YouVersion Logo
Search Icon

1 तीम. 6

6
दास
1जे सर्व दास म्हणून जुवाखाली आहेत तितक्यानी आपापल्या मालकास सर्व सन्मानास योग्य मानावे यासाठी की देवाचे नाव आणि शिकवण यांची निंदा होऊ नये. 2आणि ज्यांचे मालक विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अपमान करू नये तर अधिक आदराने दास्य करावे कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत या गोष्टी शिकवून बोध कर.
खोटे शिक्षण व खरी संपत्ती ह्यांविषयी
3जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभू याची जी सुवचने आणि देवाच्या सेवेचे शुद्ध शिक्षण मान्य करीत नाही 4तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्यास काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क ही होतात. 5मन बिघडलेल्या व खरेपण विरहित झालेल्या भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्यांची सतत भांडणे होतात, त्यांच्यापासून दूर राहा. 6वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे. 7कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही. 8जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे. 9पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात. 10कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे.
सदबोध
11हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग. 12विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस, 13जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो. 14आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत निष्कलंक आणि निर्दोष रहावे म्हणून ही आज्ञा पाळ. 15जो धन्यवादीत, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, 16ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाली दाखवील, त्यास सन्मान व सार्वकालिक सामर्थ्य आहे. आमेन. 17या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी. 18चांगले ते करावे, चांगल्या कृत्यात धनवान, उदार व परोपकारी असावे. 19जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा.
20तीमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “विद्या” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा. 21ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून बहकून गेले आहेत देवाची कृपा तुम्हाबरोबर असो.

Currently Selected:

1 तीम. 6: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in