यिर्मया 17:1-18
यिर्मया 17:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“यहूदाचे पाप लोखंडी लेखणीने व हिऱ्याच्या टोकाने लिहिलेले आहे. ते त्यांच्या हृदयाच्या पाटीवर आणि वेदीच्या शिंगांवर कोरले आहेत. त्यांचे लोक उंच डोंगरावरील हिरव्या झाडाजवळील त्यांच्या वेद्या आणि अशेराचे खांब आठवण करतात. विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्यांच्या वेद्या ते आठवतात. मी तुझी संपत्ती आणि विपुलता दुसऱ्यास लूट अशी वाटून देणार. कारण तुझी पातके तुझ्या सर्व सिमांत सरळीकडे आहेत. मी दिलेला वारसा तू गमावशील. मी तुमच्या शत्रूंना तुम्हास गुलाम म्हणून अज्ञान भूमीत देईन. कारण माझ्या क्रोधात तू अग्नी पेटवला आहे, जो सर्वकाळ जळत राहीन.” परमेश्वर असे म्हणतो, “जो मानवजातीवर विश्वास ठेवतो, जो आपल्या देहाला आपले सामर्थ्य करतो पण त्याचे हृदय परमेश्वरापासून दूर आहे, तो शापित असो. कारण तो वाळवंटातील झुडुपाप्रमाणे आहे आणि चांगले येईल ते तो पाहणार नाही. तो निर्जन, कोरड्या व बरड जमिनीवर व रहिवासी नसलेल्या जागी वस्ती करीन. परंतु जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादीत आहे, कारण परमेश्वर त्याचा विश्वास आहे. तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे तो होईल, ज्याची मुळे प्रवाहाजवळ पसरते, तो हे पाहत नाही की उन्हाची झळ येत आहे, कारण त्याची पाने हिरवीगार राहतात. मग दुष्काळाच्या वर्षाच्या काळात तो चिंताग्रस्त होणार नाही, किंवा तो फळ देण्याचे थांबवणार नाही.” हृदय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त कपटी आहे, ते आजारी आहे, कोण त्यास समजू शकणार? मी प्रत्येक मनुष्यास त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे ताडना करण्यास, मी परमेश्वर, मनाचा शोध घेतो, मी हृदय पारखतो. अन्यायाने जो श्रीमंत होतो, तो जशी तितर जी अंजी घालत नाहीत त्यावर बसते तसा आहे. पण त्याच्या आयुष्याच्या मध्यांनात, ती संपत्ती त्यास सोडील. तो शेवटी एक मूर्ख असेल. आमच्या मंदिराचे ठिकाण एक गौरवशाली राजासन, जे सुरुवातीपासून भारदस्त आहे. परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो या भूमीवर परमेश्वरा पासून फिरेल, त्यास छेदले जाईल. कारण त्यांनी परमेश्वरास जो जिवंत पाण्याचा झरा आहे, त्यास सोडले आहे. परमेश्वरा, तू मला बरे कर, आणि मी पूर्ण, बरा होईन. तू मला तार, म्हणजे मी तरेन. कारण तुच माझे स्तुतीचे गीत आहेस. पाहा, ते मला विचारत आहे, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते आता येवो.” मी तर तुझ्यामागे चालून मेंढपाळ होण्यापासून मागे हटलो नाही, तो भयंकर दिवस उजाडावा अशी माझी इच्छाही नव्हती. हे तू जाणतोस, जे माझ्या ओठातून निघाले ते तुझ्यासमोर आहे. तू मला भयावह असे होऊ नकोस. संकटाच्या दिवशी तू माझा आश्रय आहेस. माझा पाठलाग करणारे लाजवले जावो, परंतू मी न लाजवला जावो. ते निराश केले जावोत, परंतू मी निराश न केला जावो. अरिष्टाचा दिवस त्यांच्याविरुद्ध पाठव आणि दुप्पट नाशाने त्यांना विखरुन टाक.
