प्रेषितांचे कार्य 18
18
करिंथ येथे पौल
1नंतर पौल अथेनै सोडून करिंथ येथे गेला. 2तेव्हा पंथ येथील अक्विला नावाचा एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुदी लोकांनी रोम शहर सोडून जावे अशी सम्राट क्लौद्य ह्यांनी आज्ञा केल्यामुळे तो त्याची पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह इटालीहून नुकताच आला होता, पौल त्यांच्याकडे गेला. 3त्यांचा व ह्याचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला. त्यांनी मिळून तो व्यवसाय चालविला, त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. 4पौल दर साबाथ दिवशी प्रार्थनामंदिरात वादविवाद करून यहुदी व ग्रीक लोकांना आपली शिकवण पटवून देत असे.
5सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे, अशी यहुदी लोकांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल गढून गेला होता. 6परंतु ऐकणारे त्याला अडवून अपशब्द बोलू लागले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, “तुमचे तारण झाले नाही तर त्याचा दोष तुमच्या माथ्यावर, मी निर्दोष आहे, आत्तापासून मी यहुदीतरांकडे जाणार.” 7मग तेथून निघून तो तीत युस्त नावाच्या देवभक्ताच्या घरी गेला. त्याचे घर सभास्थानाच्या जवळ होते. 8तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने त्याच्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला. पुष्कळ करिंथकरांनी देखील देवाचे वचन ऐकून विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.
9त्या रात्री प्रभूने पौलला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस, बोलत जा, तुझे सेवाकार्य मध्येच सोडून देऊ नकोस; 10कारण मी तुझ्याबरोबर आहे. कोणी तुला अपाय करू शकणार नाही. ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.” 11त्यामुळे तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवीत दीड वर्ष राहिला.
गल्लियो आणि पौल
12गल्लियो हा अखया प्रांताचा राज्यपाल असता, यहुदी लोकांनी एकजूट करून पौलवर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले, 13“हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाची आराधना करावयास चिथवतो.”
14तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लियोने यहुदी लोकांना म्हटले, “अहो यहुदी लोकांनो, हे प्रकरण दुष्ट गुन्हेगारीचे अथवा दुष्कृत्याचे असते, तर मला तुम्हांला समजून घेणे सयुक्तिक ठरले असते. 15परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे म्हणून तुमचे तुम्हीच पाहून घ्या. अशा गोष्टींचा न्याय करणे मी नाकारतो!” 16असे म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले. 17तेव्हा सर्वांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस ह्याला धरून न्यायासनासमोर मार दिला, पण गल्लियोने ह्या गोष्टीची पर्वा केली नाही.
पौल सूरियास परत येतो
18ह्यानंतर पौल तेथे आणखी बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूरिया देशास गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विल्ला ही दोघे गेली. पौलाचा नवस होता म्हणून त्याने किंख्रिया येथे आपल्या डोक्याचे मुंडन केले. 19इफिस नगरात आल्यावर पौलाने प्रिस्किल्ला व अक्विल्ला ह्यांना तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन त्याने यहुदी लोकांबरोबर चर्चा केली. 20त्याने आणखी काही दिवस राहावे, अशी विनंती लोक करत असताही, तो तेथे राहण्यास तयार झाला नाही. 21उलट त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे मी पुन्हा येईन”, असे सांगून तो तारवात बसून इफिस येथून निघाला.
22कैसरिया येथे पोहचल्यावर तो यरुशलेम येथे जाऊन ख्रिस्तमंडळीस भेटला व नंतर अंत्युखियास गेला. 23तेथे काही दिवस राहून तो तेथून निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया व फ्रुगिया प्रदेशांतील सर्व शिष्यांना प्रोत्साहन देत फिरला.
इफिसमध्ये अपुल्लो
24आलेक्सांद्रिया येथे जन्मलेला अपुल्लो नावाचा महान वक्ता व धर्मशास्त्रपारंगत असलेला एक यहुदी मनुष्य इफिस येथे आला. 25त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते. तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी उचित प्रकारे सांगून शिकवण देत असे, तरी त्याला केवळ योहानचा बाप्तिस्मा ठाऊक होता. 26तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला त्यांच्या घरी बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला. 27नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला. बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी तेथल्या शिष्यांना लिहिले. तो तेथे पोहचल्यावर ज्यांनी प्रभूच्या कृपेमुळे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले; 28कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे धर्मशास्त्रामधून दाखवून तो अत्यंत प्रभावीपणे सर्वांसमक्ष यहुदी लोकांचे म्हणणे खोडून काढीत असे.
Trenutno izabrano:
प्रेषितांचे कार्य 18: MACLBSI
Istaknuto
Kopiraj
Uporedi
Podeli
Želiš li da tvoje istaknuto bude sačuvano na svim tvojim uređajima? Kreiraj nalog ili se prijavi
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.