YouVersion လိုဂို
ရွာရန္ အိုင္ကြန္

मार्क 4

4
पेरणाऱ्याचा दाखला
1येशू पुन्हा गालील सरोवराच्या किनाऱ्यावर प्रबोधन करू लागला. त्याच्याजवळ इतका विशाल समुदाय जमला की, तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला. सर्व लोक सरोवराच्या काठी जमिनीवर होते. 2तो त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला,
3“ऐका, एक पेरणारा पेरणी करायला निघाला. 4तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले. ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. 5काही बी खडकाळ जमिनीत पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते बी लवकर उगवले. 6सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले. मुळे खोल गेलेली नसल्यामुळे ते वाळून गेले. 7काही बी काटेरी झुडपांत पडले. काटेरी झुडपे वाढल्यामुळे त्याची वाढ खुंटली म्हणून त्याला पीक आले नाही. 8परंतु काही बी चांगल्या जमिनीत पडले. ते उगवले. मोठे झाले व त्याला पीक आले. काहींना तीसपट, काहींना साठपट, तर काहींना शंभरपट असे पीक आले.”
9पुढे येशू म्हणाला, “ज्यांना ऐकण्यासाठी कान असतील त्यांनी ऐकावे!”
10येशू एकान्ती असता त्याचे प्रबोधन ज्यांनी ऐकले होते, त्यांपैकी काहींनी बारा जणांसह त्याच्याकडे येऊन त्याला ह्या दाखल्याविषयी विचारले. 11त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच्या राज्याचे रहस्य तुम्हांला समजावून दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते. 12अशासाठी की, त्यांनी पाहावे पण त्यांना आकलन होऊ नये; ऐकून घ्यावे पण त्यांना समजू नये; म्हणजे त्यांनी देवाकडे पुन्हा वळू नये व त्यांना क्षमा मिळू नये.”
13त्याने त्यांना पुढे विचारले, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग इतर दाखले तुम्हांला कसे समजतील? 14पेरणारा वचन पेरतो. 15काही लोक वाटेवर पडलेल्या वचनासारखे आहेत. त्यांनी वचन ऐकल्याबरोबर सैतान येतो व त्यांच्यात पेरलेले वचन हिरावून घेतो. 16इतर काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात. 17पण त्यांचे मूळ खोलवर न गेल्यामुळे ते अल्पकाळ टिकाव धरतात. त्या वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते तत्क्षणी वचन सोडून देतात. 18इतर काही लोक काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखे आहेत. ते वचन ऐकून घेतात. 19परंतु प्रपंचाची चिंता, पैशाचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. 20आणखी काही लोक चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकून ते स्वीकारतात आणि कोणी तीसपट, कोणी साठपट, तर कोणी शंभरपट असे पीक देतात.”
दिव्याचा दाखला
21आणखी त्याने त्यांना विचारले, “दिवा मापाखाली किंवा खाटेखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? 22जे गुप्त ठेवण्यात आले आहे, ते प्रकट केले जाईल; जे झाकून ठेवण्यात आले आहे, ते उघड केले जाईल. 23ज्याला ऐकण्यासाठी कान असतील, त्याने ऐकावे!”
24पुढे तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता, त्याकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या मापाने द्याल त्या मापाने तुम्हांला दिले जाईल आणि त्याहीपेक्षा अधिक दिले जाईल; 25कारण ज्याच्याकडे आहे, त्याला दिले जाईल व ज्याच्याकडे नाही, त्याचे असेल नसेल तेही त्याच्याकडून काढून घेतले जाईल.”
बियांचे दाखले
26आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काही एखादा माणूस जमिनीत बी पेरतो, 27रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी कसे रुजते व वाढते, हे त्याला कळत नाही. 28जमीन आपोआप पीक देते - प्रथम अंकुर, मग कणीस, नंतर कणसात भरलेला दाणा. 29पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा चालवतो, कारण कापणीची वेळ आलेली असते.”
30येशूने विचारले, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी? अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? 31ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला, 32तरी पेरल्यावर उगवून सर्व रोपट्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या फांद्या फुटतात की, आकाशातील पक्ष्यांना त्याच्या सावलीत वसती करता येते.”
33असे पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्‍तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे. 34दाखल्याशिवाय तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तरी पण एकान्ती तो त्याच्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे.
वादळवाऱ्यावर हुकमत
35त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ या.” 36शिष्यांनी लोकसमुदायाचा निरोप घेतला व ज्या मचव्यात येशू बसला होता, तेथे जाऊन ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्यांच्याबरोबर होते. 37अचानक तेथे मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळू लागल्या की, तो पाण्याने भरू लागला. 38मात्र येशू मचव्याच्या मागच्या बाजूला उशीवर डोके ठेवून झोपला होता. ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काळजी वाटत नाही काय?”
39त्याने उठून उभे राहून वाऱ्याला हुकूम सोडला, “निवांत हो!” आणि लाटांना म्हटले, “शांत व्हा!” वारा पडला व अगदी निवांत झाले. 40त्यानंतर त्याने त्यांना विचारले, “तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्ही अजून विश्‍वास ठेवत नाही काय?”
41ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व लाटादेखील ह्याचे ऐकतात.”

လက္ရွိေရြးခ်ယ္ထားမွု

मार्क 4: MACLBSI

အေရာင္မွတ္ခ်က္

မၽွေဝရန္

ကူးယူ

None

မိမိစက္ကိရိယာအားလုံးတြင္ မိမိအေရာင္ခ်ယ္ေသာအရာမ်ားကို သိမ္းဆည္းထားလိုပါသလား။ စာရင္းသြင္းပါ (သို႔) အေကာင့္ဝင္လိုက္ပါ