इफि. 4

4
मंडळीचा मस्तक ख्रिस्त आहे म्हणून सदस्यांमध्ये एकी असावी
1म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हास विनंती करतो, देवाकडून तुम्हास जे बोलावणे झालेले आहे, त्यास योग्य तसे जगावे. 2सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि एकमेकांना सहन करुन प्रेमाने स्वीकारा. 3शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा. 4ज्याप्रमाणे तुम्हासही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलावले आहे ‘त्याचप्रमाणे एक शरीर व एकच आत्मा आहे.’ 5एकच प्रभू, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा, 6एकच देव जो सर्वांचा पिता, तो सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहे.
7ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणा प्रत्येकाला दान मिळाले आहे. 8वचन असे म्हणते.
जेव्हा तो वर चढला,
तेव्हा त्याने कैद्यास ताब्यात घेतले व नेले,
आणि त्याने लोकांस देणग्या दिल्या.
9आता, जेव्हा वचन असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या अधोलोकी सुद्धा उतरला असाच होतो की नाही? 10जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याने भरून काढाव्या. 11आणि त्याने स्वतःच काही लोकांस प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक असे दाने दिली. 12त्या देणग्या देवाच्या सेवेच्या कार्यास पवित्रजनांना तयार करण्यास व ख्रिस्ताचे शरीर आत्मिकरित्या सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या. 13देवाची ही इच्छा आहे की आपण सगळे विश्वास ठेवणारे एक होऊ कारण आपण त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो आणि आपण उन्नत व्हावे म्हणजे त्याच्याविषयीचे ज्ञान आपणास समजेल, देवाची ही इच्छा आहे की आपण प्रौढ विश्वास ठेवणारे व्हावे, एक होऊन, वाढत ख्रिस्ता सारखे बनावे जो परिपूर्ण आहे. 14ह्यासाठी की आपण यापुढे लहान मुलांसारखे नसावे. म्हणजे मनुष्यांच्या कपटाने, फसवणाऱ्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडेतिकडे हेलकावणाऱ्या बोटीसारखे होऊ नये; 15त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने त्याच्यामध्ये वाढावे जो आमचा मस्तक आहे, ख्रिस्त 16ज्यापासून विश्वास ठेवणाऱ्यांचे सर्व शरीर जुळवलेले असते आणि ते प्रत्येक सांध्याने एकत्र बांधलेले असते आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो, आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीराच्या प्रत्येक भागाची वाढ होते.
जुने व नवे जीवितक्रम.
17म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय भ्रष्ट मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका. 18त्यांचे विचार अंधकारमय झालेले आहेत आणि त्यांच्या अंतःकरणातील हट्टीपणामुळे त्यांच्यात अज्ञान असून देवाच्या जीवनापासून ते वेगळे झाले आहेत. 19त्यांनी स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेला हावरेपणाला वाहून घेतले आहे. 20परंतु तुम्ही ख्रिस्ताबद्दल अशाप्रकारे शिकला नाही. 21जर तुम्ही त्याच्याबद्दल ऐकले असेल आणि त्याकडून येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हास त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल, 22तर तुमचा जुना मनुष्य त्यास काढून टाकावा कारण तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे, 23यासाठी तुम्ही आत्म्याद्वारे मनात नवे केले जावे, 24आणि जो नवा मनुष्य, जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रतेत निर्माण केलेला आहे. तो धारण करावा.
दैनदिनाचे नियम
25‘म्हणून खोटे सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. 26तुम्ही रागवा पण पाप करू नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. 27सैतानाला संधी देऊ नका.
28जो कोणी चोरी करीत असेल तर त्याने यापुढे चोरी करू नये. उलट त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्यास त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे. 29तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, त्याऐवजी गरजेनुसार त्यांची चांगली उन्नती होणारे उपयोगी शब्द मात्र निघो. यासाठी जे ऐकतील त्यांना कृपा प्राप्त होईल. 30आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात. 31सर्व प्रकारची कटूता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. 32एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा आणि देवाने ख्रिस्तामध्ये मुक्तपणे क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.

S'ha seleccionat:

इफि. 4: IRVMar

Subratllat

Copia

Compara

Comparteix

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió