1 करिं. 14
14
संदेश देण्याचे व ‘भाषा’ बोलण्याचे दान
1प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या आणि आत्मिक दानांची विशेषतः तुम्हास संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा. 2ज्याला इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान आहे तो खरे पाहता मनुष्यांबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो कारण तो काय बोलतो हे कोणालाही कळत नाही. पवित्र आत्म्याच्याद्वारे तो गुढ गोष्टी बोलतो. 3परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती व सांत्वन याविषयी बोलतो, 4ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वतःचीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करून घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो. 5तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे, पण विशेषतः तुम्ही संदेश द्यावेत अशी माझी इच्छा आहे कारण जो कोणी अन्य भाषांत बोलतो, त्याच्यापेक्षा जो संदेश देतो तो मोठा आहे. यासाठी की, मंडळीची उन्नती व्हावी. 6आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का? 7हे निर्जीव वस्तू उदा. बासरी, वीणा यासारखे आवाज काढण्यासारखे आहे जर ते वाद्य ते निर्माण करीत असलेल्या वेगवेगळ्या आवाजातील फरक स्पष्ट करीत नाही, तर एखाद्याला बासरीवर किंवा वीणेवर कोणते संगीत वाजवले जात आहे ते कसे कळेल? 8आणि जर कर्णा अस्पष्ट आवाज काढील तर लढाईसाठी कोण तयार होईल? 9त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेतून बोलल्याशिवाय तुम्ही काय बोलला हे कोणाला कसे समजेल? कारण तुम्ही हवेत बोलल्यासारखे होईल. 10निःसंशय, जगात पुष्कळ प्रकारच्या भाषा आहेत व कोणतीही अर्थविरहीत नाही. 11म्हणून जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर जो बोलत आहे त्याच्यासाठी मी विदेशी ठरेन व जो बोलणारा आहे तो माझ्यासाठी विदेशी होईल. 12नक्की तेच तुम्हासही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवता म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यात्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा. 13म्हणून, जो अन्य भाषेत बोलतो त्याने तो जे बोलला आहे त्याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. 14कारण जर मी अन्य भाषेतून प्रार्थना केली तर माझा आत्माही प्रार्थना करतो पण माझी बुद्धी निष्फळ राहते. 15मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करीन. 16कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो ऐकणारा सामान्य व्यक्ती तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्यास कळत नाही. 17कारण तू उपकारस्ती चांगली करतोस, खरे हे चांगले आहे तरी त्याने दुसर्याची उन्नती होत नाही. 18मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलतो. 19पण मी मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, दुसर्यांनाही शिकवावे म्हणून, मी माझ्या बुद्धीने पाच शब्द बोलावे हे मला बरे वाटते.
20बंधूनो, तुम्ही विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा. 21नियमशास्त्र म्हणते,
“इतर भाषा बोलणाऱ्याचा उपयोग करून व अन्य भाषेने
मी या लोकांशी बोलेन
तरीसुद्धा ते माझे ऐकणार नाहीत.” हे असे प्रभू म्हणतो.
22म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नसून अविश्वासणाऱ्यांसाठी चिन्हादाखल आहे. 23म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल आणि जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हास म्हणणार नाही का? 24परंतु जर प्रत्येकजण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात; 25त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे” तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी.
उपासनेत सुव्यवस्था असण्याची आवश्यकता
26बंधूंनो मग काय? तुम्ही एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकजण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी अन्य भाषेतून बोलण्यास, तर कोणी अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्वकाही मंडळीच्या उन्नतीसाठी असावे. 27जर कोणी अन्य भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे, एकावेळी एकानेच बोलावे आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा. 28जर मंडळीत अर्थ सांगणारा कोणी नसेल तर अन्य भाषा बोलणाऱ्याने सभेत गप्प बसावे, स्वतःशी व देवाशी बोलावे. 29दोघा किंवा तिघांनी संदेश द्यावा व इतरांनीही ते काय बोलतात याची परीक्षा करावी. 30बसलेल्यांपैकी एखाद्या व्यक्तीला जर काही प्रकट झाले तर पहिल्या संदेश देणाऱ्याने गप्प बसावे. 31जर तुम्हा सर्वांना संदेश देता येत असेल, तर एकावेळी एकानेच बोलावे, यासाठी की सर्वजण शिकतील, सर्वांना बोधपर मार्गदर्शन मिळेल. 32जे आत्मे संदेष्ट्यांना प्रेरणा देतात, ते त्या संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात. 33कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांती आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात.
34स्त्रियांनी मंडळीत शांत रहावे, कारण त्यांना मंडळीत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, कारण नियमशास्त्रसुद्धा असेच म्हणते. 35त्यांना जर काही शिकायचे असेल तर त्यांनी स्वतःच्या पतीला घरी विचारावे कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे तिला लज्जास्पद आहे. 36देवाचे वचन तुम्हांपासून निघाले आहे काय? किंवा ते फक्त तुमच्यापर्यंतच आले आहे काय?
37एखादा जर स्वतःला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो आत्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हास लिहित आहे ती परमेश्वराकडून देण्यात आलेली आज्ञा आहे. 38परंतु जर कोणी हे मानत नसेल, तर न मानो.
39म्हणून माझ्या बंधूनो संदेश देण्यासाठी उत्सुक असा, अन्य भाषेत बोलणाऱ्याला मना करू नका. 40तर सर्व गोष्टी योग्य रीतीने आणि व्यवस्थित असाव्यात.
S'ha seleccionat:
1 करिं. 14: IRVMar
Subratllat
Copia
Compara
Comparteix
Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.