Chapa ya Youversion
Ikoni ya Utafutaji

मार्क 3

3
साबाथ दिवशी आरोग्यदान
1येशू पुन्हा एकदा सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. 2येशूवर दोष ठेवावा म्हणून साबाथ दिवशी तो त्याला बरे करतो का, हे पाहायला काही लोक टपून बसले होते. 3त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “ऊठ, समोर उभा राहा.” 4नंतर त्याने लोकांना विचारले, “साबाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यांतून कोणते धर्मशास्त्रानुसार आहे?” पण ते गप्प राहिले. 5त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे खिन्न होऊन त्याने त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात पुढे कर.” त्याने हात पुढे केला आणि तो बरा झाला. 6मग परुशी लगेच बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी हेरोदच्या पक्षातील काही लोकांबरोबर मसलत करू लागले.
अनेकांना आरोग्यदान
7त्यानंतर येशू त्याच्या शिष्यांना घेऊन गालील सरोवराकडे निघून गेला. गालील व यहुदिया येथून पुष्कळ लोकांचा समुदाय त्यांच्या मागोमाग निघाला 8आणि यरुशलेम, इदोम व यार्देनच्या पलीकडचा विभाग, तसेच सोर व सिदोन ह्यांच्या आसपासचा परिसर, ह्यांतून मोठा लोकसमुदाय येशूच्या महान कार्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला. 9गर्दीमुळे स्वतः चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवायला सांगितले. 10त्याने अनेकांना बरे केले होते आणि जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करायला एकमेकांना ढकलत त्याच्याकडे जात होते. 11जेव्हा भुते त्याला पाहत तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत, “तू देवाचा पुत्र आहेस.”
12मात्र तो भुतांना ताकीद देऊन सांगत असे, “मला प्रकट करू नका.”
बारा प्रेषितांची निवड
13येशू डोंगरावर चढला व त्याच्या इच्छेनुसार त्याने ज्यांना बोलावले, ते त्याच्याकडे आले. 14-16आपल्याबरोबर राहण्यासाठी व संदेश द्यायला पाठवण्यासाठी, तसेच रोग बरे करायचा व भुते काढायचा अधिकार देण्यासाठी, त्याने बारा जणांना निवडले व त्यांना प्रेषित म्हणूनही संबोधिले. त्याने पुढील बारा जणांची नेमणूक केली:शिमोन (येशूने त्याला पेत्र हे नाव दिले); 17जब्दीचे मुलगे याकोब व योहान (येशूने त्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हे नाव दिले); 18अंद्रिया, फिलिप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी 19व येशूचा विश्वासघात करणारा यहुदा इस्कर्योत.
येशू आणि बालजबूल
20नंतर येशू घरी आला, तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की, येशूला व त्याच्या शिष्यांना जेवायलाही सवड होईना. 21हे ऐकून त्याचे आप्त त्याला घेऊन जायला आले कारण त्याला वेड लागले आहे, असे काही लोकांचे म्हणणे होते.
22तसेच यरुशलेमहून आलेले काही शास्त्री म्हणत होते की, त्याला बालजबूलने पछाडले आहे व त्या भुतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने तो भुते काढतो.
23तो त्यांना स्वतःजवळ बोलावून दाखले देऊन म्हणू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील? 24आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही. 25आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही. 26तसेच सैतानाच्या राज्यात फूट पडली तर तेही टिकणार नाही; त्याचा शेवट होईल.
27बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता कुणालाही लुटता येणार नाही, त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.
28मी तुम्हांला खरोखर सांगतो, लोकांना त्यांच्या सर्व पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणाची क्षमा होईल. 29परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याला क्षमा मुळीच मिळणार नाही कारण तो शाश्वत पापाचा दोषीठरतो.” 30त्याला भुताने पछाडले आहे, असे काही लोक म्हणत होते म्हणून त्याने हे उत्तर दिले.
येशूची आई व भाऊ
31येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून येशूला बोलावले. 32त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, “आपली आई व आपले भाऊ बाहेर आपल्याविषयी विचारपूस करत आहेत.”
33त्याने त्यांना उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?” 34जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ! 35जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”

Iliyochaguliwa sasa

मार्क 3: MACLBSI

Kuonyesha

Shirikisha

Nakili

None

Je, ungependa vivutio vyako vihifadhiwe kwenye vifaa vyako vyote? Jisajili au ingia