YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 3:4-14

फिलिप्पैकरांस पत्र 3:4-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तरी देहावरही भरंवसा ठेवण्यास मला जागा आहे. आपल्याला देहावर भरंवसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मला तसे अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्य्रांचा इब्री, नियमशास्त्रदृष्टीने परूशी; आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा आणि नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा. आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, म्हणजे देवाकडून विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व असे असावे. हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी ओळख करून घ्यावी. म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे. बंधूंनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानीत नाही पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम.

फिलिप्पैकरांस पत्र 3:4-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तरी देखील मला देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत. जर काहींना वाटते की त्यांना देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत, तर मला अधिक आहेत. मी आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकातील, बन्यामीन वंशातील, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रानुसार परूशी असा होतो; आणि आवेशाविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी दोषरहित होतो. परंतु जो काही मला लाभ होतो, तो सर्व मी ख्रिस्तासाठी हानी समजलो आहे. यापेक्षाही अधिक, ख्रिस्त येशू माझे प्रभू, यांच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानासाठी मी सर्वकाही हानी असे समजतो व त्यासाठी मी सर्वगोष्टी गमावल्या आहेत व मी त्या कचर्‍यासमान लेखतो यासाठी की ख्रिस्त मला प्राप्त व्हावे. आणि मी त्यांच्यामध्ये सापडावे आणि नियमांद्वारे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, परंतु ख्रिस्तामधील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व परमेश्वरावरील विश्वासाने प्राप्त होते. मी ख्रिस्ताला आणि त्यांच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, व त्यांच्या दुःखसहनाची सहभागिता जाणून त्यांच्या मृत्यूशी अनुरूप व्हावे. आणि कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान प्राप्त करून घ्यावे. मी सर्वकाही मिळविले किंवा माझ्या ध्येयाप्रत पोहोचलो आहे असे नाही, परंतु ते आपलेसे करण्यासाठी व घट्ट धरून ठेवण्यासाठी मी नेटाने पुढे जात आहे. कारण मला ख्रिस्त येशूंनी पकडून ठेवले आहे. बंधू व भगिनींनो, मी अजूनही ते प्राप्त केलेले नाही, परंतु मी एक गोष्ट करतो: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे नेटाने लक्ष लावतो. ख्रिस्त येशूंमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणासंबंधीचे पारितोषिक जिंकण्यासाठी मी त्या लक्ष्याकडे धावत आहे.

फिलिप्पैकरांस पत्र 3:4-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तरी देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसर्‍या कोणाला देहावर भरवसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकांतला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रदृष्टीने परूशी; आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा, आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे. हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी; म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळवले, किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागतो आहे. बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.

फिलिप्पैकरांस पत्र 3:4-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

अर्थात, बाह्य गोष्टींवर भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा, असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकांतल्या बन्यामीन वंशातला, शुद्ध हिब्रू रक्ताचा व नियमशास्त्रानुसार परुशी आहे. आवेशाविषयी म्हणाल तर ख्रिस्तमंडळीचा छळ करणारा व नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. परंतु ज्या गोष्टी मला लाभदायक होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा मानतो. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढे मी सर्व काही निरर्थक समजतो, त्यामुळे मी ज्या गोष्टींना मुकलो त्यांना हानी लेखतो. ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ व्हावा, मी त्याच्यामध्ये आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे विश्वासावर आधारित व देवाकडून मिळणारे असे नीतिमत्त्व असावे. माझी एकमेव इच्छा हीच आहे की, मला ख्रिस्ताची ओळख पटावी; त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मला अनुभवावयास मिळावे, त्याच्या दुःखात मी सहभागी व्हावे व त्याच्या मृत्यूत मी त्याच्याशी एकरूप व्हावे. म्हणजे शक्य झाल्यास मृतांमधून मला पुनरुत्थान मिळावे. एवढ्यातच मी मिळवले आहे किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे, असा दावा मी करीत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला त्याचे म्हणून स्वीकारले, ते मी माझे करून घ्यावे म्हणून मी झटत आहे. बंधूंनो, मी अद्यापि ते माझे करून घेतले, असे मानत नाही, तर मागील गोष्टीं विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, स्वर्गीय जीवनासाठी ख्रिस्ताद्वारे मिळणारे देवाचे उच्च पाचारण हे पारितोषिक प्राप्‍त करून घेण्यासाठी मी लक्ष्याकडे धावतो.