मार्क 7

7
परुश्यांचा ढोंगीपणा
1त्यावेळी काही परुशी व यरुशलेमहून आलेले शास्त्री येशूभोवती एकत्र जमले. 2त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. 3परुशी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या रूढीला अनुसरून हात धुतल्यावाचून जेवत नसत. 4बाजारातून आणलेल्या वस्तू प्रथम धुतल्याशिवाय ते खात नसत. तसेच पेले, घागरी व पितळेची भांडी धुणे, अशा बऱ्याच इतर रूढी ते पाळत असत.
5म्हणूनच परुश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे ते का चालत नाहीत?”
6त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हां ढोंग्यांविषयी यशयाने योग्य भाकीत करून ठेवले आहे. त्याचा लेख असा:
हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात,
परंतु त्यांचे अंतःकरण
माझ्यापासून दूर आहे.
7ते माझी व्यर्थ उपासना करतात,
कारण ते धर्मशास्त्र म्हणून
मनुष्यांचे नियम शिकवतात.
8तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून माणसांच्या परंपरेला चिकटून राहता.”
9नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही तुमची परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडता! 10कारण मोशेने सांगितले आहे, ‘तू आपले वडील व आपली आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या वडिलांची किंवा आईची निंदा करतो, त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ 11परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या वडिलांना अथवा आईला म्हणाला, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे देवाला अर्पण केले आहे’, 12तर तुम्ही त्याला आपल्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काही करण्यापासून सूट देता. 13अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता.”
अंतर्यामी अशुद्धता
14त्यानंतर येशूने लोकसमुदायाला पुन्हा जवळ बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या. 15बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला अशुद्ध करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते, तेच त्याला अशुद्ध करते. 16[ज्याला कान आहेत त्याने ऐकावे.”]
17तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या विधानाचे स्पष्टीकरण विचारले. 18तो त्यांना म्हणाला, “तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते, ते त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्हांला समजत नाही काय? 19कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व नंतर शरीराबाहेर जाते.” [अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले.]
20आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते, तेच माणसाला अशुद्ध करते, 21कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट कल्पना निघतात. 22व्यभिचार, जारकर्मे, खून, चोऱ्या, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, निंदानालस्ती, अहंकार व मूर्खपणा, 23ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला अशुद्ध करतात.”
सुरफुनीकी स्त्रीची श्रद्धा
24येशू तेथून निघून सोर प्रदेशात गेला. तेथे तो एका घरात गेला, हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. 25उलट, जिच्या लहान मुलीला भुताने पछाडले होते, अशा एका बाईने त्याच्याविषयी ऐकले व ती लगेच येऊन त्याच्या पाया पडली. 26ती बाई ग्रीक व सुरफुनीकी वंशाची होती. तिने त्याला विनंती केली, “माझ्या मुलीतून भूत काढा.” 27परंतु तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, मुलांची भाकर घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.”
28तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मुलांच्या हातून पडलेला मेजाखालचा चुरा खातात.”
29तेव्हा तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”
30ती तिच्या घरी गेली, तेव्हा मुलगी अंथरुणावर पडलेली आहे व भूत निघून गेले आहे, असे तिला आढळून आले.
बहिऱ्या व तोतऱ्या माणसाला आरोग्यदान
31येशू सोर प्रदेशातून निघाला आणि सिदोनमधून दकापलीस प्रांतातून गालील सरोवराकडे परत आला. 32लोकांनी एका बहिऱ्या व तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून त्याने त्याच्यावर हात ठेवावा, अशी त्याला विनंती केली. 33येशूने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानांत बोटे घातली व थुंकून त्याने त्याच्या जिभेला स्पर्श केला 34आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने दीर्घ उसासा टाकला व म्हटले, “इफ्फाथा”, म्हणजे “मोकळा हो.”
35तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंध तत्काळ सुटून तो स्पष्ट बोलू लागला. 36“हे कोणाला कळवू नका”, असे येशूने लोकांना निक्षून सांगितले परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला, तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले. 37ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “तो सर्व काही कसे चांगल्या प्रकारे करतो! तो बहिऱ्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याचीदेखील क्षमता देतो.”

Цяпер абрана:

मार्क 7: MACLBSI

Пазнака

Падзяліцца

Капіяваць

None

Хочаце, каб вашыя адзнакі былі захаваны на ўсіх вашых прыладах? Зарэгіструйцеся або ўвайдзіце