Logo YouVersion
Icona Cerca

गणना 23

23
बलामाचा पहिला संदेश
1बलाम बालाकाला म्हणाला, “या ठिकाणी माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.” 2बलामाने सांगितले त्याप्रमाणे बालाकाने केले आणि दोघांनी प्रत्येक वेदीवर गोर्‍हा व मेंढा यांचे अर्पण केले.
3मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू या तुझ्या होमार्पणाजवळ थांब आणि मी जरा बाजूला जातो. कदाचित याहवेह मला भेटायला येतील. ते जे काही मला प्रकट करतील ते मी तुला सांगेन.” मग तो एका उंच ओसाड ठिकाणी गेला.
4परमेश्वर त्याला भेटले आणि बलाम म्हणाला, “मी सात वेद्या बांधून प्रत्येक वेदीवर एक गोर्‍हा आणि एक मेंढा अर्पण केला आहे.”
5तेव्हा याहवेहने बलामाच्या मुखात शब्द घातले व म्हटले, “जा आणि बालाकाला हे वचन सांग.”
6म्हणून बलाम परत बालाकाकडे आला. तेव्हा तो त्याच्या मोआबी सरदारांसह होमार्पणाजवळ उभा होता असे त्याने पाहिले. 7तेव्हा बलामाने आपला संदेश सांगितला:
“बालाकाने मला अरामाहून आणले,
मोआबाच्या राजाने पूर्वेकडील डोंगरातून मला आणले.
तो म्हणाला, ‘ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे;
ये, इस्राएलाचा धिक्कार कर.’
8ज्यांना परमेश्वराने शाप दिला नाही,
त्यांना मी शाप कसा देऊ?
ज्यांचा तिरस्कार याहवेहने केला नाही;
त्यांचा तिरस्कार मी कसा करू?
9खडकाच्या शिखरांवरून मी त्यांना पाहतो,
उंच ठिकाणावरून मला ते दिसतात.
वेगळे राहत असलेले लोक मी पाहतो
राष्ट्रांबरोबर ते स्वतःला गणत नाहीत.
10याकोबाची धूळ कोण मोजू शकेल,
किंवा इस्राएलच्या चौथ्या भागाची तरी मोजणी कोण करणार?
मला नीतिमानाचे मरण मरू दे,
आणि माझा शेवट त्यांच्याप्रमाणे असो!”
11बालाक बलामाला म्हणाला, “तू मला हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला आणले, पण तू तर आशीर्वाद दिल्याशिवाय काही केले नाहीस!”
12बलामाने म्हटले, “जे शब्द याहवेह माझ्या मुखात घालतील तेच मी बोलू नये काय?”
बलामचा दुसरा संदेश
13तेव्हा बालाक त्याला म्हणाला, “माझ्याबरोबर दुसर्‍या ठिकाणी चल जिथून तू त्यांना पाहू शकशील; तुला ते सर्व दिसणार नाहीत तर केवळ त्यांच्या छावणीचा शेवटचा भाग मात्र दिसेल. तिथून त्यांना माझ्यासाठी शाप दे.” 14त्याने बलामाला सोफिमाच्या मैदानाच्या पिसगाच्या डोंगरावर नेले, तिथे त्याने सात वेद्या बांधल्या आणि प्रत्येक वेदीवर एक गोर्‍हा व एक मेंढा अर्पण केला.
15बलाम बालाकाला म्हणाला, “तू इथे तुझ्या होमार्पणाजवळ थांब, मी तिथे जाऊन याहवेहशी भेट घेतो.”
16याहवेह बलामाला भेटले व त्याच्या मुखात आपला शब्द घातला व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि त्याला हे संदेश दे.”
17जेव्हा तो परत आला तेव्हा तो आपल्या मोआबी सरदारांबरोबर त्याच्या होमार्पणाजवळ उभा असलेला त्याला दिसला. बालाकाने त्याला विचारले, “याहवेह काय म्हणाले?”
18नंतर त्याने हा संदेश सांगितला:
“बालाका, ऊठ आणि ऐक;
सिप्पोरच्या पुत्रा, माझे ऐक.
19परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी,
ते मानव नाहीत, की त्यांनी आपले मन बदलावे.
याहवेह बोलणार आणि त्यानुसार करणार नाहीत काय?
त्यांनी अभिवचन दिले आणि ते पूर्ण करणार नाहीत काय?
20आशीर्वाद देण्याची आज्ञा मला मिळाली आहे;
याहवेहने आशीर्वाद दिला आहे आणि मी तो बदलू शकत नाही.
21“याकोबात विपत्ती सापडली नाही,
इस्राएलात क्लेश दिसत नाहीत.
त्यांचे परमेश्वर याहवेह त्यांच्याबरोबर आहेत;
राजाचा जयघोष त्यांच्यामध्ये आहे.
22परमेश्वराने त्यांना इजिप्तच्या बाहेर आणले.
रानबैलासारखे त्यांचे बळ आहे.
23याकोबाविरुद्ध मंत्रतंत्र नाही,
इस्राएलविरुद्ध अपशकुन नाही.
याकोबाविषयी व इस्राएलाविषयी असे म्हटले जाईल,
परमेश्वराने काय केले आहे ते पाहा!
24लोक सिंहिणीप्रमाणे उठतात;
ते सिंहासारखे उभे राहतात
जे त्याची शिकार खाईपर्यंत
व वधलेल्यांचे रक्त पिईपर्यंत विसावा घेत नाहीत.”
25मग बालाक बलामाला म्हणाला, “त्यांना अजिबात शापही देऊ नकोस किंवा आशीर्वादही देऊ नकोस.”
26बलामाने बालाकाला उत्तर दिले, “याहवेह जे सांगतील त्याचप्रमाणे मी केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
बलामाचा तिसरा संदेश
27नंतर बालाक बलामाला म्हणाला, “चल, मी तुला आणखी एका ठिकाणी नेतो. कदाचित त्या ठिकाणाहून तू माझ्यासाठी त्यांना शाप द्यावा हे परमेश्वराला बरे वाटेल.” 28आणि बालाकाने बलामाला पेओर डोंगराच्या शिखराकडे ओसाड जागेसमोर नेले.
29बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि सात गोर्‍हे व सात मेंढे माझ्यासाठी तयार ठेव.” 30बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने केले आणि प्रत्येक वेदीवर एकएक गोर्‍हा व मेंढा अर्पण केला.

Attualmente Selezionati:

गणना 23: MRCV

Evidenzia

Copia

Confronta

Condividi

None

Vuoi avere le tue evidenziazioni salvate su tutti i tuoi dispositivi?Iscriviti o accedi