उत्पत्ती 1

1
जगाची आणि मानवाची निर्मिती
1प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.
2आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.
3तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला.
4देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे; आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले.
5देवाने प्रकाशाला ‘दिवस’ व अंधकाराला ‘रात्र’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.
6मग देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो, व ते जलांना दुभागणारे होवो.”
7असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलांना वेगळे केले; आणि तसे झाले.
8देवाने अंतराळाला ‘आकाश’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस.
9मग देव बोलला, “आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय होवो, व कोरडी जमीन दृष्टीस पडो;” आणि तसे झाले.
10देवाने कोरड्या जमिनीला ‘भूमी’ म्हटले व जलांच्या संचयाला ‘समुद्र’ म्हटले; देवाने पाहिले की हे चांगले आहे.
11तेव्हा देव बोलला, “हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो;” आणि तसे झाले.
12हिरवळ, आपापल्यापरी बीज देणारी वनस्पती व आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजवली; देवाने पाहिले की हे चांगले आहे.
13आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा तिसरा दिवस.
14मग देव बोलला, “दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत; त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखवणार्‍या होवोत;
15पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होवोत;” आणि तसे झाले.
16देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या; दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत; आणि त्याने तारेही केले.
17-18पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस व रात्र ह्यांवर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार ह्यांना भिन्न करावे, म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या; देवाने पाहिले की हे चांगले आहे.
19आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा चौथा दिवस.
20मग देव बोलला, “जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत.”
21प्रचंड जलचर, जलांत गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे.
22देवाने त्यांना आशीर्वाद दिला : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रांतील पाणी व्यापून टाका; आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.”
23आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस.
24मग देव बोलला, “प्रत्येक जातीचे ग्रामपशू, रांगणारे प्राणी व वनपशू असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो;” आणि तसे झाले.
25असे प्रत्येक जातीचे वनपशू, ग्रामपशू व जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे.
26मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील.”
27देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.
28देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यांवर सत्ता चालवा.”
29देव म्हणाला, “पाहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हांला देतो; ही तुमचे अन्न होतील.
30त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी ह्यांना अवघी हिरवळ खाण्यासाठी देतो.” आणि तसे झाले.
31आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा सहावा दिवस.

Kleurmerk

Deel

Kopieer

None

Wil jy jou kleurmerke oor al jou toestelle gestoor hê? Teken in of teken aan

YouVersion gebruik koekies om jou ervaring persoonlik te maak. Deur ons webwerf te gebruik, aanvaar jy ons gebruik van koekies soos beskryf in ons Privaatheidsbeleid