मत्तय 8
8
कुष्ठरोग्याला आरोग्यदान
1येशू डोंगरावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या मागे लोकांच्या झुंडी जाऊ लागल्या. 2त्या वेळी एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभो, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात.”
3येशूने त्याच्यावर हात ठेवून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो.” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला. 4नंतर येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि तू बरा झालास ह्याचे सर्वांना प्रमाण म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.”
रोमन अधिकाऱ्याचा नोकर
5येशू कफर्णहूमला आल्यावर एका शताधिपतीने येशूकडे येऊन विनंती केली, 6“प्रभो, माझा नोकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.”
7येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.”
8त्या रोमन अधिकाऱ्याने उत्तर दिले, “प्रभो, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. आपण शब्द मात्र बोला आणि माझा नोकर बरा होईल. 9मीही जबाबदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली सैनिक असून मी एकाला जा म्हटले की, तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की, तो येतो, माझ्या नोकराला अमुक कर म्हटले की, तो तसे करतो.”
10हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात कुठेही आढळला नाही. 11मी तुम्हांला सांगतो, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या बरोबर बसतील; 12परंतु स्वर्गाच्या राज्याचे वारसदार बाहेरील अंधारात टाकले जातील. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.” 13नंतर येशू रोमन अधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुझ्यासाठी होवो.” त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.
शिमोनची सासू व इतर रोगी
14येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने आजारी आहे, असे त्याने पाहिले. 15त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला. ती उठून त्याची सेवा करू लागली.
16त्या संध्याकाळी पुष्कळ भूतग्रस्तांना लोकांनी त्याच्याकडे आणले असता त्याने त्याच्या शब्दानेच भुते घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले. 17‘त्याने स्वतः आमचे आजार घेतले आणि आमचे रोग वाहिले’, असे जे यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी
18आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे, असे पाहून येशूने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याचा आदेश दिला. 19तेव्हा एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन.”
20येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे व आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही.”
21त्याच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, “प्रभो, मला आधी माझ्या वडिलांना पुरायला जाऊ द्या.”
22परंतु येशूने त्याला म्हटले, “तू माझ्या मागे ये आणि जे मेलेले आहेत, त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.”
येशूने वादळ शांत केले
23येशू तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. 24एकाएकी त्या सरोवरात इतके प्रचंड वादळ उठले की, तारू लाटांखाली बुडू लागले. येशू मात्र झोपला होता. 25ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “प्रभो, आम्ही बुडत आहोत, आम्हांला वाचवा.”
26तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही घाबरलात कशाला?” मग उठून त्याने वाऱ्याला व लाटांना दटावले. तेव्हा सारे निवांत झाले.
27हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “वारा आणि लाटा ह्याचे ऐकतात, असा हा आहे तरी कोण?”
गदरा प्रदेशातील भूतग्रस्त
28तो सरोवराच्या पलीकडे गदराच्या हद्दीत आल्यावर दोन भूतग्रस्त कबरींतून निघून त्याच्याकडे आले. ते इतके भयंकर होते की, त्या वाटेने कुणीही जाऊ शकत नसे. 29अचानक ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला छळायला येथे आला आहेस काय?”
30तेथून थोड्याशा अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. 31ती भुते त्याला विनंती करू लागली, “तू जर आम्हांला बाहेर काढत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हांला पाठवून दे.”
32त्याने त्यांना म्हटले, “जा.” मग ती निघून डुकरांत शिरली आणि पाहा, तो कळप वेगाने धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात बुडून मेला.
33तेव्हा कळप चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांचे सर्व वृत्त लोकांना सांगितले. 34हे ऐकून सर्व नगर येशूला पाहायला आले व त्याला पाहिल्यावर त्यांनी येशूला त्यांच्या नगराबाहेर जाण्याची विनंती केली.
Поточний вибір:
मत्तय 8: MACLBSI
Позначайте
Поділитись
Копіювати
Хочете, щоб ваші позначення зберігалися на всіх ваших пристроях? Зареєструйтеся або увійдіть
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.