Logo YouVersion
Ikona vyhledávání

योहान 15

15
येशू - खरा द्राक्षवेल
1“मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. 2तो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याने अधिक फळ द्यावे म्हणून त्याची छाटणी करतो. 3मी तुम्हांला जे वचन सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. 4तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलीत राहिल्याशिवाय त्याला स्वतः फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांलाही फळ देता येणार नाही.
5मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हांला काही करता येणार नाही. 6कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर वेलीपासून छाटलेल्या फाट्याप्रमाणे तो वाळून जातो; असे वाळलेले फाटे एकत्र करून अग्नीत टाकले जातात व तेथे ते जळून जातात. 7तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिलीत, तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा; ते तुमच्यासाठी केले जाईल. 8तुम्ही विपुल फळ दिले तर माझ्या पित्याचा गौरव होईल. अशा प्रकारे तुम्ही माझे शिष्य व्हाल.
प्रीतीची आज्ञा
9जसा पिता माझ्यावर प्रीती करतो, तसा मीही तुमच्यावर प्रीती करतो. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. 10जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.
11माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला हे सारे सांगितले आहे. 12माझी ही आज्ञा आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. 13आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठी प्रीती नाही. 14तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझे मित्र आहात. 15मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी माझ्या पित्याकडून ऐक ले, ते सर्व मी तुम्हांला सांगितले आहे. 16तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हांला निवडले आहे व तुम्हांला नेमले आहे, म्हणजे तुम्ही जावे. विपुल फळ द्यावे. तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल, ते त्याने तुम्हांला द्यावे. 17तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी तुम्हांला आज्ञा आहे.
जगाचा आत्मा व सत्याचा आत्मा
18जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही द्वेष केला, हे लक्षात ठेवा. 19तुम्ही जगाचे असता, तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते. परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करते. 20दास धन्यापेक्षा थोर नाही, हे जे मी तुम्हांला सांगितले, त्या वचनाची आठवण ठेवा. जर त्यांनी माझा छळ केला तर ते तुमचाही करतील. जर त्यांनी माझे वचन पाळले, तर ते तुमचेही पाळतील, 21परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हांला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत. 22मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो, तर त्यांच्याकडे पाप नसते. परंतु आता त्यांना त्यांच्या पापाबद्दलची सबब देता येणार नाही. 23जो माझा द्वेष करतो, तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. 24जी कृत्ये दुसऱ्या कोणी केली नाहीत, ती मी त्यांच्यामध्ये केली नसती, तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी माझी कृत्ये पाहिली आहेत तरी ते माझा व माझ्या पित्याचाही द्वेष करतात. 25‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’, हे जे वचन त्यांच्या धर्मशास्त्रात लिहिले आहे, ते पूर्ण व्हावे म्हणून हे होत आहे.
26कैवारी, म्हणजे पित्याकडून निघणारा सत्याचा आत्मा, मी पित्याकडून तुमच्याकडे पाठवीन. तो येईल तेव्हा माझ्याविषयी साक्ष देईल 27आणि तुम्हीही माझ्याविषयी साक्ष द्याल, कारण तुम्ही अगदी प्रारंभापासून माझ्याबरोबर आहात.”

Zvýraznění

Sdílet

Kopírovat

None

Chceš mít své zvýrazněné verše uložené na všech zařízeních? Zaregistruj se nebo se přihlas