YouVersion Logo
Search Icon

मीखा 1

1
शोमरोन व यरुशलेमसाठी शोक
1यहूदाचे राजे योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या कारकिर्दित मीखा मोरष्टी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले; शोमरोन व यरुशलेम ह्यांविषयी त्याने जे पाहिले ते हे :
2सर्व राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; अगे पृथ्वी तू व तुझ्यावरील सर्व वस्तुजात ह्यांनी कान द्यावा; प्रभू परमेश्वर, आपल्या पवित्र मंदिरातून प्रभू, तुमच्याविरुद्ध साक्ष देतो,
3कारण पाहा, परमेश्वर आपल्या स्थानाहून येतो, खाली उतरतो व पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालत जातो.
4अग्नीपुढे मेण वितळते अथवा उतरणीवर ओतलेले पाणी वाहते, तसे पर्वत त्याच्या खाली विरघळतात व खोरी फाटतात.
5याकोबाच्या अपराधामुळे, इस्राएल घराण्याच्या पातकामुळे हे सर्व होते. याकोबाचा अपराध कोणता? शोमरोन नव्हे काय? यहूदाची उच्च स्थाने कोणती? यरुशलेम नव्हे काय?
6ह्यामुळे मी शोमरोनास शेतातील दगडांच्या ढिगारासारखे करीन; तिला द्राक्षीच्या मळ्यासारखे करीन; मी तिचे दगड खोर्‍यात फेकून देईन, तिचे पाये उघडे करीन.
7तिच्या सर्व कोरीव मूर्तींचे फोडून तुकडे करण्यात येतील; तिच्या व्यभिचाराची सर्व कमाई अग्नीने जाळण्यात येईल; तिच्या सर्व मूर्तींची मी नासधूस करीन; वेश्येच्या कमाईने तिने त्या मिळवल्या म्हणून वेश्येची कमाई अशा त्या पुनरपि होतील.
8ह्यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडानागडा फिरेन, मी कोल्ह्यांसारखा ओरडेन व शहामृगांसारखा विव्हळेन.
9कारण तिच्या जखमा असाध्य आहेत; हे अरिष्ट यहूदापर्यंत आले आहे, माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत, यरुशलेमेपर्यंत आले आहे.
10गथात हे कळवू नका, मुळीच रडू नका; बेथ-ले-अफ्रात (धुळीच्या गृहात) मी धुळीत लोळलो.
11शाफीरच्या (सुंदर नगराच्या) रहिवासिणी, नग्न होऊन, लज्जा सोडून चालती हो; सअनानाची रहिवासीण बाहेर निघाली नाही; बेथ-एसलाचा शोक हा तुमच्या विपत्तीचा शेवट नाही.
12कारण परमेश्वरापासून यरुशलेमेच्या वेशीवर संकट आले म्हणून मारोथाची रहिवासीण कल्याण होण्याच्या उत्कंठेने स्फुरण पावत आहे.
13लाखीशाच्या रहिवासिणी, रथास वेगवान घोडे जोड; सीयोनकन्येच्या पापाचा आरंभ तिच्यापासून झाला; कारण इस्राएलाचे अपराध तुझ्या ठायी आढळले.
14म्हणून तुला मोरेशेथ-गथ सोडून जाताना देणगी द्यावी लागेल; अकजीबाची घरे इस्राएलाच्या राजांना फसवणारी होतील.
15मोरेशेच्या रहिवासिणी, मी तुला दुसरा वतनदार आणीन; इस्राएलाचे गौरव अदुल्लामास येईल.
16तू आपले डोके भादर, तुझ्या लाडक्या मुलांमुळे केसांचे वपन कर, गिधाडाप्रमाणे आपल्या डोक्याचे टक्कल वाढव; कारण ती बंदिवान होऊन तुझ्यापासून गेली आहेत.

Currently Selected:

मीखा 1: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy