Logo ng YouVersion
Hanapin ang Icon

लूक 5

5
पहिल्या शिष्यांना पाचारण
1एकदा येशू गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा असताना लोकसमुदाय देवाचे वचन ऐकण्यासाठी त्याच्याजवळ गर्दी करीत होता. 2त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले. त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. 3त्या मचव्यांपैकी एक शिमोनचा होता. त्यावर चढून तो मचवा किनाऱ्यापासून थोडासा लोटावा,असे त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायास प्रबोधन करू लागला.
4आपले प्रबोधन संपविल्यावर त्याने शिमोनला म्हटले, “खोल पाण्यात हाकार आणि मासे धरण्यासाठी तुम्ही तुमची जाळी खाली सोडा.”
5शिमोनने त्याला उत्तर दिले, “गुरुवर्य, आम्ही सारी रात्र मेहनत केली परंतु काहीच धरले नाही, तरीदेखील आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” 6त्यांनी तसे केल्यावर माशांचा इतका मोठा थवा जाळ्यांत सापडला की, त्यांची जाळी फाटू लागली. 7दुसऱ्या मचव्यात असलेल्या साथीदारांनी येऊन आपणांस साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. ते आल्यावर दोन्ही मचवे माशांनी इतके भरले की, ते बुडू लागले. 8परंतु हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभो, माझ्यापासून लांब जा, मी एक पापी मनुष्य आहे.”
9त्यांनी धरलेल्या माशांचा थवा पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण आश्‍चर्यचकित झाले होते. 10तसेच शिमोनचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेसुद्धा आश्‍चर्यचकित झाले होते. येशू शिमोनला म्हणाला, “भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”
11मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर, सर्व काही सोडून देऊन, ते त्याचे अनुयायी झाले.
कुष्ठरोग्याला आरोग्यदान
12एकदा येशू एका गावी असता तेथे कुष्ठरोगाने भरलेला एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून विनंती केली, “प्रभो, आपली इच्छा असली, तर मला बरे करायला आपण समर्थ आहात.”
13तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” तत्काळ त्याचे कुष्ठ नाहीसे झाले. 14त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेने नेमून दिल्याप्रमाणे बलिदान अर्पण कर.”
15तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले. विशाल लोकसमुदाय त्याचे प्रबोधन ऐकायला व आपले रोग बरे करून घ्यायला जमत असत. 16मात्र तो एकांत स्थळी जाऊन प्रार्थना करीत असे.
पक्षाघाती मनुष्य
17एके दिवशी तो बोध करीत असताना गालीलमधील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया व यरुशलेम येथून आलेले परुशी व धर्मशास्त्राध्यापक तेथे बसले होते. रोग बरे करण्याचे सामर्थ्य येशूकडे होते. 18काही माणसांनी एका पक्षाघाती मनुष्याला खाटेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला. 19परंतु गर्दीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला छपरावरून येशूच्यासमोर खाटेसकट खाली उतरवले. 20त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, “मित्रा, तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे.”
21तेव्हा शास्त्री व परुशी असा विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्‍वराशिवाय पापांची क्षमा करणारा हा कोण?”
22येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपल्या मनात असे विचार का करीत आहात? 23‘तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे’ किंवा ‘उठून चाल’, ह्यातले कोणते म्हणणे सोपे आहे? 24तथापि पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार मनुष्याच्या पुत्राला आहे, हे तुम्हांला समजावे म्हणून” - तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला, - “मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन घरी जा.”
25तो लगेच त्यांच्यासमक्ष उठून ज्या खाटेवर तो पडून होता ती उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णन करीत आपल्या घरी गेला. 26ते सर्व अगदी थक्क झाले. त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते विस्मित होऊन म्हणाले, आज आम्ही विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.
लेवीला पाचारण
27त्यानंतर येशू बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” 28तो उठला व सर्व काही सोडून त्याच्यामागे गेला.
29नंतर लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्या वेळी जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय तेथे जेवायला बसला होता. 30काही परुशी व त्यांचे शास्त्री हे येशूच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता?”
31येशूने उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. 32मी नीतिमानांना नव्हे तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”
उपवासविषयक प्रश्न
33नंतर त्यांनी त्याला म्हटले, “योहानचे शिष्य वारंवार उपवास व प्रार्थना करतात, तसेच परुश्यांचेही शिष्य करतात परंतु आपले शिष्य खातपीत असतात.”
34येशूने त्यांना म्हटले, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे, तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपवास करायला लावता येईल काय? 35असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, त्या दिवसांत ते उपवास करतील.”
36येशूने त्यांना एक दाखलाही सांगितला:“कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावीत नाही. तसे केले तर नवीन फाडले जाते व नव्याचे ठिगळ जुन्याशी विसंगत दिसते. 37तसेच नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षारस बुधले फोडील, द्राक्षारस सांडेल व बुधल्यांचा नाश होईल. 38उलट, नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालणे आवश्यक असते. 39तसेच जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही कारण जुना चांगला आहे, असे तो म्हणतो.”

Kasalukuyang Napili:

लूक 5: MACLBSI

Haylayt

Ibahagi

Kopyahin

None

Gusto mo bang ma-save ang iyong mga hinaylayt sa lahat ng iyong device? Mag-sign up o mag-sign in