निर्गम 17
17
खडकातून पाणी
1सर्व इस्राएलाचा समाज सीन रानातून निघून, याहवेहच्या आज्ञेनुसार एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करीत गेले. मग त्यांनी रफीदीम येथे तळ दिला, पण तिथे लोकांना प्यावयास पाणी नव्हते. 2तेव्हा लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.”
मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? तुम्ही याहवेहची परीक्षा का पाहता?”
3पण तिथे लोकांना फारच तहान लागली होती आणि ते मोशेविरुद्ध कुरकुर करीत म्हणाले, “आम्ही व आमची मुलेबाळे व पशू तहानेने मरून जावे म्हणून तू आम्हाला इजिप्त देशाबाहेर आणलेस का?”
4मग मोशेने याहवेहकडे आरोळी मारली, “मी या लोकांचे काय करू? ते तर मला धोंडमार करण्याच्या तयारीत आहेत.”
5मग याहवेहने मोशेला सांगितले, “लोकांच्या समोर जा. काही इस्राएली वडिलजनांना आपल्याबरोबर घे आणि नाईल नदीवर ज्या काठीने मारले ती आपल्या हाती घे आणि नीघ. 6होरेबातील खडकाकडे मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्या खडकाला काठीने मार आणि त्यातून लोकांना प्यावयास पाणी येईल.” मग मोशेने इस्राएलाच्या वडिलांदेखत तसे केले. 7मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा#17:7 अर्थात् परीक्षा व मरीबाह#17:7 अर्थात् भांडण असे ठेवले; कारण इस्राएली लोकांनी भांडण केले आणि याहवेह आमच्यामध्ये आहेत की नाहीत? असे म्हणून याहवेहची परीक्षा घेतली.
अमालेकांवर विजय
8नंतर अमालेकी आले व त्यांनी इस्राएली लोकांवर रफीदीम येथे हल्ला केला. 9मोशे यहोशुआला म्हणाला, “आपल्यातून काही माणसे निवड आणि बाहेर जाऊन अमालेक्यांशी युद्ध करा. उद्या मी परमेश्वराची काठी माझ्या हातात घेऊन डोंगराच्या शिखरावर उभा राहीन.”
10मग मोशेने सांगितल्याप्रमाणे यहोशुआ अमालेकी सैन्याशी लढला आणि मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या शिखरावर गेले. 11जोपर्यंत मोशे आपले हात वर करीत असे, इस्राएली लोकांचा विजय होत असे, पण जेव्हा ते खाली करी, अमालेक्यांचा विजय होत असे. 12जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. 13आणि यहोशुआने अमालेकी सैन्याला तलवारीने ठार केले.
14मग याहवेह मोशेला म्हणाले, “या घटनेची आठवण रहावी म्हणून तू ती ग्रंथात लिहून ठेव आणि ते यहोशुआच्या कानी पडेल याची खात्री कर, कारण मी पृथ्वीवरून अमालेकांचा संपूर्णपणे नाश करणार.”
15मोशेने त्या ठिकाणी एक वेदी बांधली व त्या ठिकाणाचे नाव याहवेह निस्सी#17:15 म्हणजे याहवेह आमचे ध्वज असे ठेवले. 16तो म्हणाला, “कारण याहवेहच्या राजासनाविरुद्ध हात उगारले गेले, म्हणून याहवेह पिढ्यान् पिढ्या पर्यंत अमालेक्यांशी युद्ध करतील.”
Valgt i Øjeblikket:
निर्गम 17: MRCV
Markering
Kopiér
Sammenlign
Del
Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.