YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 18:10-35

मत्तय 18:10-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका कारण मी तुम्हास सांगतो की, स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात. आणखी, जे हरवलेले त्यास तारावयास मनुष्याचा पुत्र आला आहे.” जर एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही? आणि जर त्या मनुष्यास हरवलेले मेंढरू सापडले तर त्यास कधीही न हरवलेल्या नव्याण्णव मेंढरांबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल. असे मी तुम्हास खरे सांगतो, तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही. जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्यांने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस. पण जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील, जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीलाही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो तुला परराष्ट्रीय किंवा एखाद्या जकातदारासारखा समज. मी तुम्हास खरे सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले. तसेच मी तुम्हास खरे सांगतो की, जर पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघांचे कोणत्याही गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरता एकत्रित होऊन विनंती करतील तर ती. माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल; कारण जिथे दोघे किंवा तिघे जर माझ्या नावाने एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यांमध्ये मी आहे. नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “प्रभू, जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्यास किती वेळा क्षमा करावी? मी त्यास सात वेळा क्षमा करावी काय?” येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर साताच्या सत्तरवेळा अन्याय केला तरी तू त्यास क्षमा करीत राहा.” म्हणूनच स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे चाकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरवले. जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे लक्षावधी रुपयांचे कर्ज होते त्यास त्याच्याकडे आणण्यात आले. त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी. परंतु त्या चाकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हास परत करीन. त्या मालकाला आपल्या चाकराचा कळवळा आला, म्हणून त्याने त्या चाकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्यास सोडले. नंतर त्याच चाकराचे काही शंभर चांदीचे नाणे देणे लागत असलेला दुसरा एक चाकर पहिल्या चाकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या चाकराचा गळा पकडला आणि तो त्यास म्हणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे. परंतु दुसरा चाकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हास देणे लागतो ते परत करीन. पण पहिल्या चाकराने दुसऱ्या चाकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्यास तुरूंगात टाकले. तेथे त्यास त्याचे कर्ज फिटेपर्यंत रहावे लागणार होते. घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या चाकरांनी पाहिला तेव्हा ते फार दुःखी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले. तेव्हा पहिल्या चाकराच्या मालकाने त्यास बोलावले व तो त्यास म्हणाला, “दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले. म्हणून तू तुझ्याबरोबरच्या चाकरालाही तशीच दया दाखवायची होतीस?” मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या चाकराला तुरूंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्यास तुरूंगातून सोडले नाही. “जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हास क्षमा करणार नाही.”

सामायिक करा
मत्तय 18 वाचा

मत्तय 18:10-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“या लहान बालकांपैकी एकालाही तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या पित्याचे मुख निरंतर पाहत असतात. मानवपुत्र हरवलेले शोधावयास आणि उद्धार करावयास आला आहे. “तुम्हाला काय वाटते? एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर तो मनुष्य काय करेल? तो आपली नव्याण्णव मेंढरे डोंगरावर सोडून ते हरवलेले मेंढरू शोधण्यास जाणार नाही काय? आणि मी तुम्हाला खचित सांगतो, ते सापडल्यावर, आपली नव्याण्णव मेंढरे सुखरुप आहेत त्यापेक्षा, आपले हरवलेले मेंढरू सापडले म्हणून तो अधिक आनंद करेल. त्याच प्रकारे या लहान बालकातील एकाचाही नाश होऊ नये अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. “तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले असेल, तर त्याची चूक त्याला समजावून सांग, परंतु हे तुमच्या दोघांमध्ये असू दे. त्यांनी तुझे ऐकले, तर तू त्यांना परत मिळविले आहेस. जर त्यांनी ऐकले नाही तर, एक किंवा दोन साक्षीदारांना बरोबर घेऊन जा, म्हणजे ‘दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित होईल.’ यावरही ते तुझे ऐकण्यास तयार झाले नाही, तर तुझा दावा मंडळीकडे घेऊन जा आणि मंडळीचेही ऐकण्याचे त्यांनी नाकारले, तर तो एखादा गैरयहूदी किंवा जकातदार आहे असे समजून तू त्याच्याशी वाग. “मी तुम्हाला खरोखर सांगतो, पृथ्वीवर जे काही तुम्ही बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तुम्ही मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. “मी तुम्हाला पुन्हा निश्चितपणे सांगतो की, या पृथ्वीवर तुम्हापैकी दोघे एकचित्त होऊन कोणतीही मागणी करतील, तर माझा स्वर्गीय पिता तुमची ती मागणी मान्य करेल. कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात, तिथे मी उपस्थित आहे.” मग पेत्र येशूंकडे आला आणि त्याने त्यांना विचारले, “प्रभूजी, माझ्या भावाने अथवा बहिणीने माझ्याविरुद्ध पाप केले, तर मी त्यांना किती वेळा क्षमा करावी? सात वेळेस का?” येशूंनी उत्तर दिले, “सात नाही तर साताच्या सत्तर वेळा! “म्हणून स्वर्गाचे राज्य त्या राजासारखे आहे, ज्याला आपल्या नोकरांकडून हिशोब घ्यायचा होता. हिशोब घेत असताना, ज्या नोकरावर राजाचे दहा हजार तालांतचे कर्ज होते, त्याला राजापुढे आणण्यात आले. त्या नोकराला हे कर्ज फेडणे अशक्य होते, म्हणून प्रभूने कर्जदार, त्याची पत्नी, त्याची मुले, आणि त्याचे जे सगळे होते ते विकून कर्ज वसूल करण्याची आज्ञा दिली. “तेव्हा तो नोकर गुडघे टेकून खाली पडला आणि गयावया करून राजाला म्हणाला, ‘महाराज, थोडा धीर धरा. मी आपले सर्व कर्ज फेडीन.’ तेव्हा प्रभूला त्या नोकराची दया आली, त्याचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडून दिले. “पण तो नोकर बाहेर गेला आणि ज्याच्याकडे त्याचे शंभर दिनारचे कर्ज होते तो सोबतीचा नोकर त्याला भेटला, त्याने त्याची मानगुट पकडली आणि ताबडतोब आपले कर्ज देण्याची त्याने मागणी केली. “त्याचा कर्जदार त्याच्यापुढे पालथा पडला व विनंती करू लागला, ‘थोडा धीर धरा, मी सर्व कर्ज फेडीन.’ “पण तो थांबावयास तयार नव्हता. त्याने त्या मनुष्याला अटक करवून तो पैसे फेडेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले. जेव्हा इतर नोकरांनी हे पाहिले, तेव्हा ते क्रोधाने भरून प्रभूकडे गेले आणि काय घडले हे सर्व त्यांनी राजाला सांगितले.” तेव्हा प्रभूने ज्या नोकराला क्षमा केली होती, त्या नोकराला बोलाविले. राजा त्याला म्हणाला, “अरे दुष्ट माणसा, मी तुझे सर्व कर्ज माफ केले, कारण तू मला तशी विनंती केलीस; ज्याप्रमाणे मी तुझ्यावर दया केली त्याप्रमाणे तू त्याच्यावर दया करू नये काय? मग संतप्त झालेल्या प्रभूने त्या दुष्ट मनुष्याला, तो सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगामध्ये कोंडून ठेवले. “जर तुम्ही तुमच्या भावाची व बहिणीची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गीय पिताही याचप्रकारे तुम्हा प्रत्येकाला वागवेल.”

सामायिक करा
मत्तय 18 वाचा

मत्तय 18:10-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. [आणखी, जे हरवलेले त्यांना तारायला मनुष्याचा पुत्र आला आहे.] तुम्हांला काय वाटते? कोणाएका मनुष्याजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर ती नव्याण्णव डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हांला खचीत सांगतो. तसे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकान्तात असताना त्याचा अपराध त्याला दाखव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एका-दोघांस आपणाबरोबर घे; अशासाठी की, ‘दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा.’ आणि जर त्याने त्यांचे ऐकले नाही तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो. मी तुम्हांला खचीत सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हांला खचीत सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.” तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, “प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?” येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले. आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करण्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की, ‘तो, त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी.’ तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, ‘मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन.’ तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला, त्याच्याकडे त्याचे शंभर रुपये येणे होते; तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, ‘तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक.’ ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, ‘मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन.’ पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दु:खी झाले आणि त्यांनी येऊन सर्वकाही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, ‘अरे दुष्ट दासा! तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते; मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’ मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणार्‍यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला त्यांच्या अपराधांची मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.”

सामायिक करा
मत्तय 18 वाचा

मत्तय 18:10-35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

सांभाळा, ह्या लहानांतील एकालाही तुच्छ मानू नका. मी तुम्हांला सांगतो, त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्यापुढे नित्य उपस्थित असतात. [जे हरवलेले आहे, त्याचा शोध घेण्यासाठी मनुष्याचा पुत्र आला आहेर्.] तुम्हांला काय वाटते? एका माणसाजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर टेकडीवर चरत असलेल्या नव्याण्णव मेंढरांना सोडून जे एक भटकले आहे त्याला शोधायला तो जाणार नाही काय? आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो सापडलेल्या मेंढराबद्दल अधिक आनंद व्यक्त करणार नाही का? त्याप्रमाणे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा, अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. तुझा भाऊ तुझा अपराधी असेल तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध काय ते त्याला सांग. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास, असे होईल. परंतु त्याने जर ऐकले नाही, तर तू आणखी एका दोघांना आपणाबरोबर घे. अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध व्हावा आणि जर त्याने त्यांचेही ऐकले नाही तर मंडळीला कळव. जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही, तर तो तुला निधर्मी किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल, ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल, ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील, तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी मान्य केली जाईल; कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात, तेथे त्यांच्यामध्ये मी असतो.” त्या वेळी पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, “प्रभो, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?” येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला सांगत नाही, तर सात गुणिले सत्तर वेळा. कारण स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्या राजाला त्याच्या दासांकडून हिशोब घ्यावा असे वाटले. तो हिशोब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्यापुढे आणण्यात आले. त्या कर्जदाराकडे फेड करायला काही नसल्यामुळे धन्याने हुकूम सोडला की, तो, त्याची बायको व मुले आणि त्यांचे जे काही असेल, ते विकून फेड करून घ्यावी. त्या दासाने त्याच्या पाया पडून विनंती केली, “मला समजून घ्या, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडेन.’ त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने दासाचे कर्ज माफ केले व त्याला जाऊ दिले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला त्याच्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडून त्याचे थोडे कर्ज येणे होते. तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, “तुझ्याकडून माझे येणे आहे, ते देऊन टाक.’ त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, “मला समजून घे म्हणजे मी तुझे कर्ज फेडेन.’ पण त्याचे न ऐकता त्याने सोबतीच्या दासाला कर्ज फेडेपर्यंत तुरुंगात टाकले. घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे इतर दास अतिशय अस्वस्थ झाले. त्यांनी ते वृत्त त्यांच्या धन्याला सांगितले. त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, “अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी तुझे सर्व कर्ज माफ केले. मी जशी तुझ्यावर दया केली, तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’ आणि त्याचा धनी त्याच्यावर रागावला व त्याचे कर्ज फिटेपर्यंत त्याने त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती तुरुंगात पाठवले. म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण स्वतःच्या भावाला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”

सामायिक करा
मत्तय 18 वाचा