शास्ते 10:6-16
शास्ते 10:6-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यानंतर इस्राएलाच्या लोकांनी फिरून देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले; कारण की त्यांनी बआल, अष्टारोथ, अरामाचे देव, सीदोनातले देव, मवाबातले देव व अम्मोनी लोकांचे देव व पलिष्ट्यांचे देव, यांची उपासना केली; त्यांनी परमेश्वरास सोडले, आणि त्यानंतर त्याची उपासना केलीच नाही. यास्तव परमेश्वराचा राग इस्राएलावर भडकला, आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले. त्या वर्षी, त्यानंतर अठरा वर्षे त्यांनी इस्राएलाच्या सर्व लोकांस छळले आणि यार्देनेच्या पलीकडे अमोऱ्यांच्या देशातल्या गिलादात जे इस्राएली होते त्या सर्वांना जाचले. यहूदा व बन्यामीन व एफ्राइमाची घराणे यांच्याशीही लढावयास अम्मोनी लोक यार्देन पार करून अलीकडे आले, त्यामुळे इस्राएलावर फार मोठे दु:ख आले. तेव्हा इस्राएली लोकांनी परमेश्वरास मोठ्याने आरोळी मारीत म्हटले की, “आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे; ते असे की आम्ही आपल्या देवाला सोडून बआलाच्या मूर्तींची उपासना केली.” तेव्हा परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांस म्हटले. “मिसऱ्यांपासून व अमोऱ्यांपासून व अम्मोन्यांच्या लोकांपासून व पलिष्ट्यांपासून मी तुम्हाला सोडवले नाही काय? आणि सीदोनी व अमालेकी व मावोनी यानी तुम्हाला जाचले, तेव्हा तुम्ही मला मोठ्याने हाक मारली, आणि मी तुम्हाला त्यांच्या हातातून सोडवले. तरी तुम्ही मला सोडून दुसऱ्या देवांची उपासना केली; यास्तव मी यापुढे तुमचा बचाव करणार नाही. जा, आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यास हाक मारा; तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हाला सोडवावे.” तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वरास म्हटले, “आम्ही पाप केले आहे; जे सर्व तुला चांगले वाटेल, त्याप्रमाणे तू आम्हांला कर; आम्ही तुला विनंती करतो केवळ त्या दिवशी तू आम्हांला सोडव.” तेव्हा त्यांनी आपल्यामधून परके देव दूर करून परमेश्वराची उपासना केली, आणि इस्राएलाच्या दुःखामुळे त्याच्या मनाला खेद झाला.
शास्ते 10:6-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले. यास्तव याहवेहचा राग इस्राएलवर भडकला. त्यांनी त्यांना पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या हाती विकले. ज्यांनी त्या वर्षी त्यांची दाणादाण केली आणि त्यांना चिरडून टाकले. अठरा वर्षे त्यांनी अमोऱ्यांचा देश असलेल्या गिलआदामध्ये यार्देन नदीच्या पूर्वेकडील सर्व इस्राएली लोकांवर अत्याचार केला. तसेच यहूदाह घराणे, बिन्यामीन घराणे व एफ्राईम घराण्यांविरुद्ध युद्ध करण्यास अम्मोनी वंशजांनी यार्देन नदी पार केली; यामुळे इस्राएली फार संकटात होते. तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहला आरोळी मारली, “आम्ही आमच्या परमेश्वराचा त्याग केला आणि बआलची सेवा करून तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.” याहवेहने इस्राएली लोकांना उत्तर दिले, “जेव्हा इजिप्ती, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी, सीदोनी, अमालेकी व माओनी या सर्वांनी तुमच्यावर अत्याचार केला आणि तुम्ही माझ्या मदतीसाठी धावा केला आणि मी तुम्हाला सोडविले नाही काय? परंतु तुम्ही माझा त्याग केला आणि इतर दैवतांची सेवा करू लागले, म्हणून यापुढे मी तुम्हाला सोडविणार नाही. जा आणि तुम्ही निवडलेल्या नवीन दैवतांचा धावा करा. तुमच्या आपत्काली त्यांनीच तुम्हाला सोडवावे!” परंतु इस्राएली लोकांनी याहवेहला म्हटले, “आम्ही पाप केले आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण आता आम्हाला सोडवा.” नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परदेशी दैवते दूर टाकली आणि याहवेहची सेवा केली. याहवेहना इस्राएलची दैन्यावस्था सहन झाली नाही.
शास्ते 10:6-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले; बआलीम व अष्टारोथ ह्या दैवतांची आणि अराम, सीदोन, मवाब, अम्मोनी व पलिष्टी ह्या सर्वांच्या दैवतांची ते सेवा करू लागले; त्यांनी परमेश्वराचा त्याग केला; त्याची सेवा ते करीनात, म्हणून परमेश्वराचा कोप इस्राएलावर भडकला आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या व अम्मोन्यांच्या हाती दिले. यार्देनेच्या पलीकडे अमोर्यांच्या देशातील गिलाद प्रांतात राहणार्या सर्व इस्राएल लोकांना त्यांनी तेव्हापासून अठरा वर्षे हैराण करून त्यांच्यावर जुलूम केला. अम्मोनी लोक यार्देन ओलांडून यहूदा, बन्यामीन व एफ्राइमाचे घराणे ह्यांच्यावर स्वार्या करत. ह्यामुळे इस्राएल लोक फार बेजार झाले होते. मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, “आम्ही आमच्या देवाचा त्याग केला आणि बआलदैवतांची सेवा करून आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.” तेव्हा परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसरी, अमोरी, अम्मोनी व पलिष्टी ह्यांच्या तावडीतून सोडवले; तसेच सीदोनी, अमालेकी व मिद्यानी ह्यांनी तुम्हांला हैराण केले तेव्हा तुम्ही माझा धावा केला आणि मी तुम्हांला त्यांच्या हातून सोडवले, नाही का? तरी तुम्ही मला सोडले आणि अन्य देवांची सेवा केली म्हणून ह्यापुढे मी तुमची मुक्तता करणार नाही. जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हांला सोडवावे.” तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराला म्हणाले, “आम्ही पाप केले आहे; तुला बरे दिसेल तसे कर, मात्र आज आमचा बचाव कर, एवढीच आमची विनवणी आहे.” मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला.