Logo YouVersion
Icona Cerca

गणना 18

18
याजक व लेवी यांची कर्तव्ये
1याहवेह अहरोनाला म्हणाले, “पवित्रस्थानासंबंधी झालेल्या अन्यायास तू, तुझे पुत्र आणि तुझे घराणे जबाबदार असणार व याजकपणासंबंधीच्या अपराधासही तू व तुझे पुत्र जबाबदार असणार. 2तू व तुझे पुत्र कराराच्या नियमाच्या कोशापुढे जेव्हा सेवा करतात तेव्हा तुझ्याशी जडून व तुला मदत करण्यासाठी लेवी वंशातील, तुझ्या पूर्वजांच्या गोत्रातील तुझ्या बांधवांना आपल्यासोबत आण. 3ते तुला जबाबदार असणार व त्यांनी मंडपातील सर्व कर्तव्ये पार पाडावीत, परंतु त्यांनी पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ किंवा वेदीजवळ जाऊ नये. नाहीतर ते व तुम्हीही मृत व्हाल. 4त्यांनी तुझ्याशी जडून सभामंडपाच्या सेवेसंबंधी—म्हणजेच मंडपातील सर्व कामासंबंधी जबाबदार असावे—आणि जिथे तू असणार तिथे इतर कोणीही जवळ येऊ नये.
5“पवित्रस्थान व वेदीच्या सेवेसंबंधी तू जबाबदार असावे, यासाठी की इस्राएली लोकांवर माझा क्रोध पुन्हा भडकू नये. 6इस्राएली लोकांतून सभामंडपातील सेवाकार्य करण्यासाठी, याहवेहसाठी समर्पित म्हणून लेवी वंशातील तुझे सोबती तुझ्यासाठी भेट म्हणून निवडले आहेत. 7परंतु वेदी व आतील पडद्यासंबंधी केवळ तू व तुझ्या पुत्रांनीच याजक म्हणून पवित्रस्थानातील पडद्यामागील आणि वेदीवरील पवित्र सेवा करावी. याजकपणाची सेवा मी तुला भेट म्हणून देत आहे. इतर कोणीही जे पवित्रस्थानाच्या जवळ येतील त्यांना जिवे मारावे.”
याजक व लेवी यांच्यासाठी दाने
8याहवेह अहरोनाला म्हणाले, मला सादर केलेल्या अर्पणांवर मी स्वतः तुला प्रभारी नेमले आहे; सर्व पवित्र अर्पणे जी इस्राएली लोक मला देतात ती मी तुला व तुझ्या पुत्रांना तुमचा वाटा, तुमचा शाश्वत भाग म्हणून देत आहे. 9जो अग्नीपासून राखला जातो तो अर्पणातील परमपवित्र भाग तुझा व्हावा. परमपवित्र अर्पणे म्हणून ते माझ्यासाठी जे आणतात त्या सर्वांतून, ती अन्नार्पणे किंवा पापार्पणे किंवा दोषार्पणे असो, तो वाटा तुझा व तुझ्या पुत्रांचा आहे. 10जसे परमपवित्र वस्तूतील, तसे ते खावे; प्रत्येक पुरुषाने ते खावे, ते तुम्ही पवित्र मानावे.
11हे देखील तुझे असावे: इस्राएली लोकांच्या हेलावणीच्या अर्पणातील ज्या भेटी बाजूला काढून ठेवल्या जातात, त्या मी तुला व तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना तुमचा शाश्वत वाटा म्हणून देतो. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध असतील त्या प्रत्येकाने ते खावे.
12जैतुनाचे सर्वोत्तम तेल आणि सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याच्या हंगामाचे प्रथमफळ म्हणून याहवेहला लोक देतात ते मी तुला देत आहे. 13आपल्या भूमीचे सर्व प्रथमफळ लोक याहवेहकडे आणतात ते तुझे होईल. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध आहेत त्या प्रत्येकाने ते खावे.
14इस्राएलात याहवेहला समर्पित केलेली प्रत्येक वस्तू तुझी होईल. 15उदरातून जन्मलेले प्रत्येक प्रथम जन्मलेले संतान, जे याहवेहला अर्पिलेले आहेत, मग ते मनुष्याचे असो किंवा जनावरांचे, ते तुझे होतील. परंतु प्रत्येक प्रथम जन्मलेल्या पुत्राला व प्रत्येक अशुद्ध जनावराच्या नर वत्साला तू खंडणी भरून सोडवावे. 16ते एक महिन्याचे झाल्यावर, पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ठरवलेली खंडणीची किंमत जी पाच चांदीचे शेकेल,#18:16 अंदाजे 58 ग्रॅ. म्हणजेच वीस गेरा भरून त्यांची खंडणी भरावी.
