Logo YouVersion
Ikona vyhledávání

लूक 2

2
येशूचा जन्म
1सर्व रोमन साम्राज्याची जनगणना व्हावी, असे सम्राट औगुस्त ह्याने फर्मान सोडले. 2क्विरीनिय हा सूरियाचा राज्यपाल असताना ही पहिली नावनोंदणी झाली. 3सर्व लोक आपापल्या गावी नावनोंदणी करण्यासाठी गेले.
4योसेफ हा दावीदच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलमधील नासरेथ गावाहून यहुदियातील दावीदच्या बेथलेहेम गावी गेला, 5नावनिशी लिहून देण्यासाठी जाताना त्याची वाग्दत्त वधू मरिया हिला त्याने बरोबर नेले. ती गरोदर होती. 6ती तेथे असताना तिच्या बाळंतपणाची घटका आली. 7तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती.
8त्याच परिसरात काही मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. 9त्या वेळी प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती उजळले. त्यांना फार भीती वाटली. 10परंतु देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका, ज्याच्यामुळे सर्व लोकांना अत्यानंद होणार आहे, असे सुवृत्त मी तुम्हांला सांगतो: 11तुमच्यासाठी आज दावीदच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे! 12तुम्हांला खूण ही की, बाळंत्यांत गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले बालक तुम्हांला आढळेल.”
13इतक्यात स्वर्गीय समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले,
14“स्वर्गात देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याची ज्यांच्यावर कृपा झाली आहे, त्यांना शांती.”
15देवदूत स्वर्गात गेल्यानंतर मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेम येथे जाऊ या. प्रभूने आपल्याला जी गोष्ट सांगितली आहे, ती प्रत्यक्ष पाहू या.”
16म्हणून ते त्वरेने निघाले व मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक हे त्यांच्या दृष्टीस पडले. 17त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे सांगण्यात आले होते, ते त्यांनी मरिया व योसेफ ह्यांना सांगितले. 18मेंढपाळांनी सांगितलेल्या वृत्तान्तावरून ऐकणारे सर्व जण थक्क झाले. 19परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टी तिच्या अंतःकरणात ठेवल्या व त्यांवर ती मनन चिंतन करीत राहिली. 20ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व घटना प्रत्यक्ष घडलेल्या ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले.
21आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्या बाळाचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने दिले होते.
मंदिरात समर्पण
22मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे शुद्धीकरणाचे दिवस जवळ आल्यावर बाळ प्रभूला समर्पित करावे म्हणून योसेफ व मरिया त्याला यरुशलेम येथे घेऊन गेले. 23म्हणजे ‘प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हणून गणला जावा’, असे जे नियमशास्त्रात लिहिले आहे, त्याप्रमाणे त्यांनी करावे, 24तसेच प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कबुतरांची जोडी किंवा पारव्यांची दोन पिले ह्यांचा यज्ञदेखील त्यांनी अर्पण करावा.
शिमोन व त्याचे स्तोत्र
25त्या समयी शिमोन नावाचा एक मनुष्य यरुशलेममध्ये राहात होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य होता. तो इस्राएलच्या मुक्तीची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्या सोबत होता. 26‘प्रभूच्या वचनदत्त ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही’, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. 27पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने शिमोन मंदिरात आला. नियमशास्त्रानुसार विधी करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले, 28तेव्हा त्याने येशू बाळाला आपल्या हातात घेऊन देवाचा गौरव करीत म्हटले,
29“हे प्रभो, तुझे वचन तू पाळले आहे.
आता आपल्या दासाला
शांतीने जाऊ दे;
30कारण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी
मी तुझे तारण पाहिले आहे.
31ते तू सर्व लोकांसमक्ष सिद्ध केले आहे.
32ते परराष्ट्रीयांना तुझी इच्छा
प्रकट व्हावी म्हणून प्रकाश
व तुझ्या इस्राएली लोकांचे वैभव आहे.”
33येशूविषयी जे हे सांगण्यात आले, त्यावरून त्याचे वडील व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. 34शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, “पाहा, इस्राएलमध्ये अनेकांचा नाश व उद्धार व्हावा म्हणून व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह व्हावे म्हणून परमेश्वराने ह्याची नियुक्ती केली आहे. 35त्यामुळे पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघड होतील व तुझ्या अंतःकरणात तलवार भोसकली जाईल.”
देवाचा संदेश देणारी हन्ना
36देवाचा संदेश देणारी हन्ना नावाची एक फार वयोवृद्ध स्त्री होती. ती आशेरच्या वंशातील फनुएलची मुलगी होती. ती सात वर्षे वैवाहिक जीवन जगली होती. 37आता ती विधवा चौऱ्याऐंशी वर्षांची होती. मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस आराधना करीत असे. 38तिने त्याच वेळी तेथे येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमच्या तारणाची वाट पाहत होते, त्या सर्वांना ती बाळाविषयी सांगू लागली.
येशूचे बालपण
39प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर ते गालीलमधील आपले गाव नासरेथ येथे परत गेले. 40ते बालक वाढत वाढत बलवान होत गेले, ज्ञानाने पूर्ण होत गेले व त्याच्यावर देवाची कृपा होती.
41त्याचे आईबाप दर वर्षी ओलांडण सणासाठी यरुशलेमला जात असत. 42येशू बारा वर्षांचा झाला, तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी तेथे गेले. 43सणाचे दिवस संपल्यावर ते परत जायला निघाले, तेव्हा त्यांचा मुलगा येशू यरुशलेममध्ये मागे राहिला, हे त्याच्या आईबापांना माहीत नव्हते. 44तो वाटेवरच्या सोबत्यांत असेल, असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे लोक ह्यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध घेतला. 45तो त्यांना सापडला नाही, तेव्हा ते त्याचा शोध घेत घेत यरुशलेमला परत गेले. 46तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न विचारताना सापडला. 47त्याची बुद्धिमत्ता व उत्तरे ह्यांवरून त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व थक्क झाले. 48त्याला तेथे पाहून त्याच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझे वडील व मी चिंताक्रांत होऊन तुझा शोध घेत परत आलो.”
49तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध घेत राहिलात हे कसे? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” 50परंतु त्याचे हे बोलणे त्यांना समजले नाही.
51नंतर तो त्यांच्याबरोबर नासरेथ येथे गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जतन करून ठेवल्या. 52येशू वयाने मोठा होत असता सुज्ञता, देवकृपा व लोकप्रियता ह्यांबाबतीतही वाढत गेला.

Právě zvoleno:

लूक 2: MACLBSI

Zvýraznění

Sdílet

Kopírovat

None

Chceš mít své zvýrazněné verše uložené na všech zařízeních? Zaregistruj se nebo se přihlas