नीतिसूत्रे 5:1-14
नीतिसूत्रे 5:1-14 MRCV
माझ्या मुला, माझ्या सुज्ञानाकडे लक्ष दे, माझ्या अंतर्ज्ञानाच्या शब्दांकडे तुझे कान लाव; म्हणजे विवेकबुद्धीने कसे वागावे हे तुला समजेल; आणि तुझी जीभ ज्ञानाचे रक्षण करेल. कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते, आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो; परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते, आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे जातात; तिची पावले सरळ अधोलोकी नेतात. जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही; तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते. मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका; माझ्या बोधवचनांकडे पाठ फिरवू नका. तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस, असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्यांना द्यावा आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी, तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्याचे घर समृद्ध होऊ नये. तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल तेव्हा तू दुःखाने विव्हळशील. तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला! माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली! मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे किंवा मला मार्गदर्शन करणार्यांकडे मी कानाडोळा करीत असे. आणि म्हणून लवकरच मी परमेश्वराच्या लोकांच्या सभेपुढे गंभीर अडचणीत आलो.”