17गाईचे, मेंढीचे व शेळीचे प्रथमवत्स यांची तू खंडणी भरू नये; ते पवित्र आहे. त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांची चरबी अन्नार्पण म्हणून जाळावी. हा याहवेहला संतोषविणारा सुगंध आहे. 18जसे ओवाळणीचा छातीचा भाग व उजवी मांडी तुझे आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे मांस सुद्धा तुझ्या वाट्याचे होईल. 19इस्राएली लोक याहवेहसाठी जी पवित्र अर्पणे आणतात, त्यातील जे काही बाजूला काढून ठेवले जाते, ते मी तुला आणि तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना शाश्वत वाटा म्हणून देत आहे. हा याहवेहसमोर तुझ्यासाठी व तुझ्या संतानांसाठी सर्वकाळचा मिठाच्या करार#18:19 जसे मीठ प्रत्येक भोजनाचा चिरस्थायी भाग आहे. त्याप्रमाणेच हा करारही चिरस्थायी असावा आहे.
20याहवेहने अहरोनाला म्हटले, “त्यांच्या देशात तुला वतन असणार नाही किंवा तुला त्यांच्यात कोणताही वाटा असणार नाही; इस्राएलमध्ये मी तुझा वाटा व तुझे वतन आहे.”
21लेवी वंश सभामंडपाची सेवा करताना जी कामे करतात त्याचा मोबदला म्हणून इस्राएलातून येणारा सर्व दशांश मी त्यांना त्यांचे वतन असे देत आहे. 22येथून पुढे इस्राएली लोकांनी सभामंडपाजवळ जाऊ नये, नाहीतर त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल व ते मरतील. 23लेवी लोक सभामंडपामध्ये सेवा करतील आणि त्याविरोधात केलेल्या अपराधाची जबाबदारी ते स्वतः वाहतील. येणार्‍या पिढ्यांपर्यंत हा सर्वकाळचा नियम असेल. इस्राएलमध्ये त्यांना वतन मिळणार नाही. 24त्याऐवजी इस्राएली लोक जो दशांश अर्पण म्हणून याहवेहला सादर करतात तो मी लेवींना वतन म्हणून देत आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दल मी म्हटले: “त्यांना इस्राएलमध्ये वतन नसणार.”
25याहवेह मोशेला म्हणाले, 26“लेवी लोकांशी बोल व त्यांना सांग: ‘इस्राएलातून जो दशांश मी तुम्हाला तुमचे वतन म्हणून देतो, जेव्हा तो तुम्हाला मिळतो, त्या दशमांशातील दहावा हिस्सा याहवेहचे अर्पण म्हणून सादर करावा. 27तुमचे अर्पण खळ्यातील धान्य किंवा द्राक्षकुंडातील रसाप्रमाणे तुमच्यासाठी गणले जाईल. 28याप्रकारे इस्राएलातून जो दशांश तुम्हाला मिळतो त्यातून तुम्ही सुद्धा आपले अर्पण याहवेहला सादर करावे. या दशमांशातील जो याहवेहचा वाटा तो तुम्ही अहरोन याजकाला द्यावा. 29तुम्हाला दिलेल्या प्रत्येक वस्तूतील सर्वोत्तम आणि अतिपवित्र भाग याहवेहचा भाग म्हणून तुम्ही सादर करावा.’
30“लेव्यांना सांग: ‘जेव्हा तुम्ही सर्वोत्तम भाग सादर करतात, ते तुमच्यासाठी खळ्यातील किंवा द्राक्षकुंडातील उत्पन्न गणले जाईल. 31बाकीच्या अर्पणातून तू व तुझ्या घराण्याने कोणत्याही ठिकाणी खावे, कारण सभामंडपातील तुमच्या सेवेसाठी असलेले ते तुमचे वेतन आहे. 32सर्वोत्तम भाग सादर केल्यामुळे तुम्ही याबाबतीत दोषी ठरणार नाही; मग तुम्ही इस्राएली लोकांची अर्पणे विटाळविणार नाही व तुम्ही मरणार नाही.’ ”

Attualmente Selezionati:

गणना 18: MRCV

Evidenzia

Copia

Confronta

Condividi

None

Vuoi avere le tue evidenziazioni salvate su tutti i tuoi dispositivi?Iscriviti o accedi