YouVersion Logo
Search Icon

लूक 22

22
यहूदाने केलेला विश्वासघात
1बेखमीर भाकरीचा सण, ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला होता.
2तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा ह्याविषयी विचार करत होते; कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
3तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला;
4तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले.
5तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला.
6त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.
शेवटल्या भोजनाची तयारी
7नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला.
8तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले की, “आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.”
9ते त्याला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?”
10त्याने त्यांना सांगितले, “पाहा, तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हांला भेटेल; तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्यामागून जा;
11आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, ‘गुरूजी तुम्हांला विचारतात, मला माझ्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे?’
12मग तो तुम्हांला सज्ज केलेली मोठी माडी दाखवील; तेथे तयारी करा.”
13तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले; आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
शेवटले भोजन
14नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले.
15तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती;
16कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.”
17मग प्याला हातात घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपणांमध्ये ह्याची वाटणी करा;
18कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही.”
19मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे; ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.”
20त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे.
21पण पाहा, मला धरून देणार्‍याचा हात माझ्याबरोबर मेजावर आहे.
22मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा; परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार!”
23तेव्हा आपल्यापैकी जो असे करणार आहे तो कोण असावा, ह्याचा ते आपसांत विचार करू लागले.
खरा मोठेपणा
24आणखी, आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीही त्यांच्यामध्ये वाद झाला.
25तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात;
26परंतु तुम्ही तसे नसावे; तर तुमच्यामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणार्‍यासारखा असावा.
27मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुमच्यामध्ये सेवा करणार्‍यासारखा आहे.
28माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात.
29जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हांला नेमून देतो.
30ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.”
पेत्र आपणास नाकारील हे येशू आधीच सांगून ठेवतो
31मग प्रभू म्हणाला, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली;
32परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”
33तो त्याला म्हणाला, “प्रभूजी, मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे.”
34तो म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”
35आणखी त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला पिशवी, झोळी व पायतणे घेतल्याशिवाय पाठवले तेव्हा तुम्हांला काही उणे पडले का?” ते म्हणाले, “नाही.”
36त्याने त्यांना म्हटले, “पण आता तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी; तसेच झोळीही घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती विकत घ्यावी.
37मी तुम्हांला सांगतो ‘तो अपराध्यांत गणलेला होता’ असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्या ठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्याविषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”
38ते म्हणाले, “प्रभूजी पाहा, येथे दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “पुरे.”
गेथशेमाने बागेत येशू
39मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनांच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले.
40त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
41मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो दूर गेला; आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली,
42“हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”
43तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला.
44मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता.
45प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला तेव्हा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले.
46तो त्यांना म्हणाला, “झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा.”
येशूला अटक
47तो बोलत आहे इतक्यात पाहा, लोकसमुदाय आला, त्यात यहूदा नावाचा बारा जणांतला एक जण त्यांच्यापुढे चालत होता; तो येशूचे चुंबन घेण्यास त्याच्याजवळ आला.
48येशू त्याला म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय?”
49त्याच्यासभोवती जे होते ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी काय?”
50त्यांच्यातील एकाने प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला.
51तेव्हा येशूने म्हटले, “एवढे होऊ द्या!” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले.
52जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडील त्याच्यावर चालून आले होते त्यांना येशू म्हणाला, “जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तलवारी व सोटे घेऊन निघालात काय?
53मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे तरी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही; पण ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे.”
पेत्र येशूला नाकारतो
54मग त्यांनी त्याला पकडून चालवले व प्रमुख याजकाच्या घरी नेले; तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला.
55ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते, त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला.
56तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, “हाही त्याच्याबरोबर होता.”
57पण ते नाकारून तो बोलला, “बाई, मी त्याला ओळखत नाही.”
58काही वेळाने दुसर्‍या एकाने त्याला पाहून म्हटले, “तूही त्यांच्यातला आहेस.” पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही.”
59सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण खातरीपूर्वक म्हणू लागला, “खरोखर हाही त्याच्याबरोबर होता; हा गालीलीच आहे.”
60पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला समजत नाही.” असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आरवला.
61तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली; आणि ‘आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले.
62मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.
63ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते.
64त्यांनी त्याचे डोळे बांधून व त्याच्या थोबाडीत मारून त्याला विचारले, “अंतर्ज्ञानाने बोल, तुला कोणी मारले?”
65आणि नाना प्रकारचे अपशब्द बोलून त्यांनी त्याची निंदा केली.
मुख्य याजकांपुढे येशू
66मग उजाडल्यावर लोकांचे वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले; आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले,
67“तू ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.” त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही मुळीच विश्वास धरणार नाही;
68आणि मी विचारले तरी तुम्ही मला उत्तर देणार [व सोडणारही]नाही.
69तथापि ह्यापुढे ‘मनुष्याचा पुत्र’ सर्वसमर्थ ‘देवाच्या उजवीकडे बसेल.”’
70तेव्हा ते सर्व म्हणाले, “तर तू देवाचा पुत्र आहेस काय?” तो म्हणाला, “तुम्ही म्हणता की मी आहे.”
71तेव्हा ते म्हणाले, “आपल्याला साक्षीची आणखी काय गरज? आपण स्वतः ह्याच्या तोंडचे ऐकले आहे.”

Currently Selected:

लूक 22: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy