YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 25:14-46

मत्तय 25:14-46 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण हे दूरदेशी जाणाऱ्या मनुष्यासारखे आहे, ज्याने प्रवासास जाण्याअगोदर आपल्या चाकरांना बोलावून आपली मालमत्ता त्यांच्या हाती दिली. त्यांच्यातील एकाला त्याने पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या, दुसऱ्याला त्याने दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आणि तिसऱ्याला त्याने एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासास गेला. ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या त्याने मिळविल्या. त्याचप्रमाणे, ज्याला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या त्याने आणखी दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या कमविल्या. पण ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे नाणे त्यामध्ये लपवले. बराच काळ लोटल्यानंतर त्या चाकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशोब घ्यायला सुरुवात केली. ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने मालकाकडे आणखी पाच हजार आणून दिल्या, तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या नाण्यांवर मी आणखी पाच हजार नाणी मिळविली. त्याचा मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो! नंतर ज्या मनुष्यास दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला आणि म्हणाला; मालक, तुम्ही मला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन हजार कमवल्या आहेत. मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो! नंतर ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक कठीण शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता. मला आपली भीती होती. म्हणून मी जाऊन तुमच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या जमिनीत लपवून ठेवल्या. हे घ्या! हे तुमच्याच आहेत! मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी चाकरा, मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते. तर तू माझी नाणी सावकाराकडे ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते. म्हणून मालकाने दुसऱ्या चाकरांना सांगितले, याच्याजवळच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आहेत त्यास द्या. कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल आणि त्यास भरपूर होईल, पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल. नंतर मालक म्हणाला, त्या निकामी चाकराला बाहेरच्या अंधारात टाक. तेथे रडणे व दात खाणे चालेल, मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करील. मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल. मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो. तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील. मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे तुमचे राज्य आहे, कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिले. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिले आणि तुला खायला आणि प्यायला दिले? आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले. मग राजा जे आपल्या डाव्या बाजूला आहेत त्यांस म्हणेल, माझ्यापासून दूर जा. तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही. मग ते लोकसुद्धा त्यास उत्तर देतील, प्रभू आम्ही कधी तुला उपाशी किंवा तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले. “मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.”

