मत्तय 21
21
यरुशलेममध्ये येशूचा जयोत्सवाने प्रवेश
1ते यरुशलेमजवळ आले असता ऑलिव्ह डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले, तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले, 2“तुम्ही समोरच्या गावात जा. तेथे लगेच तुम्हांला एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू बांधलेले आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे आणा. 3तुम्हांला कोणी काही म्हटले तर ‘प्रभूला ह्यांची गरज आहे’, असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.”
4संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे:
5सियोनकन्येला सांगा,
‘पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे.
तो नम्र आहे म्हणून तो गाढवावर व
गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’
6शिष्य गेले आणि त्यांनी येशूच्या सांगण्याप्रमाणे केले. 7त्यांनी गाढवी व शिंगरू आणून त्यांवर आपली वस्त्रे पसरली व येशू त्यांच्यावर बसला. 8लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी डाहळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या. 9पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! दावीदपुत्राचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! ऊर्ध्वलोकी होसान्ना!”
10तो यरुशलेममध्ये आल्यावर सर्व नगर गजबजले. लोक म्हणाले, “हा कोण आहे?”
11लोकसमुदाय म्हणाला, “हा येशू आहे - गालीलमधील नासरेथहून आलेला संदेष्टा.”
मंदिराचे शुद्धीकरण
12येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना त्याने बाहेर घालवून दिले आणि सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली 13आणि त्यांना म्हटले, “‘माझ्या मंदिराला प्रार्थनागृह म्हणतील’, असे लिहिले आहे, पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”
14तेथे आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. 15त्याने केलेले चमत्कार पाहून व “दावीदपुत्राचा गौरव असो!”, असा जयघोष करणारी मुले मंदिरात पाहून मुख्य याजक व शास्त्री संतापले 16आणि त्याला म्हणाले, “ही मुले काय बोलतात, हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “हो, “बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करविली आहेस’, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”
17नंतर तो त्यांना सोडून शहराबाहेर बेथानीस गेला व तेथे तो रात्रभर राहिला.
अंजिराचे निष्फळ झाड
18सकाळी येशू परत शहराकडे येत असता त्याला भूक लागली, 19म्हणून तो वाटेवर असलेल्या अंजिराच्या झाडाजवळ गेला. पण पानांशिवाय त्याला त्यावर काही दिसले नाही. त्याने त्या झाडाला म्हटले, “ह्यापुढे तुला कधी फळ न येवो.” ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले!
20ते पाहून शिष्यांनी आश्चर्य व्यक्त करून म्हटले, “अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?”
21येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर ह्या झाडाला मी जे केले, ते तुम्हीही करू शकाल, इतकेच नव्हे तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’, असे म्हणाल तर तसे होईल. 22तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल, ते सर्व तुम्हांला मिळेल.”
येशूच्या अधिकाराविषयी
23येशू मंदिरात शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ येऊन विचारू लागले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”
24येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, त्याचे तुम्ही मला उत्तर दिले तर कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करतो, ते मीही तुम्हांला सांगेन. 25योहानला बाप्तिस्मा देण्याचा अधिकार कोठून मिळाला? देवाकडून की माणसांकडून?” ते आपसात चर्चा करू लागले, “देवाकडून म्हणावे तर तो आपल्याला म्हणेल, “मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ 26बरे, माणसाकडून म्हणावे, तर आपल्याला लोकांची भीती आहे, कारण सर्व लोक योहानला संदेष्टा मानतात.” 27तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर मग मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकाराने करत आहे, ते मीही तुम्हांला सांगणार नाही.
दोन पुत्रांचा दाखला
28तुम्हांला काय वाटते ते सांगा बरे? एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मोठ्या मुलाकडे जाऊन म्हणाला, “मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’ 29त्याने उत्तर दिले, “जातो, बाबा.’ पण तो गेला नाही. 30मग धाकट्या मुलाकडे जाऊन त्या मनुष्याने तसेच म्हटले. तो म्हणाला, “मी नाही जाणार.’ तरी पण नंतर आपला विचार बदलून तो गेला. 31ह्या दोघांतून कोणी त्याच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे केले?” ते म्हणाले, “धाकट्या मुलाने.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या आधी देवाच्या राज्यात जात आहेत. 32कारण योहान नीतिमत्वाच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, पण जकातदार व वेश्या ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; शिवाय हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असा पश्चात्ताप नंतरही तुम्हांला झाला नाही.
द्राक्षमळ्याचा दाखला
33आणखी एक दाखला ऐकून घ्या. एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला. त्यानंतर तो द्राक्षमळा कुळांकडे खंडाने देऊन तो स्वतः परदेशी गेला. 34फळांचा हंगाम आल्यावर त्याने त्याचे फळ घेण्याकरता आपल्या दासांना कुळांकडे पाठवले. 35त्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोकले, कोणाला ठार मारले व कोणाला धोंडमार केला. 36पुन्हा त्याने पहिल्यापेक्षा अधिक दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. 37‘माझ्या मुलाचा ते मान राखतील’, असा विचार करून द्राक्षमळ्याच्या मालकाने शेवटी त्याच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. 38परंतु मुलाला पाहून कुळे आपसात म्हणाली, “हा तर वारस आहे, चला, आपण ह्याला ठार मारू व ह्याचे वतन घेऊ.’ 39त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून ठार मारले.
40आता हे सांगा, द्राक्षमळ्याचा धनी येईल, तेव्हा तो त्या कुळांचे काय करील?”
41ते येशूला म्हणाले, “तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील आणि जी कुळे हंगामाच्या वेळी त्याला फळ देतील, अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने देईल.”
42येशू त्यांना म्हणाला, “‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे!’, असे धर्मशास्त्रात तुम्ही कधी वाचले नाही काय?
43म्हणून मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल व त्याची फळे देणाऱ्या लोकांना ते दिले जाईल. 44जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल. परंतु ज्या कुणावर हा पडेल त्याचा हा भुगा करून टाकील.”
45मुख्य याजक व परुशी ह्यांनी हा दाखला ऐकला तेव्हा तो त्यांना उद्देशून सांगितला होता, हे त्यांच्या ध्यानात आले. 46तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली; कारण लोक त्याला संदेष्टा मानत होते.
Trenutno izbrano:
मत्तय 21: MACLBSI
Označeno
Deli
Kopiraj

Želiš, da so tvoji poudarki shranjeni v vseh tvojih napravah? Registriraj se ali se prijavi
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.