YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांस पत्र 1

1
नमस्कार
1इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे ह्यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून :
2देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
ईशस्तवन
3आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;
4त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले.
5त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते.
6त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे.
7त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे.
8सर्व ज्ञान व बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे.
9ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले;
10ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.
11आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत;
12ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी.
13तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे.
14देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या, खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे.
देवज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना
15म्हणून तुमच्या ठायी असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून,
16मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो; मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की,
17आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
18म्हणजे त्यामुळे तुमचे अंतश्‍चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्याने दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी,
19आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे.
ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्याने दिसून आलेले देवाचे सामर्थ्य
20त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले;
21आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले;
22त्याने सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले;
23हीच त्याचे शरीर; जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ती भरलेली आहे.1

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy