रोमकरांना 11
11
इस्राएली लोकांचा शेष भाग
1तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? मुळीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामच्या कुळातला, बन्यामिनच्या वंशातला आहे. 2ज्यांची त्याने सुरुवातीपासून निवड केली, त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. एलियाच्या बाबतीत धर्मशास्त्र काय म्हणते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली: 3‘हे प्रभो, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या. मी एकटाच राहिलो आहे, ते माझा प्राण घ्यायचा प्रयत्न करीत आहेत.’ 4परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? ‘ज्यांनी बआल दैवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.’ 5तसेच ह्रीच्या काळीसुद्धा देवाने त्याच्या कृपेने निवडलेल्यांपैकी शेष भाग राखला आहे 6आणि जर हा शेष भाग कृपेने राखला असेल, तर ते कृत्यांनी झाले नाही. नाहीतर कृपा ही कृपा राहणार नाही.
7तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल नेटाने प्रयत्न करत होते, ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्या लोकांच्या गटाला मिळाले आणि बाकीचे लोक कठिण अंत:करणाचे झाले. 8धर्मशास्त्रलेखात म्हटल्याप्रमाणे:
देवाने त्यांचे मन आणि अंतःकरण संवेदनशून्य केले.
आजही ते ऐकू वा पाहू शकत नाहीत.
9दावीददेखील म्हणतो:
त्यांचे सण त्यांना फास व सापळा,
अडखळण व शिक्षा असे होवोत.
10त्यांना दिसू नये म्हणून
त्यांचे डोळे अंधकारमय होवोत
आणि तू त्यांना नेहमी वाकव.
11तर मी विचारतो, यहुदी लोकांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? मुळीच नाही! तर त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होण्यासाठी त्यांच्या अपराधामुळे यहुदीतरांचे तारण झाले आहे. 12आता त्यांचा अपराध हा जर जगासाठी आशीर्वाद आणि त्यांचा ऱ्हास हा जर यहुदीतरांसाठी आशीर्वाद ठरला आहे, तर त्या सर्वांचा समावेश झाल्यास तो आशीर्वाद किती तरी अधिक महान होईल!
यहुदीतरांचे तारण: कलम करण्याचे उदाहरण
13यहुदीतरांकरता प्रेषित ह्या नात्याने मी सांगतो की, मी माझ्या सेवाकार्याचा अभिमान बाळगतो. 14ह्यात माझा उद्देश असा आहे की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत, त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करावी व त्यांच्यांतील काहींना तारावे. 15त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार आहे!
16पिठाच्या गोळ्याचा पहिला भाग देवाला अर्पण केल्यास पवित्र होतो तेंव्हा संपूर्ण गोळा पवित्र होतो आणि जर मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र. 17अस्सल अशा ऑलिव्ह वृक्षाच्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू जंगली ऑलिव्ह झाडाच्या फांदीसारखा असता त्यांच्या जागी कलमरूपे जर लावला गेलास व अस्सल अशा कसदार ऑलिव्ह वृक्षाच्या मुळाचा भागीदार झालास, 18तर ‘त्या फांद्यांहून मी मोठा आहे,’ अशी बढाई मारू नकोस. मारशील, तर हे लक्षात ठेव की, तू केवळ एक फांदी आहेस, तू मुळाला आधार दिलेला नाही, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे.
19परंतु तू म्हणशील, ‘माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या.’ 20ते खरे आहे. अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, मात्र अहंकार बाळगू नकोस, आदरयुक्त भीतीत उभा रहा. 21जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत, तर तो तुझा बचाव करील काय? 22देवाची ममता व कठोरता पाहा, पतन झालेल्यांविषयी कठोरपणा आणि तुझ्यासाठी त्याची ममता. मात्र तू त्याच्या ममतेत राहशील तर, अन्यथा तूही छाटून टाकला जाशील. 23तसेच ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम करण्यास देव समर्थ आहे. 24जे मूळचे जंगली ऑलिव्ह झाड त्यांतून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून अस्सल ऑलिव्ह वृक्षात करण्यात आले. तर ह्या ज्या मूळच्या त्याच्याच फांद्या आहेत, त्यांचे कलम त्या अस्सल ऑलिव्ह वृक्षात किती सहजतेने करण्यात येईल?
सर्वांवर ममता करणे हाच देवाचा अंतिम हेतू
25बंधुजनहो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, यहुदीतरांचा भरणा पूर्ण होईपर्यंत इस्राएली लोक तात्पुरते दुराग्रहाने श्रद्धेपासून दुरावले आहेत. 26परंतु पुढे सर्व इस्त्राएली लोकांचे तारण होईल, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे:
मुक्तिदाता सियोनमधून येईल,
तो याकोबच्या वंशजांमधून
सर्व दुष्टपणा दूर करील.
27मी त्यांची पापे दूर करतो,
तेव्हा त्यांच्याबरोबरचा
माझा हा करार आहे.
28शुभवर्तमानाचा स्वीकार न केल्यामुळे तुमच्यासाठी ते शत्रू आहेत. परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे ते देवाचे प्रियजन आहेत. 29देवाला पस्तावा होत नाही आणि तो कृपादान व पाचारण काढून परत घेत नाही. 30पूर्वी तुम्ही ग्रीक लोक देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला यहुदी लोकांच्या आज्ञाभंगांमुळे दया प्राप्त झाली आहे. 31त्याप्रमाणे तुमच्यावरील दयेमुळे त्यांनाही आता दया प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. 32त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कैदेत ठेवले आहे.
33अहाहा, देवाच्या सुज्ञतेची व ज्ञानाची समृद्धी किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती अनाकलनीय आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! 34धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे:
प्रभूचे मन कोणी ओळखले आहे?
त्याचा स्रागार कोण झाला आहे?
35त्याला प्रथम देऊन
त्याच्याकडून फेड करून घेईल
असा कोण आहे?
36कारण सर्व काही त्याच्याकडून, त्याच्याचद्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ निर्माण करण्यात आले आहे. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
Цяпер абрана:
रोमकरांना 11: MACLBSI
Пазнака
Капіяваць
Параўнаць
Падзяліцца
Хочаце, каб вашыя адзнакі былі захаваны на ўсіх вашых прыладах? Зарэгіструйцеся або ўвайдзіце
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.