रोमकरांना 6

6
ख्रिस्ताशी एकरूपता व पाप यांतील विरोध
1तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? 2मुळीच नाही! जे आपण पापाला मेलो ते ह्यापुढे त्यात कसे राहणार? 3किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? 4तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरलो गेलो, ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही उठून नवीन प्रकारच्या जीवनात चालावे.
5कारण आपण जर त्याच्या अशा मरणात त्याच्याशी जोडले गेलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानानेही निश्चितपणे त्याच्याशी जोडले जाऊ. 6हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाची गुलामी पत्करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर क्रुसावर खिळला गेला; 7कारण जो कोणी मरण पावतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान ठरतो. 8परंतु ख्रिस्ताबरोबर मरण पावल्यामुळे त्याच्याबरोबर आपण जिवंतही राहू, असा आपला विश्वास आहे. 9आपणास ठाऊक आहे की, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही 10आणि तो पापाला एकदाच मरण पावला असल्यामुळे मृत्यूची सत्ता त्याच्यावर चालत नाही. आता तो जगतो, तो देवासाठी जगतो. 11तर मग तसे तुम्हीही स्वतःस ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना.
12म्हणून तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन होऊ नये ह्यासाठी पापाने तुमच्या मर्त्य शरीरावर राज्य करू नये. 13तुम्ही यापुढे तुमचे अवयव दुष्टपणाची साधने म्हणून वापरू नका, परंतु तुमचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून देवाला अर्पण करा कारण तुम्हाला मरणातून जीवनाकडे आणण्यात आले आहे. 14तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीत, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पापाने तुमच्यावर सत्ता चालविता कामा नये.
गुलामगिरीविषयी केलेला बोध
15तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही! 16ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात,हे तुम्हांला ठाऊक नाही काय? ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे तुम्ही गुलाम आहात किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात? 17तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारची शिकवण तुम्ही स्वीकारली आहे, तिचे पालन तुम्ही मनापासून केले 18आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाला धन्यवाद! 19तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे. जसे तुम्ही आपले अवयव अमंगळपण व स्वैराचार करण्याकरिता वापरले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्वाला गुलाम म्हणून समर्पित करा.
20तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वासंबंधाने बंधमुक्त होता. 21तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त झाले? त्यांचा शेवट तर मरण आहे! 22परंतु आता तुम्ही पापांपासून मुक्त झाल्यामुळे तुम्ही देवाचे गुलाम आहात. ह्याचा फायदा म्हणजे तुम्ही पवित्र होता. त्याची परिणीती शाश्वत जीवनात होते. 23पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शाश्वत जीवन आहे.

Subratllat

Copia

Compara

Comparteix

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió