नीतिसूत्रे 1:1-15 - Compare All Versions
नीतिसूत्रे 1:1-15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याची नीतिसूत्रे : ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावीत; बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे; सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, नीतिशिक्षण, न्याय व सात्त्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावीत. भोळ्यांना चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे; ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा; बोधवचने व दृष्टान्त, ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढवचने समजावीत; ह्यासाठी ही आहेत. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ1 होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस; कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत. माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नकोस. ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्यासाठी निष्कारण लपून बसू; त्यांना जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणार्यांप्रमाणे सात्त्विकांना गिळून टाकू. आपणांस सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील; आपली घरे लुटीने भरू; तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू;” तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस; त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नकोस.
नीतिसूत्रे 1:1-15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे. ज्ञान व शिक्षण शिकावे, बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे, सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे, भोळ्यांना शहाणपण आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे, ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे, बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे, ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी, म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत. परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात. माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक, आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस; ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे. माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे; जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; आपण लपू व निष्कारण निष्पाप व्यक्तीवर हल्ला करू. जसे अधोलोक निरोग्यांना गिळून गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवंतपणीच गिळून टाकू. आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील; आपण इतरांकडून जे चोरून त्याने आपण आपली घरे भरू. तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक, आपण सर्व मिळून एकच पिशवी घेऊ.” माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस
नीतिसूत्रे 1:1-15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे: सुज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी; अंतर्ज्ञानाचे शब्द समजून घेण्यासाठी; समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी, जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी; जे साधे भोळे आहेत त्यांना समंजसपणा देण्यासाठी, तरुणांना ज्ञान आणि विवेकबुद्धी देण्यासाठी— शहाण्यांनी ऐकावे आणि त्यांचे ज्ञान वाढवावे, आणि विवेकी मनुष्याला मार्गदर्शन मिळावे— ज्ञानी मनुष्याची नीतिसूत्रे व बोधकथा, प्रसिद्ध वचने आणि कोडे समजण्यासाठी ही नीतिसूत्रे उपयुक्त होतील. याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, परंतु मूर्ख माणसे सुज्ञान आणि शिक्षण तुच्छ लेखतात. माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस. ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे आणि तुझ्या गळ्यातील सुशोभित हार आहे. माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील, तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस. जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये; आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू, चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या; चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू, आणि ते पूर्णपणे आत जातील, असे खोल खड्ड्यात घालू; आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू; आमच्याबरोबर चिठ्ठी टाक; लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”— माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस