Chapa ya Youversion
Ikoni ya Utafutaji

मार्क 1

1
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचा संदेश
1देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ:
2यशया संदेष्ट्याने लिहिले आहे,
मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवीन.
तो तुझा मार्ग तयार करील.
3अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी:
‘प्रभूचा मार्ग तयार करा,
त्याच्या वाटा नीट करा.’
4त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करत बाप्तिस्मा देणारा योहान अरण्यात आला. 5यहुदिया प्रांतातील व यरुशलेम नगरातील कित्येक लोक त्याच्याकडे गेले आणि त्यांनी स्वतःची पापे कबूल करून योहानकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
6योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे व त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे. टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते. 7तो घोषणा करत म्हणे, “माझ्यापेक्षा अधिक समर्थ असा एक माझ्यामागून येत आहे. लवून त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही. 8मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु तो तुम्हांला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल.”
येशूचा बाप्तिस्मा
9त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलमधील नासरेथहून आला आणि योहानच्या हातून यार्देन नदीत त्याचा बाप्तिस्मा झाला. 10लगेच, पाण्यातून वर येत असताना, त्याला दिसले की, आकाश उघडले आहे व आत्मा कबुतरासारखा स्वतःवर उतरत आहे. 11आणि त्या वेळी आकाशातून वाणी झाली, “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.”
येशूची परीक्षा
12आत्म्याने येशूला लगेच अरण्यात नेले. 13तेथे सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो त्या ठिकाणी चाळीस दिवस राहिला. तेथे वनपशूदेखील होते. मात्र देवदूत त्याची सेवा करत होते.
येशूच्या जीवनकार्याची सुरुवात
14योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत गालीलमध्ये आला व म्हणाला, 15“काळाची परिपूर्ती झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्‍चात्ताप करा व शुभवर्तमानावर विश्वास ठेवा.”
पहिल्या शिष्यांना पाचारण
16एकदा गालील सरोवराजवळून जात असताना येशूला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते कोळी होते. 17येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” 18ते लगेच त्यांची जाळी सोडून येशूच्या मागे निघाले.
19तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचे मुलगे याकोब व योहान दिसले. ते त्यांच्या तारवात जाळी नीट करीत होते. 20त्याने त्यांनाही बोलावले. तेव्हा त्यांचे वडील जब्दी ह्यांना नोकरांबरोबर तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.
कफर्णहूममधील भूतग्रस्त
21येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमला गेले असता लगेच येशूने साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन प्रबोधन केले. 22त्याच्या प्रबोधनावरून लोक थक्क झाले कारण तो त्यांना शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत असे.
23त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात एक भूतग्रस्त मनुष्य आला 24आणि ओरडून म्हणाला, “हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस.”
25येशूने त्याला आदेश दिला, “गप्प राहा व ह्याच्यामधून बाहेर नीघ.”
26भुताने त्या माणसाला पिळून काढले व आक्रोश करीत ते त्याच्यातून निघून गेले. 27सर्व लोक इतके थक्क झाले की, ते एकमेकांना विचारू लागले, “हे आहे तरी काय? ही काय नवीन शिकवण आहे? हा भुतांनाही अधिकाराने आज्ञा करतो व ती त्याचे ऐकतात.”
28ही त्याची कीर्ती गालीलच्या परिसरात सर्वत्र वेगाने पसरली.
पेत्राची सासू व इतर रोगी
29सभास्थानातून निघाल्यावर लगेच येशू आणि त्याचे शिष्य, याकोब व योहान ह्यांना घेऊन शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले. 30शिमोनची सासू तापाने खाटेवर पडली होती. तिच्याविषयी त्यांनी येशूला ताबडतोब सांगितले. 31तो तिच्याजवळ गेला व त्याने तिला हात धरून उठवले. तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली.
32संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी व भूतग्रस्त लोकांना त्याच्याकडे आणले. 33सगळे नगर दाराशी लोटले. 34नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूतग्रस्तांना मुक्त केले. त्या भुतांनी येशूला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही.
प्रार्थनेसाठी एकान्त स्थळी
35दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस उठून येशू नगराबाहेर एकांतात गेला व तेथे तो प्रार्थना करू लागला. 36परंतु शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध घेऊ लागले. 37तो भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध घेत आहेत.”
38परंतु तो त्यांना म्हणाला, “आपण आसपासच्या गावांत जायला हवे. मला तेथेही प्रबोधन केले पाहिजे कारण ह्याच उद्देशाने मी आलो आहे.”
39म्हणूनच त्यांच्या सभास्थानांत प्रबोधन करत व भुते काढत तो सबंध गालीलमध्ये फिरला.
कुष्ठरोग्याला आरोग्यदान
40एकदा एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, “आपली इच्छा असली, तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात.”
41येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो.” 42लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. 43येशूने त्याला बजावून सांगितल्यानंतर लगेच पाठवून दिले. 44तो त्याला म्हणाला, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस पण जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि तू बरा झाला आहेस ह्याचा लोकांना पुरावा म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.”
45परंतु त्याने तेथून जाताना ती गोष्ट इतकी पसरवली आणि तिला प्रसिद्धी दिली की, येशूला उघडपणे कोणत्याही नगरात जाता येईना, म्हणून तो बाहेर रानात एकांत ठिकाणीच राहिला आणि लोक सगळीकडून त्याच्याकडे येत राहिले.

Iliyochaguliwa sasa

मार्क 1: MACLBSI

Kuonyesha

Shirikisha

Nakili

None

Je, ungependa vivutio vyako vihifadhiwe kwenye vifaa vyako vyote? Jisajili au ingia