YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांना 3:4-14

फिलिप्पैकरांना 3:4-14 MACLBSI

अर्थात, बाह्य गोष्टींवर भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा, असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकांतल्या बन्यामीन वंशातला, शुद्ध हिब्रू रक्ताचा व नियमशास्त्रानुसार परुशी आहे. आवेशाविषयी म्हणाल तर ख्रिस्तमंडळीचा छळ करणारा व नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. परंतु ज्या गोष्टी मला लाभदायक होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा मानतो. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढे मी सर्व काही निरर्थक समजतो, त्यामुळे मी ज्या गोष्टींना मुकलो त्यांना हानी लेखतो. ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ व्हावा, मी त्याच्यामध्ये आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे विश्वासावर आधारित व देवाकडून मिळणारे असे नीतिमत्त्व असावे. माझी एकमेव इच्छा हीच आहे की, मला ख्रिस्ताची ओळख पटावी; त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मला अनुभवावयास मिळावे, त्याच्या दुःखात मी सहभागी व्हावे व त्याच्या मृत्यूत मी त्याच्याशी एकरूप व्हावे. म्हणजे शक्य झाल्यास मृतांमधून मला पुनरुत्थान मिळावे. एवढ्यातच मी मिळवले आहे किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे, असा दावा मी करीत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला त्याचे म्हणून स्वीकारले, ते मी माझे करून घ्यावे म्हणून मी झटत आहे. बंधूंनो, मी अद्यापि ते माझे करून घेतले, असे मानत नाही, तर मागील गोष्टीं विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, स्वर्गीय जीवनासाठी ख्रिस्ताद्वारे मिळणारे देवाचे उच्च पाचारण हे पारितोषिक प्राप्‍त करून घेण्यासाठी मी लक्ष्याकडे धावतो.