Лого на YouVersion
Икона за пребарување

मार्क 5

5
गरसा येथील भूतग्रस्त
1येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गरसा येथे आले. 2तो मचव्यातून उतरताच एक भूतग्रस्त माणूस दफनभूमीतून निघून त्याला भेटला. 3तो दफनभूमीत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते 4कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही त्याने साखळदंड व बेड्या तोडल्या होत्या. त्याला काबूत ठेवणे कुणालाही शक्य नव्हते. 5तो नेहमी रात्रंदिवस दफनभूमीत व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगड धोंड्यांनी स्वतःचे अंग ठेचून घेत असे.
6येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला 7आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परमोच्च परमेश्वराच्या पुत्रा, माझ्याकडून तुला काय हवे आहे? मी तुला विनंती करतो, मला छळू नकोस.” 8तो असे म्हणाला कारण येशू म्हणत होता, “अरे भुता, ह्या माणसातून नीघ.”
9येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. 10आम्हांला ह्या प्रदेशातून घालवू नकोस”,अशी तो येशूला कळकळीने विनंती करीत होता.
11तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. 12भुतांनी येशूला विनंती केली, “आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून आम्हांला पाठवून दे.” 13त्याने त्यांना परवानगी दिली. ती भुते निघून डुकरांत शिरली. सुमारे दोन हजार डुकरांचा तो संपूर्ण कळप वेगाने धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मेला.
14डुकरे राखणारे पळाले व त्यांनी नगरात व शेतामळ्यांत हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले, हे पाहायला लोक आले. 15ते येशूजवळ आल्यावर ज्यात सैन्य होते तो भूतग्रस्त बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला असा त्यांच्या दृष्टीस पडला. त्यांना भीती वाटली. 16घडलेला प्रकार ज्यांनी पाहिला होता, त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकिकत त्यांना सांगितली.
17तेव्हा “आपण आमच्या परिसरातून निघून जावे”, असे ते येशूला विनवू लागले.
18येशू मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला, “मला आपल्याबरोबर राहू द्या.”
19परंतु त्याने नकार देऊन त्याला म्हटले, “तू आपल्या घरी आप्तजनांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढे महान कार्य केले व तुझ्यावर कशी दया केली, हे त्यांना सांग.”
20तो निघाला आणि येशूने जे महान कार्य त्याच्यासाठी केले होते, ते दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला. हे पाहून सर्वांना आश्‍चर्य वाटले.
याईरची विनंती
21येशू मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे परत गेल्यावर त्याच्याभोवती सरोवराजवळ लोकांचा विशाल समुदाय जमला. 22तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. 23त्याने येशूला कळकळीने विनंती केली, “माझी लहान मुलगी अत्यंत आजारी आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.”
24तो त्याच्याबरोबर निघाला. पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती चोहीकडून गर्दी करत होते.
रक्‍तस्रावपीडित स्त्रीचा विश्‍वास
25बारा वर्षे रक्‍तस्रावाने पीडलेली एक स्त्री तेथे होती. 26तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून इलाज करून घेताना स्वतःजवळ होते नव्हते, ते सर्व खर्च करून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता उलट तिचा रोग बळावला होता. 27तिने येशूविषयी ऐकले होते म्हणून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या कपड्याला तिने स्पर्श केला, 28कारण ती म्हणत असे, “केवळ ह्याच्या वस्त्रांना मी स्पर्श केला तरी मी बरी होईन.”
29तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला आणि लगेच तिचा रक्‍तस्राव थांबला व आपण स्वतःच्या पीडेपासून बरे झालो आहोत, अशी तिला जाणीव झाली. 30स्वतःमधून शक्‍ती निघाली आहे, हे येशूने लगेच ओळखले आणि गर्दीकडे वळून म्हटले, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?”
31त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपल्याभोवती गर्दी करत आहे, हे आपण पाहता तरी आपण विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’”
32जिने हे केले होते तिला पाहायला त्याने सभोवार बघितले. 33ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले, ते जाणून भीतभीत व थरथर कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तान्त सांगितला. 34तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्‍त हो.”
याईरच्या मुलीला जीवदान
35तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरून काही जण येऊन त्याला म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास का देता?”
36परंतु त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता येशू सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस, फक्‍त विश्वास ठेव.” 37नंतर त्याने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही स्वतःबरोबर येऊ दिले नाही. 38ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व विलाप करणारे लोक ह्यांचा गलबला चाललेला येशूने पाहिला. 39तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.”
40ते त्याला हसू लागले, परंतु त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. मुलीचे आईवडील व स्वतःबरोबरचे तीन शिष्य ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो गेला. 41मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, “तलीथा कूम”, ह्याचा अर्थ “लहान मुली, मी तुला सांगतो, ऊठ.”
42लगेच ती मुलगी उठून चालू लागली. ती बारा वर्षांची होती. घडलेला हा प्रकार पाहून ते अत्यंत आश्‍चर्यचकित झाले. 43मात्र हे कोणाला कळता कामा नये, असे त्याने त्यांना निक्षून सांगितले व तिला खायला द्या, असे म्हटले.

Селектирано:

मार्क 5: MACLBSI

Нагласи

Сподели

Копирај

None

Дали сакаш да ги зачуваш Нагласувањата на сите твои уреди? Пријави се или најави се