Logo YouVersion
Ikona vyhledávání

मार्क 16

16
येशूचे पुनरुत्थान
1साबाथनंतर मग्दालिया मरिया, याकोबची आई मरिया व सलोमे ह्यांनी जाऊन येशूच्या शरीराला लावण्याकरता सुगंधी द्रव्ये विकत घेतली. 2आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरीजवळ आल्या. 3त्या एकमेकींना म्हणत होत्या, “आपल्याकरता कबरीवरून शिळा कोण सरकवील?” 4त्यांनी वर पाहिले, तेव्हा ती शिळा एकीकडे सरकवलेली आहे, असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. 5त्या कबरीच्या आत गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या.
6तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका, क्रुसावर खिळलेल्या नासरेथकर येशूचा तुम्ही शोध घेत आहात ना? तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला ठेवले होते, ती ही जागा पाहा. 7जा. त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलमध्ये जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते, त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.”
8त्या कबरीतून बाहेर येऊन धावत निघाल्या. त्या शोकमग्न व भयभीत झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही कारण त्यांचा थरकाप उडाला होता.
[शिष्यांना येशूचे दर्शन
9आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रातःकाळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मग्दालिया मरियेला दर्शन दिले, हिच्यामधून त्याने सात भुते काढली होती. 10तिने जाऊन शोक करत व रडत असलेल्या येशूच्या सोबत्यांना हे वर्तमान सांगितले. 11परंतु तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता, हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही.
12ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण गावाकडे जात असताना त्यांच्यासमोर तो निराळ्या प्रकारे प्रकट झाला. 13त्यांनी जाऊन इतरांना सांगितले. परंतु त्यांनी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही.
14शेवटी अकरा जण जेवायला बसले असता त्यांच्यासमोरही तो प्रकट झाला. ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते, त्यांच्यावर ह्या अकरा जणांनी विश्वास ठेवला नाही म्हणून येशूने अविश्वास व अंतःकरणाचा कठोरपणा ह्यांविषयी त्यांची कानउघाडणी केली.
येशूचा अखेरचा आदेश
15त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जाऊन सर्व लोकांना शुभवर्तमानाची घोषणा करा. 16जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही त्याला दोषी ठरवण्यात येईल. 17विश्वास धरणाऱ्यांना ही चिन्हे करता येतील:ते माझ्या नावाने भुते काढतील, नव्या भाषा बोलतील; 18सर्प उचलतील, ते कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना बाधा होणार नाही व त्यांनी आजाऱ्यांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”
प्रभू येशूचे स्वर्गारोहण व शिष्यांचे कार्य
19ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे स्थानापन्न झाला. 20त्यांनी तेथून निघून शुभवर्तमानाची घोषणा सर्वत्र केली. त्या वेळी प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणाऱ्या चिन्हांद्वारे त्यांच्या संदेशाचे समर्थन करत होता.]
निराळ्या प्रकारचा शेवट
प्रस्तुत शुभवर्तमानाचा शेवट एका प्राचीन हस्तलिखितात अशा प्रकारे केलेला आढळतो:
9[त्या स्त्रियांनी जे काही पाहिले होते ते सर्व पेत्र आणि त्याचे सोबती ह्यांना सांगितले. 10ह्यानंतर स्वतः येशूने त्याच्या शिष्यांद्वारे तारणाचा पवित्र व शाश्वत संदेश जगभर पाठवला.]

Zvýraznění

Sdílet

Kopírovat

None

Chceš mít své zvýrazněné verše uložené na všech zařízeních? Zaregistruj se nebo se přihlas