मार्क प्रस्तावना

प्रस्तावना
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीचे हे शुभवर्तमान आहे, ह्या विधानाने मार्करचित शुभवर्तमानाची सुरुवात करून कृतिशील आणि अधिकारसंपन्न अशा येशूचे चित्र येथे रेखाटण्यात आले आहे. दुष्ट शक्‍तीवरील प्रभुत्व, पापांची क्षमा आणि प्रबोधन ह्यामधून त्याचा अधिकार सिद्ध होतो. येशू स्वतःला मानवपुत्र म्हणवून घेतो व स्वतःचे बलिदान अर्पण करून तो पापी लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्त करतो.
येशूची कथा साध्या, सरळ व प्रभावशाली रूपात सादर करताना प्रस्तुत शुभवर्तमान त्याच्या शब्दांपेक्षा कृतीवर अधिक भर देते. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानविषयी सूतोवाच केल्यानंतर येशूचा बाप्तिस्मा, त्याच्या जीवनातील मोहप्रसंग, आरोग्य देण्यासाठी त्याने केलेली चिन्हे व त्याने केलेले प्रबोधन ह्यांचे वर्णन आले आहे. त्याच्या सहवासात राहणाऱ्या त्याच्या अनुयायांना हळूहळू त्याची अधिक चांगली ओळख पटते. परंतु त्याचे विरोधक मात्र अधिकच आक्रमक बनतात. सदर शुभवर्तमानाच्या शेवटच्या विभागात त्याच्या जीवनातील अंतिम आठवड्यातील घटनाक्रमाची, विशेषतः त्याच्या क्रुसावरील मृत्यूची व पुनरुत्थानाची नोंद आहे.
प्रस्तुत शुभवर्तमानाचा शेवट दोन प्रकारे केलेला आढळतो, हे कंसात दाखवलेले आहे. बहुधा हा भाग मूळ लेखकापेक्षा निराळ्या लेखकाने रचलेला असावा.
रूपरेषा
शुभवर्तमानाचा आरंभ 1:1-13
गालीलमधील सार्वजनिक सेवाकार्य 1:14-9:50
गालीलमधून यरुशलेममध्ये 10:1-52
यरुशलेम परिसरातील शेवटचा आठवडा 11:1-15:47
येशूचे पुनरुत्थान 16:1-8
दर्शने व स्वर्गारोहण 16:9-20

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录