यिर्मया 17:1-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“त्यांच्या हृदय पटलावर आणि त्यांच्या वेद्यांच्या शिंगावर यहूदीयाचे पाप जणू काही लोखंडी कलमाने एखाद्या हिरकटोकाने कोरलेल्या आहेत, घनदाट वृक्षाजवळ आणि उंच डोंगरावरील, प्रत्येक वेदी व अशेरास्तंभाची त्यांची लेकरे सुद्धा आठवण करतात. या भूमीवर माझे उंच पर्वत आणि तुमची संपत्ती व सर्व भांडारे तुमच्या उच्च स्थळासहित, लूट म्हणून मी देईन, कारण संपूर्ण देशभर तुम्ही पाप केले आहे. तुमच्याच चुकीमुळे मी तुम्हास दिलेले वतन तुम्ही घालवाल. तुमच्या शत्रूंकडे, तुम्हाला माहीत नसलेल्या राष्ट्रांत मी तुम्हाला गुलाम म्हणून पाठवेन. कारण तुम्ही माझा क्रोधाग्नी पेटविला आहे आणि तो सतत जळत राहील.” याहवेह असे म्हणतात: “जो मनुष्यावर विश्वास ठेवतो, जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो. तो मनुष्य वैराण वाळवंटातील खुरट्या झुडूपासारखा आहे; उन्नतीचे चांगले दिवस त्यांना कधीच दिसणार नाहीत. ते वाळवंटातील उजाड भूमीमध्ये, ज्या क्षारभूमीत जीवन नसेल, तिथे राहतील. “परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो, जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो, ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत. त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात. या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही; त्याची पाने सदा हिरवी राहतात. अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही. आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही.” सर्वात कपटी काही असेल तर, ते म्हणजे अंतःकरण आणि ते बरे करण्याच्या पलीकडे आहे. हे कळण्यास कोण समर्थ आहे? “मी याहवेह, अंतःकरणे पारखतो, आणि मनाची परीक्षा घेतो, म्हणून प्रत्येक मानवाला त्याने केलेल्या आचरणाप्रमाणे, प्रत्येकाला त्याच्या कर्मांप्रमाणे रास्त प्रतिफळ देतो.” तित्तर पक्षी आपण न दिलेल्या अंडींना उबवितो अशाप्रकारे अन्यायाने संपत्ती मिळविणारे लोक असतात. अर्ध्या जीवनात त्यांची संपत्ती त्यांना सोडून जाते, आणि आयुष्याच्या अखेरीस ते एक मूर्ख ठरविले जातात. तुमचे गौरवी सिंहासन प्रारंभापासून उच्च आहे, हेच आमचे आश्रयस्थान आहे. हे याहवेह, तुम्हीच इस्राएलची आशा आहात; ज्यांनी याहवेहला सोडले आहे, ते लाजिरवाणे होतील. जे तुमच्या मार्गापासून दूर गेले आहेत, त्यांचे नाव धुळीत लिहिले जाईल कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला, जिवंत पाण्याच्या झर्याला सोडले आहे. हे याहवेह, मला आरोग्य द्या, म्हणजे मी बरा होईन; माझे रक्षण करा, म्हणजे मी सुरक्षित राहीन, कारण मी केवळ तुमचेच स्तवन करतो. ते मला सतत म्हणत असतात, “याहवेहचे वचन कुठे आहे? ते आता पूर्ण होऊ द्या!” मी तुमचा मेंढपाळ होण्यापासून पळून गेलेलो नाही; तुम्हाला ठाऊक आहे मी अशा भयंकर दिवसाची इच्छा केली नव्हती. माझ्या मुखातून काय निघाले हे तुम्हाला ठाऊक आहे. माझ्यासाठी तुम्ही भीतिदायक होऊ नका; संकटसमयी तुम्हीच माझे आश्रय आहात. माझा छळ करणाऱ्यांना लज्जित करा, परंतु मला फजिती पासून सोडवा; त्यांना भयभीत करा परंतु मला भय मुक्त करा. त्यांच्यावर संकटाचे दिवस येऊ दे; त्यांच्यावर दुप्पट नाश ओढवू दे.
यिर्मया 17:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने, हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे; त्यांच्या हृदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगांवर खोदले आहे; कारण त्याची संतती उंच टेकड्यांवरील हिरव्या झाडांच्या वेद्या व अशेरामूर्ती ह्यांचे स्मरण ठेवते. हे माझ्या वनातल्या पर्वता, तुझे वित्त, तुझे सर्व निधी व तुझ्या सर्व सीमांच्या आतील तुझी उच्च स्थाने तुझ्या पापामुळे मी लुटीस जाऊ देईन. मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल; तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे. तो सर्वकाळ जळत राहील.” परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंत:करण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल; व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही; अरण्यातील रुक्ष स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश ह्यांत तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य! तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील; उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील; अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.” हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.” तित्तर पक्षी आपण न घातलेली अंडी उबवतो तसे अन्यायाने धन मिळवणार्याचे आहे; ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐन भरात सोडून जाईल; व तो अंती मूर्ख ठरेल. आमच्या पवित्रस्थानाचे स्थळ, सनातन काळापासून उच्च व वैभवी सिंहासन आहे. हे परमेश्वरा, इस्राएलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजीत होतील; माझ्यापासून फितणार्यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे. हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईन; मला तार म्हणजे मी तरेन; कारण तू माझा स्तवनविषय आहेस. पाहा, ते मला म्हणतात, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते पुढे येऊ द्या!” मी तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ होण्यापासून माघार घेतली नाही आणि मी संकटाच्या दिवसाची अपेक्षाही केली नाही हे तुला ठाऊक आहे; जे माझ्या तोंडून निघाले ते तुझ्या दृष्टीसमोर होते. तू मला भीतिप्रद होऊ नकोस, विपत्काळी तू माझा आश्रय आहेस. माझा छळ करणारे फजीत होवोत, मी फजीत न व्हावे; ते घाबरे होवोत, मी घाबरे न व्हावे; त्यांच्यावर विपत्काळ आण; दुप्पट नाशाने त्यांचा नायनाट कर!