YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 5:1-14 - Compare All Versions

नीतिसूत्रे 5:1-14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे, म्हणून तू माझ्या ज्ञानशिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. कारण परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते; तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले अधोलोकास लागतात; म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही; तिचे मार्ग डळमळीत आहेत, हे तिला कळत नाही. तर आता मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका. तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस; गेलास तर तुझी अब्रू दुसर्‍यांच्या हाती जाईल; आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुरांच्या हाती जातील; तुझ्या धनाने परके गबर होतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसर्‍याच्या घरात जाईल; आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती क्षीण झाल्यावर तू शोक करशील; आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील : “मी शिक्षणाचा द्वेष कसा केला? माझ्या अंत:करणाने शासन कसे तुच्छ मानले? मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही. मंडळी व सभा ह्यांच्यादेखत मी बहुतेक दुष्कर्मात गढलेला असे.”

सामायिक करा
नीतिसूत्रे 5 MARVBSI

नीतिसूत्रे 5:1-14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव; माझ्या सुज्ञानाकडे काळजीपूर्वक आपला कान लाव. म्हणून तू दूरदर्शीपणाविषयी शिक्षण घे, आणि तुझे ओठ तुझ्या विद्येचे रक्षण करतील. कारण व्यभिचारिणी स्त्रीच्या ओठातून मध टिपकतो, आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते, पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे, आणि दुधारी तलवारी सारखी धारदार होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात. म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. तिची पावले भटकतात, ती कोठे जाते हे तिला समजत नाही. आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; माझ्या तोंडची वचने ऐकण्यापासून दूर जाऊ नका. तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख, आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नको. गेलास तर तुझी अब्रू इतरांच्या हाती जाईल, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे क्रूरजनाच्या हाती जातील; तुझ्या संपत्तीने परके मेजवाणी करतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल. जेव्हा तुझा देह व शरीर सर्वकाही नष्ट होईल, तेव्हा तुझ्या आयुष्याच्या शेवटी तू शोक करशील. तू म्हणशील “मी शिस्तीचा कसा द्वेष केला, आणि माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानले! मी माझ्या शिक्षकांच्या आज्ञा पाळल्या नाहीत, किंवा मला शिकवणाऱ्याकडे कान दिला नाही. मंडळी व सभा यांच्यादेखत मी बहुतेक पुर्णपणे नाश पावलो होतो.”

सामायिक करा
नीतिसूत्रे 5 IRVMAR

नीतिसूत्रे 5:1-14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

माझ्या मुला, माझ्या सुज्ञानाकडे लक्ष दे, माझ्या अंतर्ज्ञानाच्या शब्दांकडे तुझे कान लाव; म्हणजे विवेकबुद्धीने कसे वागावे हे तुला समजेल; आणि तुझी जीभ ज्ञानाचे रक्षण करेल. कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते, आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो; परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते, आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे जातात; तिची पावले सरळ अधोलोकी नेतात. जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही; तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते. मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका; माझ्या बोधवचनांकडे पाठ फिरवू नका. तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस, असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्‍यांना द्यावा आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी, तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्‍याचे घर समृद्ध होऊ नये. तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल तेव्हा तू दुःखाने विव्हळशील. तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला! माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली! मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे किंवा मला मार्गदर्शन करणार्‍यांकडे मी कानाडोळा करीत असे. आणि म्हणून लवकरच मी परमेश्वराच्या लोकांच्या सभेपुढे गंभीर अडचणीत आलो.”

सामायिक करा
नीतिसूत्रे 5 MRCV