Logo YouVersion
Ikona vyhledávání

मार्क 2

2
कफर्णहूमचा पक्षाघाती
1काही दिवसांनी येशू पुन्हा कफर्णहूममध्ये आला. तो घरी आहे, असे लोकांच्या कानी पडले. 2तेथे इतके लोक जमले की, त्यांना दारातदेखील जागा होईना. तो त्यांना संदेश देत होता. 3त्या वेळी एका पक्षाघाती माणसाला चौघांनी उचलून त्याच्याकडे आणले. 4गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तेथील छप्पर त्यांनी काढले आणि जागा करून ज्या खाटेवर तो पक्षाघाती पडून होता ती त्यांनी खाली सोडली. 5त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “माझ्या मुला, तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे.”
6कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनांत असा विचार आला की, 7हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करतो. देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?
8ते स्वतःशी असा विचार करत आहेत, हे येशूने लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही तुमच्या मनात असे विचार का आणता? 9पक्षाघाती माणसाला ‘तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे’, असे म्हणणे, किंवा ‘ऊठ, तुझी खाट उचलून चालू लाग’, असे म्हणणे, अधिक सोपे आहे? 10परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर केलेल्या पापांची क्षमा करायचा अधिकार आहे, हे मी तुम्हांला दाखवून देतो.” म्हणून तो पक्षाघाती माणसाला म्हणाला, 11“मी तुला सांगतो, ऊठ, आपली खाट उचलून घे व तुझ्या घरी जा.”
12तो उठला व लगेच त्याची खाट उचलून सर्वांच्या समक्ष निघाला. हे पाहून सर्व जण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते!”
लेवीला पाचारण
13येशू तेथून निघून गालील सरोवराच्या किनाऱ्यावर गेला तेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला. येशूने त्यांना प्रबोधन केले. 14तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकात नाक्यावर बसलेला दिसला. त्याला येशूने म्हटले, “माझ्यामागे ये.” तो उठून त्याच्यामागे गेला.
15नंतर येशू त्याच्या घरी जेवायला बसला असता, तेथे पुष्कळ जकातदार व पापी लोक येशूच्या मागे आले आणि तेदेखील येशू व त्याच्या शिष्यांबरोबर पंक्‍तीस बसले. 16त्याला जकातदार व पापी लोकांबरोबर जेवताना पाहून परुश्यांतील काही शास्त्र्यांनी त्याच्या शिष्यांना विचारले, “हा अशा लोकांबरोबर का जेवतो?”
17हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यासाठी आलो आहे.”
उपवासाविषयी
18त्या वेळी योहानचे शिष्य व परुशी उपवास करत होते. तेव्हा काही लोकांनी येऊन येशूला विचारले, “योहानचे व परुश्यांचे शिष्य उपवास करतात परंतु आपले शिष्य उपवास करत नाहीत, हे कसे काय?”
19येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्याना उपवास करता येईल का? वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही. 20परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून दूर नेला जाईल, तेव्हा त्या दिवसांत ते उपवास करतील.
21नवीन कापडाचे ठिगळ कोणी जुन्या वस्त्राला लावत नाही. तसे केले तर नीट करण्याकरता लावलेले ठिगळ जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते. 22नवा द्राक्षारस कोणी जुन्या बुधल्यांत भरत नाही, भरला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस वाया जातो व बुधले निकामी होतात, म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत भरला पाहिजे.”
येशू हा साबाथचा प्रभू
23एकदा येशू साबाथ दिवशी शेतांमधून जात असताना त्याचे शिष्य वाटेत कणसे तोडू लागले. 24तेव्हा परुशी त्याला म्हणाले, “पाहा, साबाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?”
25तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हे कधी वाचले नाही का की, दावीदला जेव्हा गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्याबरोबर जे होते त्यांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केले? 26आणि अब्याथार उच्च याजक असता, तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या समर्पित भाकरी त्याने कशा खाल्ल्या व त्याच्याबरोबर जे होते त्यांनाही कशा दिल्या?”
27नंतर तो त्यांना म्हणाला, “साबाथ मनुष्यासाठी केला गेला; मनुष्य साबाथसाठी नव्हे. 28म्हणून मनुष्याचा पुत्र साबाथचाही प्रभू आहे.”

Zvýraznění

Sdílet

Kopírovat

None

Chceš mít své zvýrazněné verše uložené na všech zařízeních? Zaregistruj se nebo se přihlas