प्रेषि. 17
17
थेस्सलनीका येथे पौल
1नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया या शहरांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास शहरास गेले, तेथे यहूद्यांचे सभास्थान होते. 2तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रलेखावरून वादविवाद केला. 3त्यांने शास्त्रलेखाचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मरण पावलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे. 4तेव्हा त्याच्यापैकी काही जणांची खातरी होऊन पौल सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि ग्रीक उपासक ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला, त्यामध्ये प्रमुख स्त्रिया काही थोड्या थोडक्या नव्हत्या. 5परंतु यहूद्यांनी हेव्याने आपणाबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरांत घबराट निर्माण केली आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोंकाकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली. 6परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरड करीत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत. 7त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्वजण कैसराच्या आज्ञेविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात. 8हे ऐकवून त्यांनी लोकांस व शहराच्या अधिकाऱ्यास खवळून सोडले. 9मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.
बिरुया येथे पौल
10नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लागलेच रातोरात बिरुया शहरास पाठवले, ते तेथे पोहचल्यावर यहूदयांचे सभास्थानात गेले. 11तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोंकापेक्षा मोठया मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रलेखात दररोज शोध करीत गेले. 12त्यातील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रिया व पुरूष ह्यांनी विश्वास ठेवला. 13तरीही पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकांतल्या यहूद्यांना समजले तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांस खवळून चेतविले. 14त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहीले. 15तेव्हा पौलाला पोहचविणाऱ्यांनी त्यास अथेनैपर्यंत नेले आणि सीला व तीमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेउन ते निघाले.
अथेनै येथे पौल
16पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. 17ह्यामुळे तो सभास्थानात यहूदयांबरोबर व उपासक लोकांबरोबर आणि बाजारात जे त्यास आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालीत असे. 18तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्यास विरोध केला, कित्येक म्हणाले, “हा बडबड्या काय बोलतो?” दुसरे म्हणाले, “हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो” कारण येशू व पुनरुत्थान ह्याविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे. 19नंतर त्यांनी त्यास धरून अरियपग टेकडीवर नेऊन म्हटले, “तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय हे आम्हास समजून सांगाल काय? कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवत आहा; ह्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. 20कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवित आहा; त्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.”
21काहीतरी नवलविशेष सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.
अरीयपगात पौलाने केलेले भाषण
22तेव्हा पौल अरियपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्वबाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते. 23कारण मी फिरता फिरता तुमच्या उपासनेच्या वस्तू पाहतांना, अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हास जाहीर करतो. 24ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या इमारतीत राहत नाही. 25आणि त्यास काही उणे आहे, म्हणून मनुष्यांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो. 26आणि त्याने एकापासुन मनुष्यांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबध पाठीवर रहावे असे केले आहे; आणि त्याचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत. 27यासाठी की, त्यांनी देवाचा शोध या आशेने करावा आणि त्यास कसे तरी प्राप्त करून घ्यावे, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. 28कारण आपण त्याच्याठायी जगतो, वागतो व आहोत तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हणले आहे की, आपण वास्तविक त्याचा वंश आहोत.
29तर मग आपण देवाचे वंशज असतांना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. 30अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो मनुष्यांना आज्ञा करतो. 31त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेला मनुष्य येशू याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वास पटवले आहे.
32तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले, कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.” 33इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. 34तरी काही मनुष्यांनी त्यास चिटकून राहून विश्वास ठेवला; त्यामध्ये दिओनुस्य अरिय-पगकर, दामारी नावांची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.
S'ha seleccionat:
प्रेषि. 17: IRVMar
Subratllat
Copia
Compara
Comparteix
Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.