YouVersion Logo
Search Icon

1 करिं. 3

3
पक्षाभिमानी वृत्तीचा निषेध
1बंधूंनो, आत्मिक लोकांशी बोलावे तसा मी तुमच्याशी बोलू शकलो नाही. पण त्याऐवजी मला तुमच्याशी दैहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकांसारखे बोलावे लागले. 2मी तुम्हास पिण्यासाठी दूध दिले, जड अन्न दिले नाही कारण तुम्ही जड अन्न खाऊ शकत नव्हता व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही. 3तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाहीत काय व जगातील लोकांसारखे चालत नाही काय? 4कारण जेव्हा एक म्हणतो, “मी पौलाचा आहे,” आणि दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही साधारण मानवच आहात की नाही? 5तर मग अपुल्लोस कोण आहे? आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, प्रत्येकाला प्रभूने जे काम नेमून दिले त्याप्रमाणे ते आहेत. 6मी बी लावले, अपुल्लोसाने त्यास पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. 7तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणाराही काही नाही, पण वाढविणारा देव हाच काय तो आहे. 8जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत आणि प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजूरी मिळेल. 9कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.
शिक्षकांवरील जबाबदारी
10देवाच्या कृपेद्वारे जे मला दिले आहे त्याप्रमाणे मी सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधीत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत, ह्याविषयी प्रत्येकाने काळजी घ्यावी. 11येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया आहे, त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही. 12जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो, 13तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा करील. 14ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल, त्यास प्रतिफळ मिळेल. 15पण एखाद्याचे काम जळून जाईल व त्याचे नुकसान होईल तथापि तो स्वतः तारला जाईल परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.
16तुम्ही देवाचे निवासस्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये निवास करतो हे तुम्हास माहीत नाही काय? 17जर कोणी देवाच्या निवासस्थानाचा नाश करतो तर देव त्या व्यक्तीचा नाश करील; कारण देवाचे निवास्थान पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.
18कोणीही स्वतःला फसवू नये, जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टीने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे. 19कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे; कारण असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की,
“देव ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो.”
20आणि पुन्हा
“परमेश्वर जाणतो की, ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत.”
21म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारू नये कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत. 22तर तो पौल किंवा अपुल्लोस किंवा केफा, जग, जीवन किंवा मरण असो, आताच्या गोष्टी असोत अथवा येणाऱ्या गोष्टी असोत, हे सर्व तुमचे आहे. 23तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.

Currently Selected:

1 करिं. 3: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in