Chapa ya Youversion
Ikoni ya Utafutaji

योहान 14

14
येशू - मार्ग, सत्य व जीवन
1“तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर श्रद्धा ठेवा आणि माझ्यावरही श्रद्धा ठेवा. 2माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. असे जर नसते तर मी तुम्हांला तसे सांगितले असते. 3जेथे मी आहे, तेथे तुम्हीही असावे म्हणून मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे मी पुन्हा येऊन तुम्हांला माझ्याजवळ नेईन. 4मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.”
5थोमा त्याला म्हणाला, “प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही, मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”
6येशूने त्याला म्हटले, “मी मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. 7मी कोण आहे, हे ज्याअर्थी आता तुम्ही ओळखले आहे, त्याअर्थी तुम्ही माझ्या पित्यालाही ओळखाल आणि आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.”
8फिलिप त्याला म्हणाला, “प्रभो, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला तेवढे पुरे आहे.”
9येशूने उत्तर दिले, “फिलिप, मी इतका दीर्घकाळ तुमच्याबरोबर असून तू मला अजूनही ओळखत नाहीस? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हांला पिता दाखवा, असे तू का म्हणतोस? 10मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू ठेवत नाहीस का? जे काही मी तुम्हांला सांगतो, ते मी स्वतःचे सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःचे कार्य करतो. 11माझ्यावर विश्‍वास ठेवा. मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे. नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्‍वास ठेवा. 12मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यांपेक्षाही मोठी कृत्ये करील, कारण मी पित्याकडे जात आहे. 13तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल, ते पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून मी करीन. 14तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल, ते मी करीन.
पवित्र आत्मा हे वरदान
15माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. 16मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, हेतू हा की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे. 17जग त्याला स्वीकारू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तुमच्यामध्ये वसती करील.
18मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे परत येईन. 19आता थोडा वेळ आहे. मग ह्यापुढे जग मला पाहणार नाही. तुम्ही मात्र मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. 20जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तुम्हांला समजेल की, मी माझ्या पित्यामध्ये आहे, तुम्ही माझ्यामध्ये आहात व मी तुमच्यामध्ये आहे.
21ज्याने माझ्या आज्ञा स्वीकारल्या आहेत व जो त्या पाळतो, तो माझ्यावर प्रीती करतो आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याच्यासमोर प्रकट होईन.”
22यहुदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “प्रभो, आपण स्वतः आमच्यासमोर प्रकट व्हाल आणि जगासमोर प्रकट होणार नाही हे कसे?”
23येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील आणि त्याच्यावर माझा पिता प्रीती करील व आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वसती करू. 24ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे.
25मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. 26ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या, त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.
27मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हांला देतो. जसे जग देते तशी मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका. 28मी आता जातो आणि तुमच्याकडे येईन, असे जे मी तुम्हांला सांगितले, ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असेल तर मी पित्याकडे जात आहे, ह्याचा तुम्हांला आनंद होईल, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. 29ते जेव्हा होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी मी तुम्हांला सांगितले आहे. 30ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा सत्ताधीश येत आहे. पण त्याची सत्ता माझ्यावर चालणार नाही. 31परंतु जगाने हे ओळखावे की, मी पित्यावर प्रीती करतो, म्हणून पिता जशी मला आज्ञा देतो, तसे मी करतो. उठा, आपण येथून निघू या.”

Iliyochaguliwa sasa

योहान 14: MACLBSI

Kuonyesha

Shirikisha

Nakili

None

Je, ungependa vivutio vyako vihifadhiwe kwenye vifaa vyako vyote? Jisajili au ingia