यिर्मयाह 17:1-18
यिर्मयाह 17:1-18 MRCV
“त्यांच्या हृदय पटलावर आणि त्यांच्या वेद्यांच्या शिंगावर यहूदीयाचे पाप जणू काही लोखंडी कलमाने एखाद्या हिरकटोकाने कोरलेल्या आहेत, घनदाट वृक्षाजवळ आणि उंच डोंगरावरील, प्रत्येक वेदी व अशेरास्तंभाची त्यांची लेकरे सुद्धा आठवण करतात. या भूमीवर माझे उंच पर्वत आणि तुमची संपत्ती व सर्व भांडारे तुमच्या उच्च स्थळासहित, लूट म्हणून मी देईन, कारण संपूर्ण देशभर तुम्ही पाप केले आहे. तुमच्याच चुकीमुळे मी तुम्हास दिलेले वतन तुम्ही घालवाल. तुमच्या शत्रूंकडे, तुम्हाला माहीत नसलेल्या राष्ट्रांत मी तुम्हाला गुलाम म्हणून पाठवेन. कारण तुम्ही माझा क्रोधाग्नी पेटविला आहे आणि तो सतत जळत राहील.” याहवेह असे म्हणतात: “जो मनुष्यावर विश्वास ठेवतो, जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो. तो मनुष्य वैराण वाळवंटातील खुरट्या झुडूपासारखा आहे; उन्नतीचे चांगले दिवस त्यांना कधीच दिसणार नाहीत. ते वाळवंटातील उजाड भूमीमध्ये, ज्या क्षारभूमीत जीवन नसेल, तिथे राहतील. “परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो, जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो, ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत. त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात. या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही; त्याची पाने सदा हिरवी राहतात. अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही. आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही.” सर्वात कपटी काही असेल तर, ते म्हणजे अंतःकरण आणि ते बरे करण्याच्या पलीकडे आहे. हे कळण्यास कोण समर्थ आहे? “मी याहवेह, अंतःकरणे पारखतो, आणि मनाची परीक्षा घेतो, म्हणून प्रत्येक मानवाला त्याने केलेल्या आचरणाप्रमाणे, प्रत्येकाला त्याच्या कर्मांप्रमाणे रास्त प्रतिफळ देतो.” तित्तर पक्षी आपण न दिलेल्या अंडींना उबवितो अशाप्रकारे अन्यायाने संपत्ती मिळविणारे लोक असतात. अर्ध्या जीवनात त्यांची संपत्ती त्यांना सोडून जाते, आणि आयुष्याच्या अखेरीस ते एक मूर्ख ठरविले जातात. तुमचे गौरवी सिंहासन प्रारंभापासून उच्च आहे, हेच आमचे आश्रयस्थान आहे. हे याहवेह, तुम्हीच इस्राएलची आशा आहात; ज्यांनी याहवेहला सोडले आहे, ते लाजिरवाणे होतील. जे तुमच्या मार्गापासून दूर गेले आहेत, त्यांचे नाव धुळीत लिहिले जाईल कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला, जिवंत पाण्याच्या झर्याला सोडले आहे. हे याहवेह, मला आरोग्य द्या, म्हणजे मी बरा होईन; माझे रक्षण करा, म्हणजे मी सुरक्षित राहीन, कारण मी केवळ तुमचेच स्तवन करतो. ते मला सतत म्हणत असतात, “याहवेहचे वचन कुठे आहे? ते आता पूर्ण होऊ द्या!” मी तुमचा मेंढपाळ होण्यापासून पळून गेलेलो नाही; तुम्हाला ठाऊक आहे मी अशा भयंकर दिवसाची इच्छा केली नव्हती. माझ्या मुखातून काय निघाले हे तुम्हाला ठाऊक आहे. माझ्यासाठी तुम्ही भीतिदायक होऊ नका; संकटसमयी तुम्हीच माझे आश्रय आहात. माझा छळ करणाऱ्यांना लज्जित करा, परंतु मला फजिती पासून सोडवा; त्यांना भयभीत करा परंतु मला भय मुक्त करा. त्यांच्यावर संकटाचे दिवस येऊ दे; त्यांच्यावर दुप्पट नाश ओढवू दे.

