2 करिं. 11

11
प्रेषित म्हणून त्याचा हक्क
1माझी इच्छा आहे की, तुम्ही माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन करावा. पण तो तुम्ही सहन करीतच आहात. 2कारण मी देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेशी आहे, मी एका पतीबरोबर तुमची मागणी केली आहे, अशा हेतूने की, तुम्हास शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. 3पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुद्ध भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील. 4कारण, जर कोणीही येऊन, आम्ही ज्याची घोषणा केली नाही अशी दुसर्‍या येशूची घोषणा केली किंवा तुम्हास मिळाला नव्हता असा दुसरा आत्मा तुम्ही स्वीकारता किंवा तुम्ही स्वीकारले नाही असे दुसरे शुभवर्तमान तुम्ही स्वीकारता तर तुम्ही त्यांचे सहन करता. 5पण मला वाटते मी अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी नाही. 6आणि मी भाषण करण्यात अशिक्षित असलो तरी ज्ञानात नाही. आम्ही हे तुम्हास सर्व गोष्टीत, सर्व प्रकारे, प्रकट केले.
7तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणाला नीच केले म्हणजे मी देवाचे शुभवर्तमान तुम्हास फुकट सांगितले यामध्ये मी पाप केले काय? 8तुमची सेवा करण्यासाठी मी दुसऱ्या मंडळ्यांकडून वेतन घेऊन त्यांना लुटले. 9आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही कारण मासेदोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरविली आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन. 10ख्रिस्ताचे सत्य माझ्यामध्ये आहे म्हणून मी सांगतो की, अखया प्रांतात कोणीही माझ्या आभिमानास विरोध करणार नाही. 11आणि का? कारण मी तुम्हावर प्रिती करीत नाही काय? देव जाणतो की, मी तुमच्यावर प्रीती करतो.
12आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे कारण पाहिजे आहे ते मी त्यांच्यासाठी ठेवू नये. ते त्यांना ह्यासाठी हवे आहे की, ते ज्या कामात अभिमान मिरवतात त्यामध्ये ते आमच्यासारखे दिसावेत. 13कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत. 14आणि यामध्ये आश्चर्य नाही कारण सैतानदेखील तेजस्वी दूताचे रुप धारण करतो. 15म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रुप धारण करतात त्यामुळे त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल.
पौल व त्याचे विरोधी ह्यांची तुलना
16मी पुन्हा म्हणतोः कोणीही मला मूढ समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा. यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन. 17मी हे बोलत आहे ते प्रभूला अनुसरून बोलत नाही. तर या अभिमानाच्या धीटपणाने, जणू मूर्खासारखे बोलतो. 18जसे बरेच लोक दैहिक गोष्टीविषयी अभिमान मिरवतात, तसा मी पण अभिमान मिरवीन.
19तुम्ही शहाणे असल्याने मूढांचे आनंदाने सहन करता! 20वस्तुतः जे कोणी तुम्हास दास करते किंवा छळ करते किंवा तुमचा गैरफायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते तरी तुम्ही त्यांचे सहन करता.
पौलाने सोसलेली संकटे व अडचणी
21स्वतःला हिणवून मी हे बोलतो, तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो).
22ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीहि आहे. ते अब्राहामाचे संतान आहेत काय? मीहि आहे. 23ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे. 24पाच वेळेला यहूद्यांकडून मला चाबकाचे एकोणचाळीस फटके#चाळीस वजा एक बसले. 25तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व दिवस घालविला. 26मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देशबांधवांकडून धोका होता. परराष्ट्रीय लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रातील धोके होते, विश्वास ठेवणाऱ्या खोटया बंधूंकडून आलेले धोके होते. 27मी कष्ट केले आणि घाम गाळला व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक व तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी उपाशी राहिलो, थंडीत उघडा असा मी राहिलो, 28या सर्व गोष्टीशिवाय दररोज माझ्यावर येणार दबाव म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता. 29कोण दुर्बळ झाला असता तर मी दुर्बळ होत नाही काय? कोण दुसऱ्याला पापात पाडण्यास कारण होतो आणि मला संताप होत नाही?
30जर मला अभिमान बाळगायचा असेल तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टीविषयी अभिमान बाळगीन. 31देव आणि प्रभू येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुती केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. 32दिमिष्क नगरात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला अटक करण्यासाठी दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा दिला होता. 33पण मला टोपलीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.

Subratllat

Copia

Compara

Comparteix

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió