नीतिसूत्रे 1:1-15
नीतिसूत्रे 1:1-15 MRCV
इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे: सुज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी; अंतर्ज्ञानाचे शब्द समजून घेण्यासाठी; समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी, जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी; जे साधे भोळे आहेत त्यांना समंजसपणा देण्यासाठी, तरुणांना ज्ञान आणि विवेकबुद्धी देण्यासाठी— शहाण्यांनी ऐकावे आणि त्यांचे ज्ञान वाढवावे, आणि विवेकी मनुष्याला मार्गदर्शन मिळावे— ज्ञानी मनुष्याची नीतिसूत्रे व बोधकथा, प्रसिद्ध वचने आणि कोडे समजण्यासाठी ही नीतिसूत्रे उपयुक्त होतील. याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, परंतु मूर्ख माणसे सुज्ञान आणि शिक्षण तुच्छ लेखतात. माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस. ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे आणि तुझ्या गळ्यातील सुशोभित हार आहे. माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील, तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस. जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये; आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू, चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या; चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू, आणि ते पूर्णपणे आत जातील, असे खोल खड्ड्यात घालू; आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू; आमच्याबरोबर चिठ्ठी टाक; लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”— माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस

