मार्क 11
11
यरुशलेममध्ये येशूचा जयोत्सवाने प्रवेश
1मग ते यरुशलेमजवळ ऑलिव्ह डोंगराजवळ, बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहोचले. त्याने त्याच्या शिष्यांपैकी दोघांना पुढे पाठवताना असे सांगितले, 2“समोरच्या गावात जा, तेथे पोहोचताच तुम्हांला ज्याच्यावर कधीच कोणी बसले नाही, असे एक शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडून आणा. 3तुम्ही असे का करता, असे जर कोणी तुम्हांला विचारले, तर असे सांगा की, प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेच ते परत पाठवील.”
4ते निघाले. रस्त्यावर एका घराच्या दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले. ते त्यांनी सोडायला सुरुवात केली. 5तेथे उभ्या असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना विचारू लागले, “तुम्ही शिंगरू का सोडता?”
6येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी त्यांना उत्तर दिले आणि लोकांनी त्यांना नेऊ दिले. 7त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्याच्यावर त्यांची वस्त्रे पसरली, त्यानंतर येशू त्याच्यावर बसला. 8पुष्कळ लोकांनी त्यांची वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी शेतामळ्यांतून डहाळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या. 9पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! 10आमचा पूर्वज दावीद ह्याचे येणारे राज्य धन्य असो! ऊर्ध्वलोकी होसान्ना!”
11येशू यरुशलेममध्ये आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहून घेतले. परंतु दिवस मावळत आहे, हे पाहून तो बारा जणांबरोबर बेथानीस निघून गेला.
अंजिराचे निष्फळ झाड
12दुसऱ्या दिवशी ते बेथानी येथून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. 13पानांनी भरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. कदाचित झाडावर काही मिळेल, ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता. 14येशू त्या झाडाला म्हणाला, “कोणी ह्यापुढे तुझे फळ कधी न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते.
मंदिराचे शुद्धीकरण
15ते यरुशलेम येथे पोहोचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना तो बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली. 16त्याने कोणालाही मंदिराच्या आवारातून कसल्याही प्रकारची ने-आण करू दिली नाही. 17नंतर तो त्यांना शिकवू लागला व म्हणाला, “‘माझ्या मंदिराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनागृह म्हणतील’, असा धर्मशास्त्रलेख आहे ना! पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”
18मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी ते योजना आखू लागले; कारण सर्व लोक त्याच्या प्रबोधनावरून थक्क झाल्यामुळे ते त्याला भीत होते.
19संध्याकाळी येशू व त्याचे शिष्य शहर सोडून गेले.
विश्वासाचे सामर्थ्य
20दुसऱ्या दिवशी पहाटेस वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. 21तेव्हा पेत्राला त्याची आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरुवर्य, पाहा, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे!”
22येशूने त्यांना उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. 23मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी ह्या डोंगराला ‘तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा’, असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे अवश्य घडेल, असा विश्वास धरील, त्याच्याकरता ते केले जाईल. 24म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागता, ते आपल्याला मिळालेच आहे, असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल. 25आणखी, तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करायला उभे राहता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्यांना क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांला तुमच्या अपराधांची क्षमा करील. 26[परंतु तुम्ही जर क्षमा केली नाही, तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची तुम्हांला क्षमा करणार नाही.]”
येशूच्या अधिकाराविषयीचा प्रश्न
27ते पुन्हा यरुशलेम येथे आले. येशू मंदिरात चालत असताना मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, 28“तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”
29येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो. मला उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे, ते मी तुम्हांला सांगेन. 30योहानला बाप्तिस्मा देण्याचा अधिकार कोठून मिळाला? देवाकडून की माणसांकडून? ह्याचे मला उत्तर द्या.”
31ते आपसात विचार करू लागले. ‘देवाकडून म्हणावे तर तो म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ 32माणसांकडून म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती आहे, कारण सर्व लोक योहानला खरोखर संदेष्टा मानतात.” 33म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.”
येशू त्यांना म्हणाला, “तर मग मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकाराने करीत आहे, ते मीही तुम्हांला सांगत नाही.”
Právě zvoleno:
मार्क 11: MACLBSI
Zvýraznění
Sdílet
Kopírovat
Chceš mít své zvýrazněné verše uložené na všech zařízeních? Zaregistruj se nebo se přihlas
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.