सामायिक करा
मत्तय 25 वाचा

मत्तय 25:14-46 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“पुन्हा, ते प्रवासाला निघालेल्या एका मनुष्यासारखे आहे. त्याने त्याच्या दासांना एकत्र बोलाविले आणि प्रत्येकाला त्याने ठराविक रक्कम दिली. त्याने एकाला सोन्याचे पाच तालांत, दुसर्‍याला दोन आणि तिसर्‍याला एक, असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि मग तो आपल्या प्रवासाला निघून गेला. नंतर, ज्या सेवकाला पाच सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने ताबडतोब कामधंदा सुरू केला आणि लवकरच त्याने पाच थैल्या अधिक मिळविल्या. त्याचप्रमाणे ज्याला दोन सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्यानेही आणखी दोन थैल्या मिळविल्या. पण ज्याला एक थैली मिळाली, तो गेला व त्याने जमिनीत एक खोल खड्डा केला आणि सुरक्षित राहावी म्हणून त्याच्या मालकाची थैली दडवून ठेवली. “बर्‍याच काळानंतर त्यांचा धनी परतला आणि त्याने आपल्या सेवकांना पैशाचा हिशोब देण्यासाठी बोलाविले. ज्याला पाच थैल्या मिळाल्या होत्या, त्याने धन्याला दहा आणून दिल्या. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मला पाच थैल्या दिल्या होत्या; पाहा, मी त्यावर आणखी पाच मिळविल्या आहेत.’ “त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या व विश्वासू दासा! तू लहान गोष्टीत विश्वासू राहिलास; मी तुझी पुष्कळ गोष्टींवर नेमणूक करेन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’ “यानंतर ज्याला दोन थैल्या दिल्या होत्या, तो सेवक सुद्धा पुढे आला; तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मला दोन थैल्या दिल्या होत्या, त्या मी दुप्पट केल्या आहेत.’ “त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या व विश्वासू दासा! तू लहान गोष्टीत विश्वासू राहिलास; मी तुझी पुष्कळ गोष्टींवर नेमणूक करेन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’ “नंतर ज्याला एक थैली दिली होती, तो सेवक पुढे आला. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, हे मला माहीत होते. जिथे तुम्ही पेरले नाही, तिथे कापणी करता आणि जिथे तुम्ही विखुरले नाही तिथे गोळा करता. मला तुमची भीती वाटली, म्हणून मी गेलो व तुम्ही दिलेली एक थैली भूमीत दडवून ठेवली. पाहा, ती आता मी तुम्हाला परत करण्याकरिता आणली आहे.’ “यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे, दुष्ट आणि आळशी दासा, जिथे मी पेरले नाही तिथे मी कापणी करतो आणि जिथे मी विखुरले नाही तिथे गोळा करतो, तुला एवढे तुला माहीत होते. तर मग तू माझे सोने सावकाराकडे तरी गुंतवून ठेवावयास होते, म्हणजे मी परत आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते. “ ‘तर त्या सोन्याची थैली त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा थैल्या आहेत त्याला द्या. कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांना विपुलतेने मिळेल. ज्यांच्याकडे नाही, त्यांच्याजवळ जे काही असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. आता त्या कुचकामी सेवकाला बाहेरच्या अंधारात फेकून द्या; ज्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’ “जेव्हा मानवपुत्र सर्व देवदूतांना बरोबर वैभवाने येईल, त्यावेळी तो वैभवशाली सिंहासनावर बसेल. मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र होतील आणि मेंढपाळ मेंढरे व शेरडे वेगळे करतो तसा तो लोकांना एकमेकांपासून वेगळे करेल. मेंढरांना तो त्याच्या उजवीकडे आणि शेरड्यांना त्याच्या डावीकडे करेल. “मग राजा त्याच्या उजवीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याने दिलेल्या आशीर्वादांनी धन्य झालेले लोकहो, या आणि जगाच्या उत्पत्तीपासून जे राज्य तुम्हाकरिता तयार करून ठेवले आहे ते वतन करून घ्या. मी भुकेला होतो आणि तुम्ही मला काही खावयास दिले; मी तान्हेला होतो आणि तुम्ही मला प्यावयास दिले; मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले; मला वस्त्रांची गरज होती, तेव्हा तुम्ही मला वस्त्रे दिली; मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली.’ “त्यावेळी नीतिमान लोक त्याला म्हणतील, ‘प्रभूजी, तुम्ही भुकेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि अन्न दिले आणि तहानलेले असताना तुम्हाला प्यावयाला दिले? तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले किंवा तुम्ही वस्त्रहीन असताना तुम्हाला वस्त्रे दिली? तुम्ही आजारी असताना किंवा तुरुंगात असताना, आम्ही केव्हा तुमच्या भेटीला आलो?’ “मग राजा उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे काही या लहानातील माझ्या एकाही भावा-बहिणीसाठी तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले.’ “नंतर तो त्याच्या डावीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो शापग्रस्त लोकांनो, तुम्ही माझ्यापुढून निघून जा. सैतान आणि त्याच्या दूतांसाठी जो सार्वकालिक अग्नी तयार ठेवला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही खावयास दिले नाही; तान्हेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. परका होतो, तेव्हा तुम्ही मला घरात घेतले नाही; वस्त्रहीन होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही; आजारी होतो, तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’ “ते सुद्धा असे उत्तर देतील, ‘प्रभूजी तुम्ही भुकेले, तहानलेले, परके, उघडे, आजारी किंवा तुरुंगात असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि तुमची मदत केली नाही?’ “तो त्यांना उत्तर देईल, ‘खरोखर, या कनिष्ठांना करण्याचे तुम्ही नाकारले, तेव्हा तुम्ही माझ्यासाठी करण्याचे नाकारले.’ “मग त्यांना सार्वकालिक मृत्यूची शिक्षा मिळेल, पण जे नीतिमान आहेत ते सार्वकालिक जीवनात प्रवेश करतील.”

