Chapa ya Youversion
Ikoni ya Utafutaji

मत्तय 10

10
येशू बारा शिष्यांना कामगिरीवर पाठवितात
1येशूंनी आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलाविले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला.
2त्यांच्या बारा प्रेषितांची नावे ही:
शिमोन ज्याला पेत्र असेही म्हणतात आणि त्याचा भाऊ आंद्रिया;
जब्दीचा पुत्र याकोब, त्याचा भाऊ योहान;
3फिलिप्प आणि बर्थलमय;
थोमा आणि मत्तय जकातदार;
अल्फीचा पुत्र याकोब आणि तद्दय;
4शिमोन कनानी आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने येशूंना विश्वासघाताने धरून दिले.
5येशूंनी बारा प्रेषितांना सूचना देऊन पाठविले: “गैरयहूदी लोकांकडे जाऊ नका किंवा शोमरोन्यांच्या कोणत्याही शहरात प्रवेश करू नका. 6इस्राएलांच्या हरवलेल्या मेंढराकडे जा. 7जात असताना, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे’ अशी घोषणा करा. 8आजार्‍यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या.
9“प्रवासाला जाताना कमरपट्ट्यात सोने, चांदी किंवा तांबे असे काहीही घेऊ नका. 10तुमच्या प्रवासासाठी थैली किंवा अधिक अंगरखा किंवा पायतण किंवा काठी घेऊ नका; कारण कामकरी अन्नास पात्र आहे. 11ज्या एखाद्या शहरात किंवा गावात तुम्ही प्रवेश कराल, त्यावेळी एखाद्या योग्य मनुष्याचा शोध करा आणि निघेपर्यंत त्याच्याच घरी राहा. 12एखाद्या घरात प्रवेश करताना शुभेच्छा द्या. 13ते घर योग्य असेल, तर तुमच्या आशीर्वादाप्रमाणे तिथे शांती नांदेल. पण याउलट परिस्थिती असली तर तुमचा आशीर्वाद तुम्हाकडे परत येईल. 14जर कोणी तुमचे स्वागत केले नाही किंवा तुमचे शब्द ऐकले नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून निघा आणि तुमच्या पायाची धूळ तिथेच झटकून टाका. 15मी तुम्हाला निश्चित सांगतो की, न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल.
16“मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरांसारखे निर्दोष असा. 17तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल. 18तुम्हाला माझ्या नावासाठी त्यांना व गैरयहूदीयांना साक्ष व्हावी म्हणून अधिकारी व राजांसमोर आणले जाईल. 19तुम्हाला अटक करून नेल्यावर न्यायालयासमोर काय बोलावे व कसे बोलावे याविषयी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला काय बोलावे ते सुचविले जाईल. 20कारण तुम्ही बोलणार नाही पण तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
21“भाऊ भावाला, पिता आपल्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील. 22माझ्यामुळे#10:22 माझ्यामुळे मूळ भाषेत माझा नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहतील, त्याचे मात्र तारण होईल. 23तुमचा एका शहरात छळ होऊ लागला की दुसर्‍या शहरात पळून जा. कारण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मानवपुत्र येण्याअगोदर इस्राएलाच्या नगरांमधून तुमचे फिरणे संपणारच नाही.
24“शिष्य गुरूपेक्षा थोर नाही, किंवा दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही. 25शिष्याने आपल्या गुरू सारखे असणे आणि दासाने आपल्या धन्यासारखे असणे पुरे आहे. जर घर प्रमुखाला बालजबूल#10:25 बालजबूल अर्थात् भुतांचा राजा म्हटले, तर घरच्या सभासदांना कितीतरी अधिक म्हणतील!
26“तुम्ही त्यांना भिऊ नका, जे प्रकट होणार नाही, असे काही झाकलेले नाही उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. 27आता मी तुम्हाला अंधारात सांगत आहे, ते दिवसाच्या प्रकाशात सांगा; जे मी तुमच्या कानात सांगत आहे, ते घराच्या धाब्यावरून जाहीर करा. 28जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात, परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात, त्या परमेश्वराचे मात्र भय धरा. 29दोन चिमण्या एका पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडणार नाही. 30आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. 31म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.
32“जो कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मीही त्याचा माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे स्वीकार करेन. 33जे मला लोकांसमोर नाकारतात, मीही त्यांना माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे नाकारेन.
34“मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे, अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालविण्यास आलो आहे.
35“ ‘मनुष्य आपल्या पित्याविरुद्ध,
मुलगी तिच्या आईविरुद्ध,
आणि सून तिच्या सासूविरुद्ध करण्यासाठी मी आलो आहे.
36मनुष्याचे शत्रू त्याच्या आपल्याच कुटुंबातील सदस्य असतील.’#10:36 मीखा 7:6
37“जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडीलांवर अधिक प्रेम करीत असेल, तर तो मला पात्र नाही; जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या पुत्र व कन्यांवर अधिक प्रेम करीत असेल, तर ते मला पात्र नाही. 38जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो मला पात्र नाही. 39कारण जो कोणी आपला जीव मिळवितो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल.
40“जे तुमचे स्वागत करतात, ते माझे स्वागत करतात, आणि जे माझे स्वागत करतात, ते ज्यांनी मला पाठविले त्यांचे स्वागत करतात. 41जो संदेष्ट्यांचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्यांचे प्रतिफळ मिळेल; जो कोणी नीतिमान व्यक्तीचा नीतिमान म्हणून स्वीकार करतो, त्याला नीतिमान व्यक्तीचे प्रतिफळ मिळेल. 42मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या लहानातील एकाला, जो माझा शिष्य आहे, त्याला पेलाभर थंड पाणी प्यावयास दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.”

Iliyochaguliwa sasa

मत्तय 10: MRCV

Kuonyesha

Shirikisha

Nakili

None

Je, ungependa vivutio vyako vihifadhiwe kwenye vifaa vyako vyote? Jisajili au ingia