Logo ng YouVersion
Hanapin ang Icon

मार्क 13

13
मंदिराची धूळधाण व युगाचा अंत
1येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक त्याला म्हणाला, “गुरुवर्य, पाहा, काय हे चिरे व काय ह्या इमारती !”
2येशू त्याला म्हणाला, “ह्या भव्य इमारती तू पाहतोस ना? पाडला जाणार नाही, असा चिऱ्यावर चिरा तेथे राहणार नाही.”
3तो मंदिरासमोर ऑलिव्ह डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला खाजगीरीत्या विचारले, 4“ह्या गोष्टी कधी घडतील आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याची वेळ होईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल, हे आम्हांला सांगा.”
5येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. 6पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मी तो आहे, असे सांगून पुष्कळांना फसवतील. 7आणखी, तुम्ही लढायांविषयी व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका. ह्या गोष्टी होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होणार नाही. 8राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ आहे.
9तुम्ही स्वतःला सांभाळा. ते तुम्हांला न्यायसभांच्याा स्वाधीन करतील. सभास्थानांमध्ये तुम्हांला मारहाण केली जाईल. माझ्याकरता तुम्ही साक्ष द्यावी म्हणून राज्यपाल व राजांसमोर तुम्हांला उभे राहावे लागेल. 10परंतु प्रथम सर्व राष्ट्रांत शुभवर्तमानाची घोषणा होणे आवश्यक आहे. 11ते तुम्हांला धरून न्यायालयात नेतील, तेव्हा आपण काय बोलावे, ह्याविषयी अगोदर चिंता करू नका, तर त्या घटकेस जे काही तुम्हांला सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही तर बोलणारा पवित्र आत्मा आहे. 12त्या वेळी भाऊ भावाला व वडील मुलाला ठार मारण्याकरता धरून देतील. मुले आपल्या आईबापांवर उठतील व त्यांचा प्राणघात करवतील. 13माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील, त्याचा उद्धार होईल.
14मात्र जेथे ‘ओसाड अमंगल दुश्‍चिन्ह’ नसावे तेथे ते असलेले तुम्ही पाहालविाचकाने हे समजून घ्यार्वें तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. 15जो छपरावर असेल त्याने घरातून काही घेण्याकरता खाली उतरू नये किंवा आत जाऊ नये, 16जो शेतात असेल त्याने आपले कपडे घेण्याकरता घरी परत जाऊ नये. 17त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील किंवा अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! 18हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा; 19कारण देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झाल्या नाहीत व पुढे होणार नाहीत अशा हालअपेष्टांचे ते दिवस असतील. 20मात्र ते दिवस प्रभूने कमी केले नसते, तर कोणीही वाचला नसता. ज्यांना त्याने निवडले आहे, त्यांच्यासाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत.
21त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हणेल, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे’, किंवा ‘पाहा, ख्रिस्त तेथे आहे’, तर ते खरे मानू नका; 22कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुत गोष्टी दाखवतील. 23तुम्ही मात्र सावध राहा, मी अगोदरच तुम्हांला सर्व काही सांगून ठेवले आहे.
मनुष्याच्या पुत्राचे द्वितीय आगमन
24ही अरिष्टे येऊन गेल्यावर त्या दिवसांत सूर्य अंधकारमय होईल; चंद्र आपला प्रकाश देणार नाही. 25आकाशातून तारे गळून पडतील; आकाशातील शक्ती डळमळतील. 26तेव्हा मनुष्याचा पुत्र महान सामर्थ्याने व वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल. 27त्या वेळेस तो देवदूतांना चोहीकडे पाठवून पृथ्वीच्या परिसीमेपासून स्वर्गाच्या परिसीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील.
जागृतीची आवश्यकता
28अंजिराच्या झाडापासून एक धडा शिकून घ्या. त्याच्या कोवळ्या डाहळ्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला, हे तुम्हांला कळते. 29त्याचप्रमाणे ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा ती वेळ जवळ, अगदी प्रवेशद्वारांशी येऊन ठेपली आहे, हे तुम्हांला कळेल. 30मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो, ही पिढी नाहीशी होण्यापूर्वी हे सर्व घडेल. 31आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.
32त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांना नाही, पुत्राला नाही, तर केवळ पित्याला माहीत आहे. 33सावध असा. जागृत राहा कारण तो समय केव्हा येईल, ह्याची तुम्हांला कल्पना नाही. 34प्रवासाला जात असलेल्या एका माणसाने आपले घर सोडताना आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपालास जागृत राहण्याची आज्ञा करावी, तसे हे आहे, 35म्हणून जागृत राहा. घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे किंवा सकाळी, हे तुम्हांला माहीत नाही. 36नाही तर तो अचानक येईल व तुम्हांला झोपलेले पाहील. 37जे मी तुम्हांला सांगतो, तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”

Kasalukuyang Napili:

मार्क 13: MACLBSI

Haylayt

Ibahagi

Kopyahin

None

Gusto mo bang ma-save ang iyong mga hinaylayt sa lahat ng iyong device? Mag-sign up o mag-sign in