सामायिक करा
मत्तय 25 वाचा

मत्तय 25:14-46 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणार्‍या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले; आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले. परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, ‘महाराज, आपण मला पाच हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, आपण मला दोन हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार रुपये मिळवले आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहात; जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता; म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.’ तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, ‘अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय? तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल; आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका; तेथे रडणे व दात खाणे चालेल.’ जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने ‘सर्व पवित्र देवदूतांसह येईल,’ तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील, आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या; कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात.’ त्या वेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, ‘प्रभूजी, आम्ही तुम्हांला केव्हा भुकेले पाहून खायला दिले? केव्हा तान्हेले पाहून प्यायला दिले? तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? आणि तुम्हांला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो?’ तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’ मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाहीत.’ त्या वेळेस हेही त्याला उत्तर देतील, ‘प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही?’ तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही.’ ‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’

सामायिक करा
मत्तय 25 वाचा

मत्तय 25:14-46 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

स्वर्गाचे राज्य असे असेल: परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने त्याच्या दासांना बोलावून त्यांच्याकडे त्याची मालमत्ता सोपवून दिली. एकाला त्याने पाच हजार सुवर्ण मोहरा, दुसऱ्याला दोन हजार मोहरा तर तिसऱ्याला एक हजार मोहरा अशा ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे दिल्या आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या त्याने लगेच जाऊन त्यांच्यावर व्यापार केला व आणखी पाच हजार कमावल्या. तसेच ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या त्यानेही आणखी दोन हजार मिळवल्या, परंतु ज्याला एक हजार मिळाल्या होत्या त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात त्याच्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी परत आला व त्यांच्याकडून हिशोब घेऊ लागला. ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे पाच हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी पाच हजार मिळवल्या आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ त्यानंतर ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे दोन हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी दोन हजार मिळविल्या आहेत.’ त्यालाही त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ ज्याला एक हजार मोहरा मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. म्हणून मी भ्यालो व जाऊन तुमच्या हजार मोहरा मी जमिनीत लपवून ठेवल्या होत्या. जे तुमचे आहे ते तुम्हांला परत करत आहे.’ त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापणी करतो व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते ना? तर मग माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यावर ते मला व्याजासकट परत मिळाले असते.’ तो त्याच्या दासांना म्हणाला, “त्या हजार मोहरा त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल आणि ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्याकडून काढून घेतले जाईल आणि हे बघा, ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’ जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो स्वतःच्या राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि मेंढपाळ जसे शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळी करील. नीतिमान लोकांना तो त्याच्या उजवीकडे व इतरांना डावीकडे ठेवील. मग राजा त्याच्या उजवीकडच्यांना म्हणेल, “अहो, माझ्या पित्याचा आशीर्वाद लाभलेल्या लोकांनो, या. जे राज्य जगाच्या निर्मितीपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले; तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले; परका होतो, तेव्हा मला घरात घेतले; उघडा होतो, तेव्हा मला वस्त्र दिले; आजारी होतो, तेव्हा माझी काळजी घेतली; तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही मला भेटायला आलात.’ त्या वेळी नीतिमान त्याला विचारतील, “प्रभो, आम्ही कधी तुम्हांला खायला दिले? केव्हा तुम्हांला प्यायला दिले? केव्हा तुम्हांला परके पाहून घरात घेतले? आणि केव्हा तुम्हांला उघडे पाहून वस्त्र दिले? तुमच्या कोणत्या आजारपणात आम्ही काळजी घेतली? आणि कोणत्या तुरुंगात आम्ही तुम्हांला भेटायला आलो?’ राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केले, त्याअर्थी ते माझ्यासाठी केले.’ त्यानंतर डावीकडच्यांनाही तो म्हणेल, “अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघून सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो अनंत अग्नी सिद्ध केला आहे, त्यात जा. कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही. तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले नाही. परका होतो, तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही; आजारी व तुरुंगात होतो, तेव्हा माझ्या भेटीला आला नाही.’ त्या वेळेस तेदेखील त्याला विचारतील, “प्रभो, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी, किंवा तुरुंगात पाहिले आणि तुम्हांला साहाय्य केले नाही?’ तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला खरोखर सांगतो, ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकाला साहाय्य करायचे तुम्ही नाकारले, त्याअर्थी तुम्ही मला साहाय्य करायचे नाकारले.’ तर मग ह्यांना अनंत शिक्षा भोगायला पाठवले जाईल आणि नीतिमान शाश्वत जीवन उपभोगायला जातील.”

सामायिक करा
मत्तय 25 वाचा