरा घेवो.
21म्हणून, प्रभू येशू, आमच्यामध्ये आत बाहेर येत जात होता त्या सर्व काळात, 22योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले, त्या दिवसापर्यंत तर जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. 23तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते, तो बर्सबा म्हटलेला योसेफ व मत्थिया, या दोघांना त्यांनी पुढे आणले. 24मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वाची हृदये जाणणाऱ्या प्रभू, 25हे सेवकपद व प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव.” 26मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्यास अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in